– पुष्पाग्रज
घरी आल्यावर मी हा विषय विमलपाशी काढला. तिची प्रतिक्रिया अशी होती- ‘‘एक लाख रुपयांत युरोप टूर? झक मारीत गेला तो टूर. त्यापेक्षा आमचा पप्पी (म्हणजे मुलगा अक्षय) आम्हाला कॅनडाला नेण्याची तयारी करतो आहे. त्याची वाट पाहू. तुम्हाला प्रवासाची एवढीच हौस असेल तर आपण शनि-शिंगणापूरला जाऊ. वाटेत वाडीचा मोतीतलाव पाहू. पुढे कोल्हापूरचा रंकाळा तलाव पाहू आणि शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेऊन येऊ.’’
मी म्हटलं, ‘‘अग, हे तू पूर्वीही केलं आहेस. आता जरा देशाबाहेर डोकावून पाहू. आज आपण धडधाकट आहोत. उद्या पाय थकल्यावर कसलं फिरणं आणि कसलं काय…! शिवाय लंडन, पॅरिस, इटली, रोम…’’
हे शब्द ऐकल्यावर तिची कळी खुलल्यासारखी वाटली. पुढचे चार दिवस मी तिला अशी भव्यदिव्य स्वप्ने दाखवत राहिलो. दरम्यान, थॉमस कुकमधून एकसारखी विचारणा होत होती. अखेर आमची विमलेश्वरी ऊर्फ अश्विनीदेवी प्रसन्न झाली.
आजवर मी माझ्या पगारातून तिला देत आलेलो अधिकृत रक्कम आणि माझ्या नकळत माझ्या खिशातून ती काढीत असलेल्या अनधिकृत रकमेची ती गोळाबेरीज करू लागली. तिच्याकडे अशा प्रकारे अडीच लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा असल्याचे पाहून मी चाटच पडलो. कारण ऑफिसात कंपनीकडून दरमहा कट केल्या जाणार्या ठरावीक रकमेव्यतिरिक्त आयुष्यात मी कसलीच बचत केली नव्हती. मग मीही तिला एक आनंदाचा धक्का दिला. तुझे पैसे तुझ्याकडेच ठेव म्हणालो. कारण एव्हाना प्रोव्हीडंट फंडचे साताठ लाख माझ्या खात्यात जमा झाले होते. शिवाय मागच्या तीन महिन्यांत एकामागोमाग एक अशा माझ्या इन्शुरन्सच्या तीन पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्याने तेही सुमारे अडीच लाख बँक खात्यात होते. हिच्या आणि माझ्या नावावर बँकेत फिक्सड् डिपॉझिट्सही होती. त्यांना मात्र हात लावायचा नाही असे मी ठरवले. एकंदरीत या परदेशवारीसाठी खर्चाची तरतूद होत आली होती. त्यातच कॅनडाहून पप्पीचा फोन आला- ‘‘डॅडी, तुम्ही युरोप टूरला जात असाल तर मी थोडी रक्कम पाठवतो.’’ मी म्हटलं, तूर्त नको!
थॉमस कुकच्या ऑफिसात मी पुन्हा पाय ठेवला. इथल्या पोरींना गिर्हाईकांची देहबोली बहुधा वाचता येत असावी. ‘‘वेलकम सर!’’ जेस्मिनने स्वागत केले. ‘‘आय ऍम शुअर, यू हॅव कम विथ पॉझिटिव्ह डिसिजन!’’
पुढे युरोप टूरसाठीचे दोघांचे शुल्क, तेथील हवामान, भारतीय भोजन इत्यादींविषयी चर्चा झाली. पंधरा दिवसांच्या या टूरसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये तिकिटाचे दर ऐकून सुरुवातीस मी थोडा हादरलो. ‘तुम्हाला ३४ हजार रुपयांचा डिसकाऊंट देण्यात आला आहे’ हे वाक्य ऐकल्यावर त्यातल्या त्यात थोडे बरे वाटले. परंतु लगेच ती पोरगी म्हणाली, ‘‘प्रत्यक्षात तुम्हा दोघांसाठी चार लाख ३४ हजार फेडावे लागले असते, पण ३४ हजारांची विशेष सूट तुम्हाला दिली गेली आहे.’’ हे ऐकून मी मनातल्या मनात वरमलो. केवढे हे उपकार! हे म्हणजे एखाद्या मॉलमध्ये २५ हजारांची खरेदी केल्यावर पाच रुपयांचं पेन भेट देण्यासारखं होतं. पण आता माघार घ्यायची नाही असं मी ठरवलं. ‘काय होईल ते होऊ दे| कोर्टात जाऊ दे| फिकीर त्याची तू करू नको|’ हे दादा कोंडकेंचं गाणं मला उगाचच आठवलं.
आता आमची चर्चा डोकुमेंट्सवर आली. आमचे पासपोर्ट तयार असल्याने आणखी काही डोकुमेंट्सची गरज नसावी असा माझा समज होता; पण तो खोटा ठरला. जेस्मिन म्हणाली, ‘‘व्हिसासाठी अर्ज करताना आम्हाला तुमच्या स्थावर जंगम इस्टेटीची माहिती लागणार आहे.’’
मी म्हटलं, ‘‘हे आणि काय लचांड? स्थावर जंगम मालमत्ता?’’ या मुलीशी बराच परिचय झाला होता, त्यामुळे जरा गमतीने म्हटले, ‘‘मिस जेस्मिन, खरं सांगू का… माझ्या वडलांकडून मला वारसा हक्काने एकच चीज मिळाली ती म्हणजे मधुमेह!’’ ती थोडी हसली आणि म्हणाली, ‘‘यू मेक ज्योक्स टू! आय थॉट यू आर अ व्हेरी सिरियस पर्सन. व्हेरी गूड! आय लाईक्ड इट… बट, परदेशी कायद्यानुसार हे सगळं आवश्यक आहे.’’
‘‘पण आमच्याकडे कुठून आलीय संपत्ती! आयुष्यभराच्या पुंजीतून ही थोडी रक्कम आम्ही थॉमस कुकच्या जुगारावर लावतो आहोत, एवढंच. तुम्हाला मराठीतील एक ओवी सांगतो…’’
एकाचवेळी दोन प्रवासी गळाला लागत असल्याने ही मुलगी काहीही ऐकून घेण्याच्या तयारीत होती. मी तिला सांगू लागलो- ‘‘आम्हा घरी धन| शब्दांचीच रत्ने| शब्दांचीच वस्त्रे| यत्ने करू|’’ हे सगळं तिच्या डोक्यावरून गेलं.
‘‘यू नो तुकाराम?’’
‘‘हू इज धीस तुकाराम?’’
‘‘हीज फुल नेम इज तुकोबा बोल्होबा आंबिये.’’
‘‘इज ही जॉयनिंग धीस टूर?’’ जेस्मिनच्या या प्रश्नाने तिला तुकारामांविषयी आणखी काही सांगायच्या फंदात मी पडलो नाही.
‘‘एनी वे.’’ जेस्मिन म्हणाली, ‘‘इंग्लंडच्या कायद्यानुसार तुम्हाला हे सगळे सोपस्कार पार पाडावेच लागतील. तुमच्या तेथील वास्तव्यातील कोणतीही जबाबदारी ते सरकार घेत नाही. तुमचं काही बरंवाईट झालं तरी…’’ म्हणजे साध्या शब्दांत सांगायचे तर तुम्ही तिथे मेला तरी भारतात परतण्यासाठीच्या शवपेटीची व्यवस्थादेखील प्रत्येकाने आपणच आगाऊ करायची असते. हे म्हणजे भारीच झालं. पर्यटक म्हणून आम्ही तिथे जो खर्च करू त्याची मलई ते देश खातील आणि आम्हाला वार्यावर सोडायचं?
‘‘तुम्ही असं करा, तुमचे बँकेचे पासबूक, इन्शुरन्स पॉलिसी, एफडी, पोस्टल सेव्हींग्ज सर्टिफिकेट्स जे काय असेल त्याच्या झेरॉक्स प्रती आमच्याकडे आणून द्या. शिवाय तुमचे कधी सत्कार वगैरे झाले असतील तर ते फोटोही आणा. युअर स्टेट्स इन धी सोसायटी मे इज धी प्रोसेस ऑफ युवर व्हिसा. तुमची प्रकाशित पुस्तकं आणली तरी चालतील. या सर्व वस्तू आम्ही तुम्हाला मागाहून परत करू.’’
मी घरी आलो. पगाराप्रमाणेच बायकोला युरोप सहलीच्या खर्चाचा आकडा निम्म्याने कमी सांगितला. आपण युरोपला जाणार या विचारानेच माझे मन रोमांचित झाले होते. एका बाजूने माझ्या मनात रोमचा झुलता मनोरा झुलत होता तर दुसर्या बाजूने मी माझ्या संपत्तीची मोजणी करीत होतो. अमुक एका रकमेची हमी मिळाली नाही तर व्हिसा मिळण्यात अडचणी येतात असे मला कळले होते. मी कपाटातील माझ्या पुस्तकांवर नजर फिरवली. ही सहा-सात पुस्तके प्रकाशित करणार्या प्रकाशकांनी ती प्रकाशित न करता तो पैसा मलाच दिला असता तर… शिवाय त्यांच्या प्रकाशन समारंभावर दर खेपेला मी जो खर्च केला तो जमेस धरता मी एव्हाना अर्धा युरोप पाहून आलो असतो असाही एक विचित्र विचार डोक्यात आला. माझ्या या सर्व पुस्तकांच्या किमतीची मी बेरीज केली असता ती सातशे रुपयांच्या पुढेही जात नव्हती. त्यातले पहिले पुस्तक तर तीस वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले व त्याची किंमत होती अवघे वीस रुपये. आजवरच्या लेखनकामाठीतील आपली कमाई अवघी सातशे रुपये आहे हे कळून चुकल्यावर हवेत तरंगणारे माझे पाय धर्मराजाच्या रथाप्रमाणे पहिल्यांदाच जमिनीला टेकले.
आता माझ्या सामाजिक स्टेट्सबद्दल बोलायचं झाल्यास आजवरच्या अनेक ‘सत्कार’ समारंभांतील फोटो माझ्या नेहमीच्या गबाळ्या स्वभावानुसार मी हरवून बसलो होतो. अलीकडच्या काळातील एक फोटो मात्र माझ्यापाशी होता. पुण्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार स्वीकारतानाचा तो फोटो होता. मात्र महाराष्ट्रातील बंधारे, पाटबंधार्यांप्रकरणी अजितदादांचीच पत पणाला लागली होती. त्यामुळे हे प्रशस्तिपत्र किंवा हा प्रशस्तिफोटो कितपत उपयोगी पडेल याची मला शंका वाटत होती. ही सर्व कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे, झेरॉक्स प्रतींचे अटॅस्टिंग करणे, सांपत्तिक स्थितीचे साक्षी-पुरावे आदी सर्व गोळा करण्यात १०-१५ दिवस गेले. नोकरी सांभाळीत ही सर्व धावपळ मला करावी लागत होती. कारण पुढे सुटी मिळणे गरजेचे होते. अखेरीस एक दिवस यू.के.चा व्हिसा मिळाला असल्याचा फोन थॉमस कुककडून आला आणि एटीकेटी मिळवीत परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्याप्रमाणे मी समाधानाचा सुस्कारा सोडला. पण हा सुस्कारा मिटतो न मिटतो तोच युरोपातील काही देशांसाठी ‘शेंजेन’ व्हिसा मिळवणे प्राप्त असल्याचे मला सांगण्यात आले. त्यासाठी पुन्हा नवी कागदपत्रे सादर करायची होती. आता मात्र भीक नको पण कुत्रे आवर म्हणण्याची पाळी माझ्यावर आली. शेवटी एकदाचा तोही मंजूर झाला. तरीही विमानात प्रत्यक्ष पाय ठेवेपर्यंत सुटकेचा सुस्कारा सोडण्यास माझे मन तयार नव्हते. (क्रमशः)