राम मनोहर लोहिया इस्पितळात दाखल
आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगण राज्य निर्मितीच्या निषेधार्थ येथील आंध्र प्रदेशभवन जवळ बेमुदत उपोषणास बसलेले तेलगू देशम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांना काल पोलिसांनी नाट्यमयरित्या जबरदस्तीने तेथून हटविले. तेथून त्यांना राममनोहर लोहिया इस्पितळात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नायडू यांच्या उपोषणाचा काल पाचवा दिवस होता.
नायडू यांना उपोषण स्थळावरून हटविण्यात आलेले पोलीस व तेलगू देसम पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात तासभर मोठी धुमश्चक्री उडाली. नायडू यांना नेण्यासाठी आंध्र प्रदेश भवनजवळ कडेकोट बंदोबस्तात ऍम्बुलन्स सज्ज ठेवण्यात आली होती. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून अखेर त्यांना हटविले. यावेळी नायडू समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. तसेच तेलंगण राज्याच्या नावाखाली तेलगू लोकांमध्ये फूट पाडल्याचा आरोप त्यांनी सोनिया गांधी यांच्यावर केला. यावेळी नायडू समर्थकांनी सोनिया गांधी व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्या बॅनर्सची मोडतोड केली व त्यांना आग लावली.