देशाला विकासपथावर न्यायचे असेल तर आधी ‘व्होट बँक’ राजकारण नष्ट झाले पाहिजे. कॉंग्रेसने आपल्या स्वार्थासाठी देशात लोकांना विभागून ‘व्होट बँक’ तयार करण्याचे सत्र चालविले आहे, असे ते प्रचंड जनसमुदायाल संबोधित करताना पुढे म्हणाले.
मोदींनी मराठीतून भाषण सुरू करून नंतर हिंदीतून त्यांनी भाषण केले. वांद्रे येथील भव्य मैदानावर त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मोदी म्हणाले की, स्वत:च भ्रष्टाचारात बरबटायचे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बोलायचे अशी कॉंग्रेसी निती असल्याचे मोदी म्हणाले. कॉंग्रेसला भ्रष्टाचाराविरुद्ध बोलायचा काहीच नैतिक अधिकार उरलेला नसल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी परवा उद्योगपतींसमोर कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध भूमिकेबाबत वक्तव्य केले होते, त्याचा हवाला देत मोदी म्हणाले की, इकडे महाराष्ट्रात आदर्श घोटाळ्यातील आरोपींना सरकार सोडून देते तर तिकडे यांचे नेते भ्रष्टाचाराविरुद्ध व्याख्याने देत आहेत.