– विष्णू सूर्या वाघ
(भाग-४)
सूरश्री केसरबाईंना गायनाची पहिली तालीम गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांच्याकडून मिळाली. पण ती जेमतेम दोन वर्षे. त्यानंतर केरकर कुटुंब मुंबईला आले. तिथे पाच वर्षे त्यांना सतारवादक उस्ताद बर्कतुल्लाखॉं यांचे मार्गदर्शन लाभले. काही दिवसांसाठी त्या पं. अल्लादियाखॉंचे शिष्य भास्करबुवा बखले यांच्याकडे गाणे शिकल्या. किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खॉंसाहेब यांचेही मार्गदर्शन त्यांनी काही काळ प्राप्त करून घेतले. पण यातल्या एकाही गुरूकडून त्यांना ना पूर्ण शिक्षण मिळालं, ना स्थैर्य. यातील प्रत्येक गुरूने त्यांना काही ना काही शिकवलं. आपल्या स्वतःच्या अशा खासियतीही दिल्या. पण कुणीच केसरबाईंना आपली ‘गायकी’ देऊ शकले नाहीत. केसरबाईंना आपली गायकी आणि आपलं घराणं खर्या अर्थानं जर कुणी दिलं असेल तर संगीतसम्राट उ. अल्लादियाखॉंसाहेबांनी! उस्ताद अल्लादियाखॉंसाहेब हेच केसरबाईंचे खरे गुरू आणि त्यांनी स्वतःहून जन्माला घातलेलं अतरौली जयपूर घराणं हेच केसरबाईंचं खरं घराणं.
केसरबाईंच्या एकूण गायकीचा आणि त्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास करताना त्यांच्या गुरूंची गायकी आणि त्यांची गानवैशिष्ट्ये यांचाही आढावा घेणे गरजेचे ठरते. त्या दृष्टिकोनातून अल्लादियाखॉंसाहेबांची कारकीर्द व त्यांच्या जयपूर घराण्याची मिळवलेली ही माहिती-
संगीतातील बहुधा सर्वच गायकी घराण्यांचे नाते संगीतसम्राट तानसेन यांच्याशी जोडले जाते. त्यानुसार जयपूर घराण्याचा मूळ पुरुषही तानसेनच गणला जातो. अप्रसिद्ध राग व ढेढी-बांकी गायकी गाणारे म्हणून या घराण्याचा मोठा लौकिक आहे. या घराण्याच्या गायकीने संगीताच्या आविष्कारात योजना दाखल केली, रचनासौंदर्याचे संकेत सांभाळले, ऐकणार्या श्रोत्यांचे मानस अधिक विचारात घेतले आणि हे सर्व करीत असतानाही विवक्षित रसिकांसाठी आपल्या मांडणीत वा कलाप्रकारात फेरफार केला नाही. खॉंसाहेब अल्लादियांना आपली गायकी रसिकांच्या मनावर प्रस्थापित करण्यासाठी बरीच वर्षे वाट पाहावी लागली. तब्बल एक्क्याण्णव वर्षांचे दीर्घ आयुष्य त्यांना लाभले. त्यातली शेवटची पन्नास वर्षे तर महाराष्ट्रातच गेली. सुरुवातीला कोल्हापूर आणि नंतर मुंबई. कलासक्त महाराष्ट्रात सर्वत्र त्यांच्या गायकीचं स्वागत आणि स्वीकारच झाला. तरीसुद्धा ‘जयपूर गायकी’ म्हणून जी रसिकांच्या परिचयाची झाली, तिचा शोध त्यांना स्वतःला लागेपर्यंत त्यांच्या उमेदीची बरीच वर्षे उलटून गेली होती.
अल्लादियाखॉं यांचा जन्म १० ऑगस्ट १८५५ रोजी राजस्थानमधील जयपूरजवळच्या उनियारा या गावात झाला. त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशातील अतरौली या गावावरून उनियारात येऊन स्थायिक झाले होते. संगीताची पूर्वपीठीका मुळापासून होतीच. ‘अतरौलीवाले’ म्हणून त्यांचे घराणे ओळखले जात असे. या घराण्याचा गायनविद्येतील लौकिक फार जुना व मोठा होता. ‘डागोर बानीवाले’ गायक अशी या मंडळींची कीर्ती होती. ख्याली गायकीला प्रारंभ होण्यापूर्वीच्या काळात संगीत हे सर्वस्वी शुद्ध ध्रुपदाच्या स्वरूपाचे होते. त्या काळातील मोठमोठ्या गायकांचा उल्लेख ‘धु्रपदिये’ असाच केला जात असे. परंतु ध्रुपद गाण्याची तर्हा त्या त्या गायकाच्या विद्येनुसार, स्वभावानुसार आणि कुवतीनुसार भिन्न भिन्न असे. स्थूल अंगाने अशा चार भिन्न तर्हा त्यावेळी मानल्या गेल्या होत्या व हे भिन्न पंथ अगर संप्रदाय ‘बानी’ या नावाने ओळखले जात असत. खंडार, गोवरहर, नौहार आणि डागोर अशी या बान्यांची नावं होती; आणि कोणीही गवयी भेटला की ‘आपकी बानी कौनसी?’ असा प्रश्न लोकांनी करावा व ‘मैं फलाना बानीवाला’ असं उत्तर त्यानं द्यावं हा त्या काळचा प्रघात होता. या चारी बान्या आपापल्या तर्हेने उल्लेखनीय मानल्या जात असत खर्या; तथापि विद्वत्ता, रंजकता, मार्दव, चमत्कृती इत्यादी सर्वच गुणांचा प्रत्यय डागोर बानीवाल्यांच्या गायकीत समुच्चयानं मिळत असल्यामुळं ती बानी अत्यंत श्रेष्ठ व पहिल्या दर्जाची समजली जात असे.
अल्लादियाखॉंचे वडील ख्वाजे अहमदखॉं हे त्यावेळच्या बड्या गायकांपैकी एक होते. परंतु अल्लादियाखॉंच्या बालपणातच ते वारल्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा लाभ खॉंसाहेबांना मिळाला नाही. चुलते जहांगीरखॉं यांच्याकडून त्यांना गायनाची तालीम मिळाली. त्या काळात जयपूर हे संगीतविद्येचे मोठे आश्रयस्थान होते व अनेक महान गायक-वादक जयपूरदरबारी राहून आपली सेवा पेश करीत होते. अल्लादियांच्या बालपणी मुबारक अलीखॉं कवाल, अहमदअलीखॉं, तानसेन परंपरेतील अलमसेन व हैदरबक्ष, सतारीये इम्रतसेन, बीनकार लालसेन अशा महान कलावंतांचा आविष्कार त्यांना अनुभवायला मिळाला. चुलत्याकडून मिळणारी प्रत्यक्ष तालीम आणि जयपूरमधील बड्या बड्या कलावंतांचे गायन-वादन ऐकण्याची मनसोक्त संधी असे दोन्ही संस्कार झाल्यावर अल्लादियाखॉंमधील प्रतिभावान कलावंत झपाट्याने तयार होत गेला व अल्पावधीत त्यांनी एक कसबी गायक म्हणून आपला नावलौकिक प्रस्थापित केला. चाचा जहांगीरखॉंसाहेबांकडून अल्लादियांनी अनेक वर्षे अहोरात्र तालीम घेतली. त्यांचा आवाज जात्याच मधुर व स्वरांच्या आलापींना अनुकूल होता. वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत आलापीच्या गायनानेच त्यांना लोकप्रियता मिळाली होती. या त्यांच्या गायकीवर लुब्ध होऊन अंबेढा संस्थानच्या महाराजांनी त्यांना बोलावून घेतले व मिळेल तिथे, मिळेल त्या ठिकाणी त्यांची आलापी ऐकण्याचा सपाटा लावला. सकाळ असो की संध्याकाळ, दुपार असो की रात्र, महाराजांना लहर येईल त्याप्रमाणं त्यांनी फर्मान सोडावं आणि अल्लादियांनी गावं असाच तो प्रकार होता. पण मानवी शरीरालाही काही मर्यादा असतात. एकसारखं गाऊन गाऊन अल्लादियांचा आवाज बसला. इतका बसला की त्या आवाजातील अगोदरचा गाज व माधुर्य लोप पावलं व आवाज पूर्णपणे घोगरा बनला. आवाजानं बगावत केली आणि भल्या भल्या गायकांची कारकीर्द धुळीला मिळाल्याची असंख्य उदाहरणे यापूर्वी होऊन गेली होती. अल्लादियांनी मात्र अशा संकटातून नवी वाट काढण्याची हिमंत केली. आवाजात निर्माण झालेल्या वैगुण्याचे त्यांनी एका कलात्मक गायकीत उपयोजन केले. त्यांनी आपली स्वतःची अशी नवी गानप्रणाली निर्माण केली. आदल्या पिढीतील बुजूर्ग मुबारकअली यांच्या संगीतातून ही प्रेरणा आपणाला मिळाल्याचे अल्लादियाखॉं सांगत. त्यांची ही अद्भुत, अपूर्व गायकी कशी होती हे आपण पुढं पाहणारच आहोत.
चुलत्याजवळ अध्ययन केल्यानंतर अल्लादियाखॉं जयपूरहून बाहेर पडले व कलकत्त्याला आले. अहमदखॉं, ताजखॉं, दुनीखॉं इत्यादी मोठमोठ्या गायकांची नावं त्यांनी ऐकली होती व त्या ओढीनंच ते कलकत्त्याला गेले होते. मृदंगवादनातील सम्राट कुंदोसिंग यांचे शिष्य छोटेखॉं हेदेखील त्यावेळी कलकत्त्यास होते. या सर्वांचं गायन-वादन मनसोक्त ऐकून व आपल्याही कलेची पेशकश त्यांच्यासमोर करून अल्लादियाखॉं काही दिवस तिथं राहिले. त्यावेळी नेपाळदरबारचे सरोदिये निजामतुल्लाखॉं कलकत्त्यास आले होते. अल्लादियांचे गायन त्यांना इतके आवडले की त्यांनी जाताना अल्लादियांना आपणासोबत नेपाळला नेले. तब्बल दोन वर्षे अल्लादिया नेपाळला राहिले. पुढे नेपाळमध्ये अंतर्गत बंडाळी सुरू झाली आणि ते तिथून निघाले व बिहारला आले. त्या ठिकाणी त्यांचे आजे अमीरखॉं होते. छोटेखॉं, घसीटखॉं आणि घगेखुदाबक्ष हे आग्रेवाले ख्यालीयेसुद्धा त्यावेळी बिहारमध्ये होते. त्यांच्यासोबत काही काळ अल्लादियांनी घालवला. तिथून त्यांनी जोधपूर गाठलं. जोधपूर दरबारात दरबारी गवई म्हणून त्यांनी काम पत्करले. पण काही काळातच जोधपूरच्या महाराजांचे निधन झाले व रियासतीत रिजन्सीचा कारभार सुरू झाला तेव्हा या सर्व दगदगींना अल्लादियासाहेब कंटाळले व त्यांनी राजस्थानलाच रामराम ठोकायचा निर्णय घेतला.
राजस्थानच्या भूमीला अलविदा करून अल्लादियाखॉं निघाले आणि शेवटी येऊन थडकले महाराष्ट्रात. त्यापूर्वी काही महिने ते बडोद्यात राहिले होते व तिथे त्यांच्या काही मैफली झाल्या होत्या. यातल्या काही मैफलींना अमूखॉं, फैजमहंमदखॉं, नथ्थनखॉंसारख्या बुजूर्गांची उपस्थिती लाभली होती. एका गाण्याला रहिमतखॉंसाहेब हजर होते. रहिमतखॉं अत्युच्च कोटीतील गायक, पण त्यांचा स्वभाव एवढा उदासीन की ते स्वतः गातानाही भावनावश होत नसत किंवा दुसर्याचं गाणं ऐकतानाही गौरवोद्गार काढत नसत. अल्लादियाखॉंच्या बैठकीला निव्वळ एक श्रोता म्हणून ते उपस्थित होते. सुरुवातीला श्रोत्यांच्या कोंडाळ्याबाहेर बसले होते. पण जसजशी अल्लादियाखॉंसाहेबांच्या आलापीची बरसात सुरू झाली तसे बसल्या ठिकाणावरूनच रहिमतखॉंसाहेब पुढं पुढं सरकू लागले व अखेर खॉंसाहेबांना येऊन भिडले! अल्लादियाखॉंच्या समारोपी तानेचा गडगडाट झाला तेव्हा तर रहिमतखॉं बेहोष होऊन उठले व ‘आहा, क्या गाये आप’ असं म्हणत त्यांनी अल्लादियांना कडकडून मिठी मारली!
बडोद्यात अशा अनेक अपूर्व मैफली गाजवून खॉंसाहेब मुंबईत आले. मुंबई म्हणजे साक्षात कलेचं माहेरघर! आश्रयदात्यांची, चाहत्यांची, दर्दी रसिकांची जिथे कधीही उणीव नसते अशी अद्भुत कलानगरी. मुंबापुरीत खॉंसाहेबांचे जंगी स्वागत झाले. एक दिवस मुंबईत त्यांची मैफल चालू असताना कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी बाहेरूनच त्यांचे गाणे ऐकले. खॉंसाहेबांची गायकी त्यांना इतकी आवडली की कोल्हापूरला गेल्यानंतर त्यांनी आपला एक खास माणूस अल्लादियाखॉंसाहेबांना भेटायला मुंबईत पाठवला व कोल्हापूर दरबारची नोकरी स्वीकारावी अशी गळ त्यांना घातली. खॉंसाहेबांनी हे निमंत्रण स्वीकारलं आणि मुंबई सोडून ते करवीरनगरीत दाखल झाले. १८९४ साली करवीरशी जडलेला हा ऋणानुबंध पुढची जवळजवळ पन्नास वर्षे कायम राहिला.
अल्लादियाखॉंसाहेबांना खरा नावलौकिक महाराष्ट्रानं दिला. ते स्वतःही याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचे. एकदा ते असं म्हणाले होते- ‘‘माझ्या गायकीचं कौतुक करण्याइतकी बुद्धिमत्ता मला महाराष्ट्रात दिसून आली. इकडच्या लोकांनी अतिशय गुणग्राहकता दाखवून मला आपलंस केलं. आणि सर्वात अधिक म्हणजे शाहूमहाराजांनी माझ्या विद्येची फार फार कदर ठेवली व मला माझ्या मुलखाची आठवण कधी होऊ दिली नाही. असा राजा होणार नाही!’’
अल्लादियाखॉंसाहेबांचं आगमन महाराष्ट्रात होण्यापूर्वी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रसार तसा बर्यापैकी झाला होता. फैजमोहम्मदखॉं, नथ्थनखॉं वगैरे नामदार हिंदुस्थानी गवय्यांचं गाणं लोकांनी ऐकलेलं होतं. बाळकृष्णबुवांचं गायन ऐकून त्यांचे गुरू हसूखॉं यांच्या गायकीची महाराष्ट्राला कल्पना आली होती. रहिमतखॉंसाहेबांनी आपल्या गंधर्वतुल्य गायकीनं ग्वाल्हेरपासून म्हैसूरपर्यंत हजारो श्रोत्यांची अंतःकरणे वेडी करून टाकली होती. त्यांच्या मिठास गायकीनं लोकांना असंदेखील वाटू लागलं होतं की गाण्याचा उन्मादकारक विलास याहून वेगळा कुठला असू शकेल?
संगीताबद्दलचं असं एक चिद्विलासी वातावरण महाराष्ट्रात असताना अल्लादियाखॉंसाहेब महाराष्ट्रात आले. महाराष्ट्राचं अंतःकरण अल्पकाळात काबीज करण्याचा चमत्कार त्यांनी करून दाखवला. अल्लादियाखॉं आल्यापासून श्रोत्यांच्या कानावर एक निराळंच उच्च दर्जाचं गाणं पडू लागलं आणि त्या गायकीचा एक-एक गुण पाहताच तिच्यापुढे इतर सर्व गायकी त्यांना फिक्या वाटू लागल्या. रहिमतखॉंच्या मिठास आवाजावर श्रोते लुब्ध झाले होते हे खरंच, परंतु गाणं म्हणजे नुसता काही आवाज नव्हे, किंवा नुसती तान नव्हे किंवा फिरत नव्हे. आवाजाच्या स्वाभाविक माधुर्याप्रमाणेच मेहनतीने आणि गायकीच्या उंचीने पैदा होणार्या आवाजात एक प्रकारचं माधुर्य असतं या गोष्टी अल्लादियाखॉंसाहेबांच्या गाण्याचा परिचय झाल्यावर महाराष्ट्रीय श्रोत्यांना पटू लागल्या. अतिशय उंच व मधुर स्वरांच्या गवयांनीही अल्लादियांपुढे मार खावा, अतिशय तयार तानांच्या भरार्या मारणार्या गानसेनांच्या मैफलीही अल्लादियांच्या नुसत्या हुंकाराबरोबर पुसल्या जाव्या, आणि मी मी म्हणणारे रागी गाऊन गेले तरी त्यांच्या मागून अल्लादियाखॉंसाहेबांचं गायन होताच विद्वत्तेची गर्जना स्पष्टपणे ऐकू यावी, असे प्रकार वारंवार घडू लागले. कै. भास्करबुवा बखले खॉंसाहेबांच्या पाठीमागं तंबोरा घेऊन बसण्यात भूषण मानीत, या एकाच गोष्टीवरून महाराष्ट्रानं त्यांची गायकी कशी शीरोधार्थ मानली हे दिसून येतं.
अल्लादियाखॉंसाहेबांचा आवाज तसा काही मिठास नव्हता. तो फार उंच व चढाही नव्हता. परंतु या दोन्ही गोष्टींना शून्य ठरवण्यासारखे अनेक गुण त्यांच्या गायकीत होते. त्यांची स्वर लावण्याची तरकीबच अशी विशिष्ट होती की त्या तरकिबीची मोहिनी एकदा श्रोत्यांवर पडली की कायम टिकून राही. अस्ताई भरण्याची त्यांची पद्धतही विशिष्ट होती. त्यांच्या अस्ताईची धीमी लय, प्रत्येक स्वराच्या मागंपुढं एक प्रकारची झालर ठेवून स्वर लावण्याची त्यांची हातोटी, प्रत्येक रागात सहज प्रकट होणारी त्यांची विद्वत्ता, कोतवाली घोड्याप्रमाणे नाचत येऊन तोंडाला मिळणार्या त्यांच्या बोलउपजा आणि रागाची पूर्ण छाया मैफलीवर उमटल्यानंतर तोफेच्या गोळ्याप्रमाणे सुटणार्या त्यांच्या दुपदरी तानांची फिरत- ही सर्व अल्लादियाखॉंसाहेेबांच्या गायकीची वैशिष्ट्ये होती. त्यांचं गाणं म्हणजे अर्थपूर्ण शब्दोच्चार, सूर व लय यांचं अत्यंत मनोहर असं मिश्रण होतं. अल्लादियाखॉंचं गाणं म्हणजे साहित्य-संगीत-नृत्य यांच्या समन्वयाची एक आतषबाजीच असायची. स्वरांच्या व लयींच्या धुंदीत ते स्वतः तर रंगायचेच पण त्या गाण्याच्या रंगाने श्रोतेही धुंद व्हायचे. अल्लादियाखॉंसाहेबांची गायकी इतकी विलक्षण होती की तिच्यात गायनाच्या सर्व अंगांचा उत्कर्ष जसा प्रतीत व्हायचा तसंच संशोधन, तपश्चर्या, पांडित्य अशा त्रिगुणात्मक भूमिकेवरून विलास करणारं लालित्यही प्रत्ययाला यायचं. ‘त्यांची तान म्हणजे सिंहाची गर्जना किंवा सागराच्या लाटेचा लोंढा किंवा तोफेचा गडगडाट’ असं वर्णन प्रख्यात साहित्यिक ना. सी. फडके यांनी केलं आहे.
‘ज्याला बोलता येतं त्याला गाता आलं पाहिजे’ असं अल्लादियाखॉंसाहेब म्हणत असत. एका अर्थी त्यांच्या गायकीचं हे मूळसूत्र होतं. गायनकला ही एक अगदी नैसर्गिक अशी कला आहे. कलेच्या प्रांतात कोणत्याही प्रकारची कृत्रिमता किंवा अवडंबर असू नये अशी खॉंसाहेबांची धारणा होती. मैफलीत मांड ठेवून बसण्यापासून तो थेट प्रत्यक्ष गाण्यातील सर्व प्रकारांपर्यंत कोठेही कृत्रिमता येऊ नये याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. आवाजाचा आकारयुक्त लगाव हे जयपूर गायकीचं पहिलं वैशिष्ट्य. आलाप असो, मींड असो, गमक असो किंवा कितीही बिकट तानपलटा असो- या आकारात किंचितही फरक दिसू द्यायचा नाही हे जयपूर गायकीचं अत्यंत कडक व्यवधान. आवाजाच्या लगावाचेही तंत्र नैसर्गिक तितकेच सूत्रबद्ध. मंद्र, मध्य किंवा तार यांपैकी कोणत्याही सप्तकातील स्वरस्थाने असोत, ती अगदी नैसर्गिक पद्धतीने आणि पहिल्याच आकाराने लागली पाहिजेत यावर त्यांचा अगदी कटाक्ष! जयपुरीयांच्या गायनात गाण्याला प्रत्यक्ष सुरुवात केल्यानंतर अस्ताई अत्यंत कलात्मकतेनं आणि सर्वांगीण उत्कृष्ट अशा बंदिशीनं म्हटली जाते. अस्ताई एकदा किंवा दोनदा म्हणतात. कितीही वेळा चीज म्हटली तरी तिचं स्वरांग आणि तालांग यात नुसत्या कणाचाही फरक झालेला जयपूरवाल्यांना खपत नाही. अस्ताई पूर्ण म्हणून झाल्यानंतर साफ आकारानं विलंपताला सुरुवात. आलापांची सुरुवात चीजेच्या अंगातूनच करायची हे आणखी एक जयपूर गायकीचं सूत्र. ‘चीजेच्या अंगाने गाणे’ याचा अर्थ चीजेची ठेवण आणि चालू असलेली आलापी एकमेकांना पूरक आहेत हे सिद्ध करणे.
अल्लादियाखॉंसाहेबांच्या व एकूणच जयपूर घराण्याच्या गायकीत ‘तंत अंग’ महत्त्वाचे मानले जाते. शास्त्रकारांनी आपल्या संगीतातील स्वरवर्तावाच्या दोन गती सांगितलेल्या आहेत. यांपैकी पहिली आहे ‘सर्पगती’ तर दुसरी ‘मंडूकगती.’ या दोन्ही गतींमधील फरक एका उदाहरणानं स्पष्ट करता येतो. समजा की साप व बेडूक या दोघांनाही एक किलोमीटर अंतर पार करायचंय. हे अंतर साप तोडू लागला तर किलोमीटरच्या अंतरातील प्रत्येक बिंदू-बिंदूवरून तो सरपटत जाईल. याउलट बेडूक मात्र टुण्टुण् उड्या मारीत टप्प्याटप्प्याने हे अंतर ओलांडून जाईल. एका स्वरावरून दुसर्या स्वरावर जाताना दोन्ही स्वरांमधील अनंत श्रुतींवरून गळ्याचा वापर करणे याला ‘तंत अंग’ म्हटलं जातं. बीनवादनात मुख्यतः हीच क्रिया होते. कापसाच्या पेळूतून सुताचा लांबच लांब धागा काढावा तशा प्रकारची ही प्रक्रिया असते. खॉंसाहेबांच्या सुरांचा धागा हा भक्कम रेशमी पिळाचा असे. त्यांच्या गायकीतील तंत अंग सर्पगतीचं होतं. एका स्वरातूनच दुसर्या स्वराची सुरुवात करणे हे या अंगाचे प्रमुख लक्षण आहे. याउलट दोन स्वरांमधील श्रुतींच्या अंतराचा वापर न करता गाणं ही मंडूकवृत्ती आहे. खॉंसाहेब सर्पगतीचा वापर करीत. त्यांची श्रुतिस्थाने तंतोतंत लागत. संपूर्ण, षाडव, ओडव, संकीर्ण किंवा वक्र यांपैकी जो राग चालू असेल त्या प्रकारची गायकी ते करीत. प्रत्येक रागाचे रागांग शास्त्रीयदृष्ट्या शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीने वादी, संवारी, ग्रह, अंश, न्यास यांचा अचूक वापर करीत. प्रत्येक स्वर ठोकल्यासारखा एकांडेपणाने न लावता त्या त्या रागाला अनुसरून मागच्या किंवा पुढच्या स्वरकणांनी त्याला सजवीत. जरूर तेथे मींड, गमक इत्यादी अलंकारांचा आवश्यक तितकाच वापर करून रागांग प्रकाशवंत व शोभायमान करीत. या संपूर्ण प्रकाराला ‘अस्ताई भरणे’ असे म्हटले जाते.
खॉंसाहेबांच्या अस्ताई भरण्यामध्ये अचाट कल्पनाविलास, अचूक सौंदर्यदृष्टी आणि मार्मिक रसिकता यांचा संगम झालेला होता. स्वरविलासाची मर्यादा ते आपल्या आवाजधर्माला अनुरूप होईल अशाच पद्धतीने ठेवत असत. आलापीनंतर बोल अंगानं थोडे जलद आलाप व लहान लहान ताना घेतल्या जात. संथ आलापीत प्रामुख्याने ध्रुपदाचे अंग ते दाखवायचे. लहान लहान तानांतून धृपदी अंगाची विशिष्ट गमके व टप्पा गायकीचा वापरही ते कौशल्याने करीत. या कामातील त्यांची स्वरयोजना इतकी वैशिष्ट्यपूर्ण असायची की भल्या भल्या कराकारांनाही या कृतीचा अंदाज लागत नसे. या प्रकारची मांडणी करून झाल्यावर खॉंसाहेब प्रत्यक्ष ‘बोल-ताना’ किंवा शेवटच्या लयीतील तानांची फिरत सुरू करीत. मध्यलयीच्या लहान लहान आलापांतून किंवा तानांतून अशा विलक्षण तर्हेने आणि अपूर्व विश्वासाने ते अत्यंत वेगवान ताना सुरू करीत की श्रोते अक्षरशः थक्क होऊन जात. सुंदर तानेला मोत्यांच्या माळेची उपमा दिली जाते. या उपमेची सार्थता पटवणारी सुबक तानबाजी अल्लादियाखॉंसाहेब करायचे. खॉंसाहेबांच्या गळ्यातून निघणारी तान स्वच्छ, आकारयुक्त, एकसारख्या गमकाची, प्रत्येक स्वर निर्मळ असलेली व पीळदार अशी असे. आपल्या अचाट कल्पनाविलासाने ते अनंत प्रकारांनी उत्तमोत्तम तानउपजा करीत. त्यांची कल्पना व गळा या दोन्हीत अधिक वेगवान कोण हे सांगणं तसं अशक्यच होतं.
खॉंसाहेबांच्या अफाट संग्रहात किती राग होते आणि चीजा किती होत्या हे सांगणे कठीण आहे. त्यांच्या संग्रहात दहा-बारा हजार तरी चीजा होत्या असा अंदाज गोविंदराव टेंबे यांनी वर्तवला होता. हे भांडार एवढं अफाट होतं की आपल्या शिष्यांना भरपूर काही वाढून झाल्यावरदेखील ‘अब भी मेरा पेट खाली नहीं हुआ’ असं अल्लादियाखॉंसाहेबांना आयुष्याच्या अंतकाळी म्हणावं लागलं.
अल्लादियाखॉंसाहेबांसारखे असामान्य गुरू केसरबाईंना लाभले हे त्यांचं भाग्य! त्यांचं प्रत्यक्ष गायन ज्यांना ऐकायला मिळालं ते खरोखर नशीबवान. पण खॉंसाहेबांच्या गायकीचा किंचित प्रत्यय घेण्याची इच्छा आहे त्यांनी जयपूर घराण्याची गायकी ऐकावी. जयपूर घराण्यांत हैदरखॉं, मंजीखॉं, भूर्जीखॉं, नथ्थनखॉं हे श्रेष्ठ गायक होऊन गेले. अल्लादियाखॉंचे ज्येष्ठ चिरंजीव नासीरुद्दीनखॉं हेसुद्धा विद्वान गायक होते. सूरश्री केसरबाई केरकर व गानतपस्वी मोगुबाई कुर्डीकर यांनी आपल्या गुरूचा लौकिक जगभर पोचवला. गोविंदबुवा शाळीग्राम व लक्ष्मीबाई जाधव यांचाही समावेश खॉंसाहेबांच्या शिष्यवर्गात होतो. निवृत्तीबुवा सरनाईकही याच घराण्यातले. मोहनराव पालेकर, मल्लिकार्जुन मन्सूर, वामनराव सडोलीकर, धोंडूताई कुलकर्णी ही जयपूर घराण्यातली आणखी काही चमकदार नक्षत्रे!
मोगुबाईंचा वारसा त्यांच्या सुकन्या किशोरीताई आमोणकर यांनी पुढे चालवला. मोगुबाईंनी अनेक शिष्यांना तयार केले. केसरबाईंचे गाणे मात्र त्यांच्यापुरतेच राहिले.
अल्लादियाखॉं १६ मार्च १९४६ रोजी पैगंबरवासी झाले. एक्क्याण्णव वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभले. मृत्यूसमयी त्यांची अवस्था अत्यंत गलितगात्र झाली होती; पण गळ्यातील गाणे मात्र टवटवीत होते. अखेरचा श्वास घेण्याच्या केवळ चार महिने आधी त्यांनी लक्ष्मीबाग म्युझिक सर्कलमध्ये आपली अखेरची मैफल केली. स्टेजवर त्यांना अक्षरशः गाठोड्यासारखे उचलून आणण्यात आले. खॉंसाहेबांनी गाणं सुरू केलं. सुरुवातीची पाचएक मिनिटे कापर्या आवाजात कसेबसे गायले व नंतर तानबाजीचा जो वर्षाव त्यांनी चालू केला की उपस्थित श्रोते सतत दीड तास ‘वाहवा वाहवा’ करण्यातच मश्गुल होऊन गेले. अशी होती अल्लादियाखॉंसाहेबांची अद्भुत गायकी!