Home बातम्या नरेंद्र मोदींची आज ‘विजय संकल्प’ सभा

नरेंद्र मोदींची आज ‘विजय संकल्प’ सभा

0
या सभेसाठी नरेंद्र मोदी व राजनाथ सिंह यांचे आज गोव्यात आगमन होणार आहे. सभा संध्याकाळी ४ वा सुरू होणार असून समारोप ७ वा. होईल. सभेत नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह हे दोन राष्ट्रीय नेते व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, खासदार श्रीपाद नाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोझा, आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उद्योगमंत्री महादेव नाईक यांची भाषणे होणार आहेत.

दरम्यान, मोदी यांना गोव्यासाठी खास दर्जा, खाण बंदी, दुहेरी नागरिकत्त्व आदि प्रश्‍नांची कल्पना देण्यात आली असल्याचे परवा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले होते. आजच्या सभेत मोदी गोव्यातील प्रश्‍नांवर काय मत प्रदर्शित करतात ते पाहावे लागेल.

३ हजार चौ.फूट जागेत व्यासपीठ

या सभेसाठी सुमारे ३ हजार चौ.फू. जागेत भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आलेले आहे. आतापर्यंत गोव्यात एखाद्या जाहीर सभेसाठी उभारण्यात आलेले अशाप्रकारे हे सर्वांना मोठे असे व्यासपीठ ठरले आहे. तर जाहीर सभा १ लाख ४० हजार चौ.फू. जागेत होणार आहे. विजेच्या व्यवस्थेकरिता दीडशे वीज खांबही उभारले आहे.

पोलिसांची बैठक

सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी काल पोलिसांच्या बैठका झाल्या. विविध ठिकाणांहून पोलिसांच्या तुकड्याही काल गोव्यात दाखल झाल्या. गुजरातहून ६० पोलिसांचे खास पथकही गोव्यात दाखल झाले. महाराष्ट्रातून राखीव दलाचे ३६० जवान गोव्यात दाखल झाले.

२ हजार बसेस, दीड लाख उपस्थिती

सभेसाठी शनिवारपर्यंत १ लाख २८ हजार लोकांनी ५ रु. भरून नोंदणी केली होती. आज रविवारपर्यंत हा आकडा दीड लाखावर पोचण्याची शक्यता भाजप सूत्रांनी व्यक्त केली. सभास्थानी लोकांना आणण्यासाठी २ हजार बसेस भाडेपट्टीवर घेतल्या आहेत. कर्नाटकातून २०० बसेस आणल्या आहेत.

पार्किंगची खास व्यवस्था

सभास्थळी गाड्या घेऊन येणार्‍या लोकांच्या गाड्या पार्क करून ठेवण्यासाठीच्या पार्किंग व्यवस्थेची तयारी पूर्ण झालेली आहे. सभेसाठी नोंदणी केलेले सर्व लोक सभेसाठी हजर रहावेत यासाठी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी काल गावागावात फिरून सभेला हजर राहण्याचे जातीने आमंत्रण देत होते. सभेच्या तयारीसाठी स्थापन केलेल्या विविध समित्यांच्या पदाधिकार्‍यांनी काल सभेचा अंतिम आराखडा घेतला.
सभेसाठी कधी नव्हे एवढी सभेसाठी जाहिरातबाजी करण्यात आलेली असून सर्व शहरांत तसेच विविध गावात नरेंद्र मोदी, मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक व राजनाथ सिंह यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. राजधानीतील काही भागांत खास सजावटही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, खासदार श्रीपाद नाईक, अध्यक्ष विनय तेंडुलकर व अन्य नेत्यांनी यापूर्वी गोवाभरात फिरून या सभेसाठीची जागृती केलेली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा तसेच महिला मोर्चा यानीही या सभेच्या प्रचारासाठी गोवा पिंजून काढलेल्या असून कालही लोकांशी संपर्क साधणे त्यांनी चालूच ठेवले होते.

स्मृती इराणींकडून पाहणी

भाजपच्या गोवा प्रभारी स्मृती इराणी यांचे गोव्यात आगमन झालेले असून काल त्यांनी मेरशी येथे जाऊन सभास्थळाची पाहणी केली. तद्नंतर संध्याकाळी स्मृती इराणी व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सभेविषयी माहिती दिली.

वाहतूक व्यवस्थेत बदल

आज मेरशी येथे होणार असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त वाहतूक/पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
अवजड वाहनांना आज दुपारी १२वा.पासून सभा संपेपर्यंत पणजी व मेरशी येथे महामार्ग १७ आणि ४ए वापरता येणार नाही. ही वाहने करासवाडा-म्हापसा व बाणस्तारी येथून पर्यायी मार्गाने वळविली जातील.
सभास्थळी लोकांना घेऊन येणार्‍या बसेस संबंधित पार्किंग स्थळांवर पार्क केल्या जातील. फोंड्याहून येणार्‍या बसेस सभास्थानानजीक चिंबल जंक्शनकडे पार्क कराव्या लागतील. दक्षिण गोव्यातून येणार्‍या बसेस हॉटेल आलुआ नजीकच्या मोकळ्या जागेत उभ्या केल्या जातील. तर उत्तर गोव्याहून येणार्‍या बसेस सभास्थानासमोरच्या जागेत पार्क केल्या जातील. 
– दुचाकी वाहने सभास्थळामागच्या जागेत पार्क करावी लागतील.
-चार चाकी वाहने पार्क करण्यासाठी सभास्थळासमोरची तसेच मेरशी रस्त्याला लागून जागा आहे.

मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसारखे राहावे : पर्रीकर

मुख्यमंत्र्याने साधे राहावे पण मुख्यमंत्र्यांसारखे राहावे असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. लाल दिवा आवश्यक असतो का या प्रश्‍नावर ते म्हणाले की, लाल दिवा काढावा का याचा आपण विचार करीत होतो, मात्र काही सरकारी कामांसाठी लाल दिवा गरजेचा असतो असे ते म्हणाले.