– रमेश सावईकर
लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली तरी राज्यात कॉंग्रेस पक्ष नेत्यांमध्ये एकसंधता निर्माण होण्याऐवजी अंतर्गत मतभेद उफाळून वर येत असल्याचे दिसत आहेत. गोवा राज्याचे कॉंग्रेस प्रभारी दिग्विजय सिंग यांना पक्षश्रेष्ठींनी राज्यातील कॉंग्रेस नेतेमंडळींमधील अंतर्गत मतभेद मिटविण्यासाठी गोव्यात खास भेटीवर पाठविले. तथापि ही कामगिरी पूर्ण करणे सिंग यांना सहजसुलभ होईल असे वाटत नाही.
मडगाव येथे सर्व कॉंग्रेस आमदारांसाठी दिग्विजय सिंग यांच्यासोबत बोलविण्यात आलेल्या बैठकीला फक्त तीनच आमदार उपस्थित होते, तर सात आमदारांनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे हेतूपुरस्सर टाळले. याची कारणे शोधून काढल्याशिवाय सिंग यांना मतभेद मिटविण्याची मलमपट्टी करणे कठीण जाणार आहे. एकूण राजकीय परिस्थिती पाहता कॉंग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आणण्यातच त्या आमदारांना अधिक रस असावा असे वाटते. या संधीचा फायदा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला होणार आहे, याची कल्पना असूनही कॉंग्रेसमध्ये बंडाळीला आणखी खतपाणी घालण्याचे काम ही मंडळी करीत आहे. पक्षाचे सोयरसुतक त्यांना नाही. त्यांना फक्त आपला राजकीय स्वार्थ साधायचा आहे. आपली प्रतिष्ठा पणाला लावून जी मंडळी एकसंधता व्हावी म्हणून नमरमाईचे धोरण स्वीकारण्यास तयार आहे, त्यांचीच खिल्ली उडविण्यासारखी ही कृती आहे.
प्रदेश कॉंग्रेस पक्ष कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी जॉन फर्नांडिस यांची नियुक्ती झाल्यानंतर पुनश्च पक्षांतर्गत फुटीने डोके वर काढले आहे. फर्नांडीस यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा पक्षश्रेष्ठींनी सोपविली हे बर्याच आमदारांना खुपले आहे. प्रदेशाध्यक्षपदी विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांची निवड करावी, तर ते विरोधी पक्षनेते म्हणूनही काही आमदारांना नको आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी सर्वसामान्य अशी व्यक्ती सध्या तरी सापडणे कठीण होऊन बसले आहे. उत्तर गोव्यातील कॉंग्रेस पक्षनेते व राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते यांच्यामध्ये उत्तर गोवा लोकसभा निवडणूक उमेदवार निवडण्यावरून सरळ-सरळ दोन गट पडणार आहेत.
कॉंग्रेसमध्ये बंडाळीची चिन्हे स्पष्ट होऊ लागली आहेत. त्याचे मूळ दक्षिण गोव्यातील निवडणूक उमेदवार निवडीशी निगडीत आहे. माजी मंत्री फ्रान्सिस सार्दिन, माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो व माजी बांधकाममंत्री चर्चिल आलेमांव यापैकी लोकसभेसाठी उमेदवार म्हणून कोणाची निवड करावी हा प्रश्न पक्षश्रेष्ठींना भेडसावत आहे. नेतेमंडळींमध्ये अंतर्गत हेवेदावे भरपूर आहेत. सार्दिन, फालेरो व आलेमांव यांचे समर्थक भिन्नभिन्न आहेत. एवढे असूनही ऐनवेळी कॉंग्रेस पक्षाच्या बाजूने दक्षिण गोव्यातील मतदारांना वळविण्याच्या कामी कॉंग्रेसला यश लाभू शकते हे नाकारता येणार नाही. दक्षिण गोव्यात कॉंग्रेस नेतेमंडळींत बहुतांश कॅथलिक समाजाचा अंतर्भाव होते. इतर नेते मंडळी नरो वा कुंजरोवा सारखे वागून आपली प्रतिमा व राजकीय स्थान अबाधित ठेवणे अधिक पसंत करतात. पक्षाच्या पुनर्बांधणीचे काम ज्या वेगाने नि शिस्तीने व्हायला पाहिजे होते ते होत नाही. त्याचा परिणाम येत्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला भोगावा लागेल. पक्षनिष्ठा व स्वच्छ चारित्र्य असे निकष लावून प्रदेशाध्यक्षपदी जॉन फर्नांडीस यांची नेमणूक पक्षश्रेष्ठींनी केलेली असली तरी सर्वांना घेऊन पुढे जाण्याचे कौशल्य फर्नांडीस यांच्यामध्ये नाही असे दिसते. पक्ष कार्यकारिणींचे पदाधिकारी व आमदारांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही असे तुणतुणे वाजवून काम होणार नाही, याचे भान फर्नांडीस यांनी ठेवावे. कॉंग्रेस पक्षात घराणेशाही चालविली जाते. ठराविक नेत्यांचेच वर्चस्व राहते अशी टीका करणारे आहेत. त्याचा विरोध नेमका त्या व्यक्तींना आहे की स्वतःच्या तुंबड्या भरण्याची सुवर्णसंधी त्यांना लाभत नाही या वैफल्यामुळे आहे, याचा शोध घेणे कठीण नाही. या मंडळींनी आजपर्यंत जे केले, त्याचाच कित्ता त्यांनी पुढे चालवायचा आहे, हे सूचित होते. गत विधानसभा निवडणुकीत अशा नेत्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखविली. त्यामुळे पराभवाची नामुष्की कॉंग्रेसला भोगणे प्राप्त झाले. मतदारांचा विश्वास बसावा, मतदारांनी विश्वास ठेवावा असे वर्तन त्यांच्यामध्ये आढळत नसावे.
सध्या राज्यात अनेक प्रश्न व समस्या ‘आ’ वासून उभ्या ठाकल्या आहेत. सत्ताधारी भाजपाला मनोहर पर्रीकरांसारखे तडफदार मुख्यमंत्री व नेतृत्व लाभल्यामुळे कॉंग्रेसने कितीही टाहो फोडला तरी विरोधकांना पुरून उरेल अशी क्षमता पर्रीकरांकडे आहे. त्यामुळे भाजपाला राज्यातील जनता कंटाळली आहे व त्याचा लाभ आपल्या पक्षाला मिळेल अशी अपेक्षा कॉंग्रेस नेते बाळगत असतील तर तो निव्वळ भ्रम आहे. दक्षिण गोव्यात कॉंग्रेस समर्थकांना सर्वमान्य असा लोकसभा उमेदवार निवडण्यात यश लाभले तरच लढत रंगतदार होईल.
उत्तर गोव्यात परिस्थिती वेगळी आहे. ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळालीच पाहिजे असा हट्ट धरला गेला तर त्याचा फायदा भाजपाला मिळू शकतो. उत्तर गोव्यात कॉंग्रेसला प्रभावी उमेदवार निवडणे कठीण होऊन बसले आहे. माजी केंद्रीयमंत्री ऍड. रमाकांत खलप याचे नाव पुढे येत आहे. जितेंद्र देशप्रभू हेही स्पर्धेत आहेत. पण मागील लोकसभा निवडणुकीत पराभवाची नामुष्की त्यांच्या पदरी आली होती. भाजपाचे आमदार विष्णू वाघ यांचे सध्या पक्षनेत्यांशी बिनसले आहे. त्यांचे वक्तव्य तडफदार व आक्रमक असले तरी तशी कृती त्यांच्याकडून अपेक्षित ठेवावी काय हा एक गंभीर विचार करण्यासारखाच प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवर त्यांनी आपला दावा केला आहे. उमेदवारी न मिळाल्यास ते पक्षत्याग करून कॉंग्रेस पक्षाशी पुनश्च नाते जोडतील अशा भ्रमात कॉंग्रेस नेत्यांनी राहू नये, कारण वाघ निदान आता तरी पूर्ण विचारांती निर्णय घेतील अशी आशा आहे. भाजपाला रामराम ठोकून कॉंग्रेसचा हात हाताशी धरून राजकीय नेमबाजी केली म्हणून हेतू साध्य होईल हे कशावरून? अन्यथा, तूप गेले, तेल गेले नि हाती आले धुपाटणे, अशी अवस्था होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
उत्तर गोव्यात भाजपाचे वर्चस्व आहे. विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांचा जनसंपर्क केव्हाच तुटलेला आहे. लोकसभा निवडणुका अजून जाहीर व्हायच्या आहेत, पण खासदार नाईक यांनी प्रचाराचा धुमधडाका लावला आहे. कार्यकर्त्यांची भक्कम फळी निर्माण करणे, मतदारांशी सतत संपर्क ठेवणे, लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी करून खासदार निधीचा योग्य वापर करणे आदी गोष्टी त्यांनी पूर्ण क्षमतेनिशी गेल्या पाच वर्षांत सातत्याने केल्या आहेत. या एकूण पार्श्वभूमीवर उत्तर गोव्यात कॉंग्रेसच्या उमेदवाराला श्रीपादभाऊंशी टक्कर देणे कठीण होईल.
राष्ट्रीय कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये फूट पडली तर मग ‘सोन्याहून पिवळे’ अशी राजकीय पूरक नि लाभदायक परिस्थिती निर्माण होऊन तिचा लाभ भाजपा उठवील. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा कॉंग्रेस पक्ष लढविणार आहे. पक्षाची एकूण जनमनातील प्रतिमा नि उमेदवारांची कार्यक्षमता त्या निकषांवर मतदारांचा कौल अवलंबून असेल अशी राजकीय परिस्थिती आहे. गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनाही त्याची पूर्ण कल्पना आहे. परंतु फाटत जाणार्या आभाळाला कुठे नि कसे कसे म्हणून ठिगळ जोडणार, हा प्रश्न सिंग यांना भेडसावत आहे. या पक्षाने आपल्या घरात काय चालले आहे, त्यासंबंधी आत्मपरीक्षण करावे. वेळ मर्यादित आहे. निवडणूकपूर्व काळांत ही कामगिरी चोखपणे बजावून त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात जनतेसमोर यावे लागेल हे नक्की! भाजपा पूर्ण सावध नि क्रियाशील आहे, याचे भान कॉंग्रेस नेत्यांनी ठेवावे!