सोमवारी रात्री पोलीस निरीक्षक सुरज वळवईकर यांच्या नेतृत्वाखालील अमली पदार्थ विरोधी पोलिसांनी ‘म्हापसा तारीर’ येथे धाड घालून सुमारे ६७ लाख रुपये किंमतीचे ६६६ ग्रॅम हेरॉईन जप्त करून भवरलाल फकिराम मेघवाल (२२), जीगर रविलाल पटेल (२३) या दोघांना अटक केली.
मेघालाल हा हरवळे-साखळी येथील रुद्रेश्वर वसाहतीत वास्तव्य करीत असून तो गेल्या पाच वर्षापासून सुतारकाम करीत आहे. तर पटेल हा शारदा नगर डिचोली येथे राहात आहे. ते मूळ राजस्तांनी असल्याचे सांगण्यात आले. वरील अंमली पदार्थ बाजारात दाखल होण्यापूर्वी संशयित आरोपींना गजाआड करण्याची पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. या पोलीस पथकात उपनिरीक्षक तेरेन्स डिसोझा, दिनेश डी. गडेकर, हितेंद्र नाईक, सिताकांत नाईक, तर पोलीस शिपाई नितेश मुळगावकर, अमर कोनाडकर, रुपेश कांदोळकर, रणजीत सावंत, सुशांत महाले व सुशांत पागी यांचा समावेश होता. पर्यटन हंगाम सुरू झाल्याने किनारी भागातही अमली पदार्थ गैरव्यवहारास उत आल्याचे वृत्त मिळाल्याने पोलीस पाळत ठेऊन आहेत.