9 खाणपट्ट्यांत उत्खननासाठी तयारी सुरू : मुख्यमंत्री

0
8

देशातील दुर्मिळ खनिजांच्या उत्खननासाठी दोनापावलामध्ये लिलाव संपन्न

गोव्यात एक किंवा दोन महत्त्वाच्या खनिजांची ओळख पटली आहे आणि लवकरच त्यांचे उत्खनन सुरू होईल. राज्य सरकारने आतापर्यंत 12 खाणपट्ट्यांचा लिलाव केला आहे. त्यापैकी जवळजवळ 9 खाणींवर लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठी तयारी सुरू आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. केंद्रीय खाण मंत्रालयाच्या दुर्मिळ खनिजांच्या लिलावाच्या कार्यक्रमात बोलताना दोनापावल पणजी येथे ते बोलत होते.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि खाण मंत्रालयातील समस्यांमुळे उर्वरित खाणपट्ट्यांमध्ये खनिज उत्खननास विलंब होत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. व्यवस्थापन जर योग्यरित्या सुव्यवस्थित केले, तर 2025 मध्ये गोव्यात खाणकाम पूर्ण वेगाने सुरू होईल अशी मला आशा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
जी. किशन रेड्डी यांनी गोवा खाण विभागासोबत काल आढावा बैठक घेतली. या बैठकीमुळे राज्याला केंद्रासोबत खाणकामाशी संबंधित समस्या सोडवण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संभाव्य खाणपट्ट्यांसाठी लिलाव योजना, नॉन-ऑपरेशनल खाणींचे पुनरुज्जीवन आणि कालबाह्य झालेल्या खाण लीजची स्थिती यावर चर्चा झाली. या बैठकीत लिलाव केलेल्या खाणपट्ट्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
खाजगी क्षेत्राच्या सहभागाद्वारे भारतातील महत्त्वाची खनिज क्षमता, ज्यामध्ये दुर्मिळ पृथ्वी घटक (आरईई), झिंक, हिरा, तांबे आणि प्लॅटिनम ग्रुप एलिमेंट्स (पीजीई) यांचा समावेश आहे, ते मिळवण्याचे उद्दिष्ट या उपक्रमाचे आहे, असेही रेड्डी यांनी सांगितले.

उत्खनन परवाना लिलावाचे उद्घाटन म्हणजे भारताच्या खनिज स्वयंपूर्णतेच्या दिशेने सुरू झालेले नवे पर्व आहे, असेही जी. किशन रेड्डी म्हणाले. भारत प्रथमच सुनियोजित आणि पारदर्शक लिलाव प्रक्रियेद्वारे खनिज उत्खनन सुरू करत आहे. या सुधारणांमुळे महत्त्वाच्या व खोलवर असलेल्या खनिजांच्या शोधास गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. दुर्मिळ खनिजपट्ट्यांच्या लिलावाच्या पाचव्या टप्प्याचा रोड शो आणि हॅकेथॉन 2025 चा ‘एआय वापरुन खनिज लक्ष्यीकरण’ या विषयावर काल त्यांच्या हस्ते गोव्यात रोड शो देखील सुरू करण्यात आला.

6 महिन्यांत पूर्ण क्षमतेने खाणकाम सुरू : केंद्रीय खाणमंत्री

सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या निकषांचे आणि निर्देशांचे काटेकोरपणे पालन करून गोव्यात पूर्ण क्षमतेचे खाणकाम सहा महिन्यांत पुन्हा सुरू होईल, असे आश्वासन केंद्रीय खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांनी काल दिले. केंद्र सरकारच्या दुर्मिळ खनिजपट्ट्यांच्या लिलावाच्या पहिल्या टप्प्याच्या प्रारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पर्यावरण, महसूल निर्मिती आणि रोजगार निर्मिती यासारख्या समस्यांना तोंड देत गोवा सरकार खाणकाम सुरू करत आहे, असेही रेड्डी म्हणाले.