>> पुढील महिन्यापासून रणधुमाळी सुरू; छत्तीसगढमध्ये दोन टप्प्यात, तर उर्वरित राज्यांत एकाच टप्प्यात होणार मतदान
केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत तपशीलवार माहिती दिली. त्यानुसार छत्तीसगढमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. छत्तीसगढमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर रोजी, दुसऱ्या टप्यातील मतदान 17 नोव्हेंबरला होईल. छत्तीसगढ वगळता अन्य राज्यांत एकाच टप्प्यात मतदान पार पडेल. मिझोरममध्ये 7 नोव्हेंबरला, तर मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान होईल. यानंतर राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला मतदान होईल. तेलंगणात 30 नोव्हेंबरला मतदान होईल. या सगळ्या मतदानप्रक्रियेनंतर 3 डिसेंबरला पाचही राज्यांमध्ये मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.
पाच राज्यांमध्ये एकूण 1.77 लाख मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. 17,734 आदर्श मतदान केंद्रे आणि 621 मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिव्यांग कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. महिला कर्मचारी 8,192 मतदान केंद्रांची जबाबदारी सांभाळणार आहेत.
पाच राज्यात 16 कोटींपेक्षा अधिक मतदार आणि 679 जागा आहेत. 60 लाख युवा मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. आदिवासी भागात पीव्हीटीजी मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना ‘व्होट फ्रॉम होम’ करता येणार आहे. लवकरच या पाच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. मिझोरममध्ये 8.50 लाख, छत्तीगढमध्ये 2.03 कोटी, मध्य प्रदेशमध्ये 5.6 कोटी, राजस्थानमध्ये 5.25 कोटी आणि तेलंगणामध्ये 3.17 कोटी मतदार मतदान करणार आहेत.
या पाच राज्यांमधील निवडणुकांच्या निमित्ताने सत्ताधारी भाजप आणि विरोधातील इंडिया आघाडी यांच्यात पहिल्यांदाच थेट लढत होईल. त्यामुळे दोन्ही बाजूंसाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील भाजपची आतापर्यंतची रणनीती पाहता प्रचाराची मुख्य धुरा आणि केंद्रबिंदू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याभोवतीच असेल, असे दिसत आहे; मात्र कर्नाटक निवडणुकीत मोदींच्या या लोकप्रियतेचा भाजपला हवा तसा फायदा झाला नव्हता. त्यामुळे या पाचही राज्यांच्या निवडणुकीत मोदींचा प्रभाव कितपत आहे, याची चाचपणी होईल. जातीनिहाय जनगणना, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई आणि अँटी-इन्कम्बन्सी हे घटकही पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे भवितव्य ठरवतील. सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्याचा मनसुबा असलेल्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी या पाच राज्यातील विधानसभा निवडणूक एकप्रकारे आगामी लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट ठरणार आहे.
5 राज्यांतील सद्य:स्थिती काय?
सध्याच्या घडीला मध्य प्रदेशातील विधानसभेच्या 230 जागांपैकी 128 जागा भाजपकडे आणि 98 जागा काँग्रेस पक्षाकडे आहेत.
राजस्थानमध्ये एकूण 200 जागा आहेत. यामध्ये काँग्रेसचे 108, भाजपचे 70, आरएलडीचा 1, आरएलएसपीचे 3, बीटीपी आणि डाव्यापक्षाचे प्रत्येकी 2 आणि 13 अपक्ष आमदार आहेत.
छत्तीसगडमध्ये 90 जागा असून, त्यात काँग्रेसचे 71, भाजपचे 15, बसपाचे 2 आणि जेजेएसचा 1 आमदार आहे.
तेलंगणात 119 जागा असून, भारत राष्ट्र समिती (बीआरएस)चे 101, एआयएमआयएमचे 7, काँग्रेसचे 5, भाजपचे 3, एआयएफबीकडे 1 आणि 2 अपक्ष आमदार आहेत.
मिझोरममध्ये 40 जागा असून, मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) चे 26, तर काँग्रेसचे 4, झोराम पीपल्स मुव्हमेंटचे 8, भाजपचा 1 आणि 1 अपक्ष आमदार आहे.