Home बातम्या नायजेरियन टोळक्याला १४ दिवसांचा रिमांड

नायजेरियन टोळक्याला १४ दिवसांचा रिमांड

0

पर्रा येथे बुधवारी मध्यरात्री हत्या झालेल्या ओबोडो उझोमा सायमन या ३० वर्षीय नायजेरियन तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त बनलेल्या त्याच्या सहकार्‍यांनी पर्वरीत राष्ट्रीय महामार्ग रोखून हैदोस घातला होता. स्थानिक नागरिकांनी त्यांच्यापैकी दोघांना मग बेदम मारहाण केली होती. या नायजेरियन टोळक्याविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला होता.

काल या सर्व नायजेरियन तरुणांना म्हापशात न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तीन मोठ्या व्हॅनमधून त्यांना कडक बंदोबस्तात न्यायालयात नेण्यात आले. बंदूकधारी पोलिसांनी यावेळी कडक पहारा ठेवला होता. पोलीस उपअधीक्षक सेराफिन डायस, म्हापशाचे पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर, कळंगुटचे पोलीस निरीक्षक नीलेश राणे, हणजूणचे पोलीस निरीक्षक परेश नाईक तसेच म्हापसा, कळंगुट, हणजूण, पर्वरी आदी पोलीस स्थानकांतील पोलिसांचा मोठा फौजफाटा मागवण्यात आला होता. चोख बंदोबस्तात एकेका संशयिताला न्यायालयात नेण्यात येत होते.