मूळ पालकांनी दत्तक दिलेला, ऐन तारुण्यात अंमली पदार्थांच्या आहारी गेलेला, अक्षरशः ‘हिप्पी’ बनून भारतात भटकणारा, मनःशांतीच्या शोधात बुद्धाला शरण गेलेला, मित्राच्या खोलीत जमिनीवर झोपून आणि पैशासाठी ‘कोक’च्या रिकाम्या बाटल्या विकून दिवस कंठणारा, ‘हरे राम हरे कृष्ण’ पंथाच्या अन्नछत्रात पोटाची भूक भागवणारा एक अवलिया आयुष्याच्या उत्तरार्धात यशाची प्रचंड शिखरे धडाधड चढत जातो, ज्या कंपनीने एकेकाळी हकालपट्टी केली, त्याच ‘ऍपल’मध्ये पुनरागमन करून तिच्या यशाची ध्वजा जगभरात फडकावतो आणि बघता बघता तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनतो. नियतीच्या अतर्क्यतेचे अचंबित केलेले हे उदाहरण म्हणजे स्टीव्ह जॉब्सची जीवनकहाणी. काल त्याचे दीर्घ आजारपणाने निधन झाले, परंतु त्याच्या कल्पकतेतून आणि परिश्रमांतून साकारलेली ‘ऍपल’ची अब्जावधी उत्पादने आज जगभरात त्याच्या प्रतिभेची साक्ष देत कार्यरत आहेत. संगणक उद्योग आणि मोबाईल उद्योगाची समीकरणे तर स्टीव्हने आपल्या कर्तबगारीने उलटीपालटी केलीच, परंतु संगीत आणि चित्रपटसृष्टीमध्येही त्याने प्रचंड खळबळ माजवणारी तांत्रिक क्रांती घडवून आणली.
‘ऍपल’ हे नाव आज त्यांच्या ‘आयपॉड’, ‘आयफोन’ आणि ‘आयपॅड’ मुळे ज्याच्या त्याच्या तोंडी आहे, परंतु याच कंपनीची स्थापना जेव्हा त्याचा मित्र स्टीव्ह वॉझनिक याच्या भागिदारीत त्याने केली, तेव्हा म्हणजे ७० च्या दशकात संगणक ही चीज वैयक्तिक वापरासाठी उपलब्ध होऊ शकते ही कल्पनाही कोणाच्या डोक्यात नव्हती, अशा वेळी ते स्वप्न स्टीव्ह जॉब्सने पाहिले. ‘ऍपल टू’ या संगणकाच्या माध्यमातून ते साकार केले. ‘पेप्सी’ सारख्या तेव्हाच्या बलाढ्य कंपनीतून जॉन स्कलीला आपल्या कंपनीत खेचून आणण्यास स्टीव्हचा ‘तू आयुष्यभर काय साखरेचे पाणीच विकत बसणार आहेस? की आमच्यासोबत येऊन जग बदलणार आहेस?’ हा सवाल कारणीभूत ठरला होता. पुढे कंपनीवरील वर्चस्वाच्या सत्तासंघर्षात याच स्कलीने खुद्द स्टीव्हचीच कंपनीतून हकालपट्टी केली. पण यशस्वीपणाच्या या जडपणाचा त्याग केल्याने नवखे असल्याच्या हलकेपणातली गंमत आपल्याला कळू शकली असे म्हणत पुन्हा नव्याने कारकिर्दीची सुरूवात स्टीव्हने केली. संगणकांद्वारे तयार केलेल्या ग्राफिक्सचा वापर चित्रपट माध्यमामध्ये यशस्वीपणे करून दाखवण्याची किमया त्याच्यामुळेच साकारली. ‘टॉय स्टोरी’ चा निर्माता म्हणून स्टीव्हने केलेल्या कामगिरीतून चित्रपटांमध्ये ग्राफिक्सचा यशस्वी वापर करण्याचे नवे क्षितिज निर्मात्यांना खुले झाले. दरम्यानच्या काळात डबघाईस आलेल्या ‘ऍपल’ मध्ये स्टीव्हचे झालेले पुनरागमन आणि १९९७ ते ऑगस्ट २०११ मध्ये अनारोग्यामुळे पायउतार होईपर्यंतच्या कालखंडातील त्याचे तेथील नेतृत्व हा तर विस्मयकारी अध्याय आहे. डबघाईस आलेली ही कंपनी त्याने नुसती सावरलीच नाही, तर तिला उत्तुंग यश दिले. त्याने ‘आयपॉड’ बाजारात उतरवले आणि त्याला पूरक अशा ‘आय ट्यून्स’ ची संकल्पना पुढे आणली, तेव्हा ‘पायरसी’ मुळे जेरीस आलेल्या संगीत उद्योगाला नवा दिलासा मिळाला. लोकप्रिय गाणी इंटरनेटवरून चोरून डाऊनलोड करणार्यांना ‘आयट्यून्स’द्वारे अधिकृत स्वरूपात ती उपलब्ध झाली. स्टीव्हचे दुसरे यशस्वी उत्पादन होते ‘आयफोन’. इतर सर्व उपलब्ध स्मार्टफोनपेक्षा प्रगत आणि सफाईदार असा हा स्मार्टफोन प्रचंड लोकप्रिय ठरला. तो खरेदी करण्यासाठी रांगा लागू लागल्या. त्याच्या लोकप्रियेवर स्वार असतानाच स्टीव्हने तिसरे क्रांतिकारी उत्पादन बाजारात उतरवले ते म्हणजे ‘आयपॅड’. शाळेतल्या पाटीची आठवण करून देणार्या आयपॅडनेही धमाल माजवली. कंपनीच्या उत्पादनांबाबतची कमालीची गोपनीयता त्याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण करीत असे आणि एखाद्या शोमनच्या दिमाखात स्टीव्ह नवी उत्पादने जगासमोर आणायचा. स्टीव्हपाशी ‘कलाकाराचा डोळा आणि अभियंत्याचा मेंदू’ होता असे गमतीने म्हटले जायचे. पण खरोखरच त्याच्या द्रष्टेपणाचा आणि मेहनतीचा ‘ऍपल’च्या आजच्या यशात मोठा वाटा आहे. ‘त्याच्यामुळे जग आज अधिक सुंदर बनले आहे’ अशा शब्दांत त्याच्या ‘ऍपल’ने त्याला काल श्रद्धांजली वाहिली ती सार्थ आहे!