31 डिसेंबरचा सनबर्न रद्द

0
22

>> मान्यता न मिळाल्याने आयोजकांचा निर्णय

सनबर्न संगीत महोत्सव 31 डिसेंबरला आयोजित करण्यासाठी सरकारी पातळीवर मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे 31 डिसेंबरचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, अशी घोषणा सनबर्न आयोजकांनी काल केली.
येत्या 28 ते 30 डिसेंबर असे तीन दिवस ईडीएम संगीत कार्यक्रम होणार आहे, असे आयोजकांनी जाहीर केले आहे. 31 डिसेंबरच्या कार्यक्रमाची तिकीट विकत घेतलेल्या लोकांसमोर तीन पर्याय ठेवले आहेत. तिकीटधारक तीन दिवसाच्या संगीत महोत्सवात कुठल्याही एका दिवशी महोत्सवात सहभागी होऊ शकतात किंवा सनबर्न गोवा समारोप पार्टी किंवा तिकिटाची 100 टक्के रक्कम परत घेऊ शकतात, असे तीन पर्याय आहेत.

सनबर्न संगीत महोत्सव आयोजकांनी सरकारकडून मान्यता न घेता 28 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान संगीत महोत्सवाची घोषणा केली होती. तसेच, ऑनलाइन पद्धतीने तिकीट विक्रीला सुरुवात होती. 31 डिसेंबरला सनबर्न संगीत महोत्सवाचे आयोजन केल्यास स्थानिक नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांनी 31 डिसेंबरला सनबर्न संगीत महोत्सव आयोजित करण्यास विरोध केला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे 31 डिसेंबरला सनबर्नला मान्यता न देण्याची विनंती केली होती. त्यामुळे 31 रोजी सनबर्न आयोजित करण्यास मान्यता देण्यात आलेली नाही.

दरम्यान, राज्य प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सनबर्नमधील ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. तसेच, वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणार आहेत.