पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारणार काय असा थेट प्रश्न राहुल गांधी यांना मुलाखतकर्त्याने विचारला असता त्यांनी स्पष्ट उत्तर मात्र दिले नाही. ते म्हणाले की आपला पक्ष लोकशाही मानणारा आहे.
भारतीय जनता आपल्या निवडलेल्या प्रतिनिधींद्वारे या देशाचा पंतप्रधान कोण होईल हे ठरवील. देशहिताच्या दृष्टीने कॉंग्रेस सत्तेवर येण्याची गरज आहे आणि त्यासाठी पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण निष्ठापूर्वक पार पाडणार असल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेस पक्ष आम आदमी पक्षापासून बोध घेईल असे म्हटले आहे त्यावर भाष्य करण्यास सांगितले असता राहुल म्हणाले की, कॉंग्रेस ही एक मजबूत व गतीमान संघटना आहे. कॉंग्रेसने याआधीही देशाच्या राजकीय स्वरूपात बदल केला व भविष्यातही बदलेल. आपण जेव्हापासून राजकारणात आलो तेव्हापासून आम्ही सर्व यावर चर्चा करीत आलो आहोत. यापैकी काही गोष्टींची आम आदमी पक्षाने अंमलबजावणी केली आहे. मात्र आमची भूमिका वेगळी आहे. आपण त्यांच्या (आप) अनेक पध्दतींशी सहमत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता व भाजपाच्या कॉंग्रेसमुक्त भारत या मुद्द्यांवरही राहुल गांधींनी भाष्य केले. यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भाजपा एक व्यक्ती आधारीत सत्ता मिळवू पाहत असल्याचा दावा केला. ही गोष्ट देशहितासाठी योग्य नाही. सत्ता कोणा एका व्यक्तीच्या विचाराने व त्याच्या पध्दतींनी चालता कामा नये असे ते म्हणाले. सर्वांना बरोबर घेऊनच १२० कोटी नागरिकांचे भवितव्य घडवले जाऊ शकते असा विचार त्यांनी मांडला.
भाजपा कॉंग्रेसमुक्त भारताच्या बाता करत आहे. मात्र एक बाब हा पक्ष समजून घेत नाही की कॉंग्रेस हीच एक अशी राजकीय शक्ती आहे ज्या पक्षाने देशातील लोकांना जोडून ठेवले असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.
आपली बहीण प्रियांका ही निवडणूक लढवेल असे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रियांका आपली बहीण व दोस्तही आहे. त्याचवेळी ती कॉंग्रेसची सक्रीय कार्यकर्तीही आहे. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तिची आपल्याला मदत होत असते असे त्यांनी सांगितले.