स्थानिक प्रशासनाने शनिवारी रात्रीपासून लागू केलेली संचारबंदी तसेच दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश असूनही स्वतंत्र तेलंगण निर्मिती विरोधातील आंदोलकांनी काल रविवारी विजयनगर शहर व जिल्ह्याच्या अन्य भागांमध्ये दगडफेक, जाळपोळ, लुटमार यासह हिंसाचार केला. पोलिसांनी आंदोलकांना पांगाविण्यासाठी कोठापेटा येथे रबरी गोळ्यांचा मारा केला. तर पल्लीविधी भागात लाठीमार केला.
तेलंगण निर्मितीच्या विरोधकांनी आंध्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रमुख बी. सत्यनारायण यांच्या कुटुंबियांतर्फे चालविल्या जाणार्या विजयनगर येथील सत्यन इंजिनियरींग कॉलेजलाही आपले लक्ष्य बनविले. शनिवारी मोठ्या प्रमाणात विजयनगरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्यानंतर तेथे पोलिसांनी संचारबंदी लागू केली होती. गेल्या ३ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वतंत्र तेलंगण राज्याला मान्यता दिल्यानंतर या भागांमध्ये त्या विरोधात तीव्र पडसाद उमटले आहेत. आंध्र प्रदेश बिगर राजपत्रित अधिकारी संघटनेने पुकारलेला ४८ तासांचा बंद शनिवारी रात्री संपला होता. गेले दोन दिवस आंदोलकांनी प्रामुख्याने आंध्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रमुख सत्यनारायण यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेला लक्ष्य केले. त्यांनी वाहने जाळली, जिल्हा सहकारी बँकेलाही आग लावली.
दरम्यान, रायलसीमा व आंध्र प्रदेशच्या किनारी भागातील वीज खाते कर्मचार्यांनी काल पुकारलेल्या संपाचा फटका आंध्र प्रदेशच्या सहा जिल्ह्यांना बसला. यामुळे रेल्वेसेवेवरही परिणाम झाला. सीमांध्रातील ३० हजारहून अधिक वीज कर्मचारी सहभागी झाले आहेत.