मारहाणीचा हा प्रकार काल दुपारी ३ वा.च्या सुमारास घडला.
नितेश राणे यांच्यासह इतरांना अटक झाल्यानंतर खासदार नीलेश राणे आपल्या समर्थकांसह पेडणे पोलीस स्थानकावर दाखल झाले. नंतर पत्रकारांशी बोलताना या घटनेविषयी नीलेश राणे यांनी जाहीर माफी मागितली. गोवा आणि महाराष्ट्राचे नाते अतूट असून ते नाते तसेच रहावे. अशा प्रकाराची पुनरावृत्ती घडू नये असे ते म्हणाले.
हजारो कार्यकर्ते पोलीस स्टेशनवर
नितेश राणे व समर्थकांना पेडणे पोलिसांनी अटक केल्याचे कळताच सावंतवाडी, कुडाळ, सातार्डा, शिरोडा, वेंगुर्ला या भागातील व गोव्यातील काही नामवंत कार्यकर्ते व समर्थकही पेडणे पोलीस स्टेशनवर जमा झाले होते. कायदा सुव्यवस्था बिघडते की काय अशी परिस्थिती उद्भवणार तोच पेडणे पोलिसांनी गेट बंद करून दोरखंडाने कडे तयार केले, मोठ्या प्रमाणात पोलीस व जवान हजर होते. स्थानिक नागरिकही हजर होते.
कडक कारवाई करा : भाजपा
पेडणे भाजपा कार्यकर्ते शिवप्रसाद जोशी व व्यंकटेश घोडगे यांनी या प्रकराविषयी जाहीर निषेध व्यक्त करून संशयितांवर कडक कारवाई करावी अन्यथा गोवा बंद करण्याचा इशारा दिला.
या सविस्तर माहितीनुसार नीलेश राणे हे आपल्या समर्थकांस सावंतवाडीहून वास्को विमानतळावर जाण्यासाठी (एमएच ०३ एआर ३२४१ व एमएच ०२०जी ३२) व इतर दोन मिळून चार वाहनांतून दुपारी २.३० वाजता जात असता धारगळ येथील टोलनाक्यावर वाहने टोल वसुलीसाठी तेथील कर्मचार्यांनी अडवली असता त्यांनी तिथल्या ३ कर्मचार्यांना मारहाण केली व टोल नाक्यावरील यंत्रांची मोडतोड केली. यामुळे ५०,००० हजार रुपयांचे नुकसान झाले. या कर्मचार्यांना मारहाण करून ते कळंगुट येथे गेले. त्यानंतर पोलिसांनी कळगुंट येथे जाऊन त्यांना अटक केली.
टोल नाक्यावरील कर्मचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार टोल वसुलीसाठी संशयितांची वाहने अडवली असता त्या लोकांनी वाहने कुणाची अडवता, आम्ही कुणाची माणसे याची कल्पना आहे का? असा प्रश्न करून सरळ कर्मचार्यांवर धावून गेले व त्यांना मारहाण केली. टोल नाक्यावरची गेट मोडून टाकली व टोल यंत्रणा मोडली. जखमी कर्मचार्यांना तुये हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले.
पोलीस स्थानकावर गर्दी
संशयितांना अटक केल्याची वार्ता कळताच पोलीस स्टेशनवर गर्दी जमली. नीलेश राणे व नितेश राणेंच्या समर्थकांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळी खासदार निलेश राणे स्वतः पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन कार्यकर्त्यांना शांत करत होते. संशयितांना अटक केल्याचे समजताच सावंतवाडी व सिंधुदुर्गातून अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गाड्या घेऊन आले. टोल नाक्यावर मारहाण केल्याची तक्रार पंकज नार्वेकर यांनी पेडणे पोलीस स्थानकावर केली.