80 टक्के अपघात मद्यपी चालकांमुळे : मुख्यमंत्री

0
5

>> वाढत्या अपघातांमुळे ‘भिवपाची गरज आसा’; 13 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहास सुरुवात

राज्यातील 80 टक्के अपघात हे मद्यपान करून वाहने चालवणाऱ्यांमुळे होत असतात, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. तसेच आता राज्यातील सर्व बसचालकांची अल्कोमीटरद्वारे तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या अपघातांबद्दल चिंतेचा सूर लावतानाच त्यांनी याप्रकरणी ‘भिवपाची गरज आसा’ असेही सांगितले.

काल पणजीत 13 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात दररोज रस्ता अपघातात किमान एक जण ठार व सुमारे 10 जण जखमी होत असतात. वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी पकडल्यानंतर बरेच वाहन चालक हे आपल्या ओळखीच्या राजकीय नेत्यांना फोन करतात. आपणालाही असे फोन येतात; पण अशा लोकांना आपण नियमभंग केलेला असल्यास दंड भरण्याची सूचना करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सध्याच्या तरुणांमध्ये धूम स्टाईलमध्ये वाहने चालवण्याची नशा आहे. अशाच तरुणांकडून मॉडिफाईड दुचाक्यांवरून स्टंट करताना रस्त्यावरील अन्य वाहनचालकांचे जीव घेतले जातात. काही युवक स्टंट आणि स्टाईलबाजी करण्यासाठी अतिवेगाने वाहने हाकत असतात. मद्यपान करून वाहने चालवणे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे यामुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ज्यांना मद्यपान करायचे आहे त्यांनी ते घरी जाऊन करावे. बारमध्ये मद्यपानासाठी जाणार असाल तर सोबत चालक न्यावा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.

आतापर्यंत अपघातांतील मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाईपोटी 7 कोटी रुपये वितरित केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अपघातात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांसाठी सरकार दोन लाख रुपये एवढी आर्थिक भरपाई देत असते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनीही अपघातांवर भाष्य केले. गोव्याची ओळख आता ‘अपघातांचे राज्य’ अशी होऊ लागलेली आहे. वाहनचालकांनी अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम हे काटेकोरपणे पाळायला हवेत, असे गुदिन्हो म्हणाले. राज्यभरात सर्वत्र नाईट व्हिजन कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव आहे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.