>> पोलीस उपनिरीक्षकांची सर्वाधिक 187 पदे भरली जाणार; 118 सहाय्यक शिक्षक, तर तांत्रिक सहाय्यकांच्या 57 जागा भरल्या जाणार
गोवा कर्मचारी निवड आयोगाने 400 सरकारी पदांच्या भरतीची घोषणा केली असून, ही सर्व पदे ‘क’ श्रेणीतील आहेत. वेगवेगळ्या खात्यांतील ही पदे असून, त्यात पोलीस, शिक्षण आणि अन्य काही खात्यातील पदांचा समावेश आहे. सर्वाधिक 187 पदे ही पोलीस उपनिरीक्षकांची भरली जाणार असून, त्याखालोखाल सहाय्यक शिक्षकांची 118 पदे भरली जाणार आहेत. तसेच तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल) 57 पदे आणि अन्य काही पदांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षातील ही पहिलीच मोठी नोकरभरती असून, राज्यातील तरुण-तरुणींना सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात पुढील दोन वर्षांत 10 ते 12 हजार सरकारी पदे भरली जाणार असल्याचे जाहीर केले होते. विविध सरकारी खात्यांत ही पदे भरली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आता गोवा कर्मचारी निवड आयोगाने ‘क’ श्रेणीतील नोकरभरतीसाठी प्रक्रिया सुरू केली असून, इच्छुकांना ऑनलाईन अर्ज पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे. गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या पोर्टलवर हे अर्ज सादर करता येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मे 2025 अशी आहे.
सहाय्यक शिक्षक पदांमध्ये इंग्रजी विषयासाठी 26 पदे, हिंदी विषयासाठी 22 पदे, कोकणी विषयासाठी 10 पदे, मराठी विषयासाठी 10 पदे, संस्कृती विषयासाठी 2 पदे, गणित विषयासाठी 14 पदे, विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र) 14 पदे, समाजशास्त्र (इतिहास/भूगोल/नागरिशास्त्र/अर्थशास्त्र) 20 पदे भरली जाणार आहेत. महाविद्यालयीन पदवीसह (50 टक्के गुण) आणि बी.एड् पदवी अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
माध्यमिक शाळांसाठी चित्रकला शिक्षकांची 2 पदे भरली जातील. सरकारी प्राथमिक शाळांसाठी इंग्रजी शिक्षकांची 14 पदे, (पात्रता- पदवीधर व बी.एड्) ग्रंथपाल- ग्रेड-1, कला आणि संस्कृती खात्यात 10 पदे भरली जाणार आहेत.
पोलीस उपनिरीक्षकांच्या 187 पदांपैकी 30 पदे महिलांसाठी राखीव असतील. तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल)- 57 पदे, ग्रामीण विकास खात्यात 3, जल संसाधन खात्यात 33, सार्वजनिक बांधकाम खात्यात 14 पदे, पंचायत खात्यात 3 पदे, लेखा संचालनालय खात्यात 2 पदे, टेक्निकल ऑफिसर 1 पद (आयटी), ज्युनियर टेक्निकल ऑफिसर 2 पदे (मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय) अशी पदे भरली जाणार आहेत.