विशेष संपादकीय

0
467

 

सम्राज्ञी

तामीळनाडूच्या लाडक्या‘पुरात्ची थलैवी’ म्हणजे क्रांतिकारी नेत्या जयललिता जयरामन यांचे निधन ही दक्षिणेतील एका झुंजार स्त्रीच्या प्रदीर्घ संघर्षाची इतिश्री आहे. आधी कलेच्या आणि नंतर राजकीय क्षेत्रात आपले अत्युच्च स्थान निर्माण करून, जनतेवर अधिराज्य करणार्‍या एखाद्या सम्राज्ञीच्या थाटात वावरत आलेल्या जयललितांच्या निधनाचा धक्का पचवणे द्रविडी जनतेला खचितच जड जाईल. दक्षिणी राज्यांतील जनता आधीच कमालीची भावूक असते. त्यामुळे त्यांचे शोकप्रकटीकरण कोणत्या थराला जाईल सांगता येणार नाही. जयललितांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळीही त्यांच्यासाठी फार मोठी आहे. आपल्या लाडक्या ‘अम्मा’ आता आपल्यात नाहीत हा धक्का त्यांचे समर्थक पचवूच शकणार नाहीत एवढी उदंड लोकप्रियता आणि समर्थकांचे प्रेम त्यांनी आजवर कमावले. सदैव एखाद्या देवीसारख्या भासणार्‍या गोर्‍यागोमट्या, सुहास्यवदना जयललिता त्यांच्यासाठी साक्षात् देवीरूपच होत्या. एक स्त्री असूनही त्यांनी केवळ तामीळनाडूच्या राजकारणातच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर जे स्थान निर्माण केले, ते ऐतिहासिक होते. अटलबिहारी वाजपेयींसारख्या असंख्य राजकीय पावसाळे पाहिलेल्या नेत्याला देखील जयललितांच्या शह – काटशहाच्या राजकारणाला सामोरे जाताना नाकी नऊ आले होते. आपल्या राजकीय जीवनातील तो सर्वांत खडतर काळ होता अशी कबुली नंतर वाजपेयींनी दिली होती. आपल्या राजकीय जीवनामध्ये अनेक वादळे जयललितांनी अंगावर झेलली. त्यावर मात करून त्या पुढे पुढे जात राहिल्या. आता त्यांची राजकीय कारकीर्द झाकोळणार असे वाटत असतानाच ढगाआडून सूर्य पुन्हा डोकवावा तशा त्या तामीळनाडूच्या राजकीय क्षितिजावर पुनरागमन करायच्या. दक्षिणी चित्रपटसृष्टीतील अत्यंत सफल कारकिर्दीनंतर एम. जी. रामचंद्रन यांचा हात धरून त्या राजकारणात आल्या खर्‍या, परंतु अल्पावधीतच एमजीआरची पत्नी जानकी रामचंद्रन यांच्याकडून एमजीआर यांच्या राजकीय वारसदाराची धुरा जवळजवळ हिसकावून घेऊन जयललितांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली. पुरुषांची भाऊगर्दी असलेल्या तामिळी राजकारणामध्ये कणखरपणे पाय रोवले आणि बघता बघता भल्या भल्यांचे रूपांतर आपल्या भगतगणांत करून टाकले. ज्या दीनवाणेपणाने अभाअद्रमुकचे मोठमोठे नेते त्यांच्यापुढे गोंडा घोळायचे, लोटांगणे घालायचे, ती सारी गंमत त्या गालातल्या गालात हसत पाहात असायच्या. अगदी सुरवातीला जेव्हा त्यांच्याकडे राज्याचे विरोधी पक्षनेतेपद होते, तेव्हा विधानसभेत द्रमुकच्या मंडळींनी अभूतपूर्व हिंसाचार माजवला होता. खुद्द जयललितांची साडी फाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. तेव्हा एखाद्या अपमानीत द्रौपदीसारख्या त्या विधानसभेतून बाहेर पडल्या त्या पुन्हा मुख्यमंत्री बनूनच परतण्याची शपथ घेऊन. द्रमुकवरचा त्यांचा तो राग कधीच शमला नाही. तामीळनाडूच्या राजकारणात या दोन्ही पक्षांतील हाडवैराचे हे विष पुरते भिनले आहे. त्यामुळे ज्याच्या हाती सत्ता येईल त्याने दुसर्‍याला डंख करायचा हे जणू ठरूनच गेले होेते.
कॉंग्रेसची योग्य वेळी साथ देत जयललितांनी तामीळनाडूचे सत्ताशकट हाती घेतले. राजीव गांधींच्या हत्येने कॉंग्रेसच्या बाजूने निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा जयललितांना तेव्हा मिळाला खरा, परंतु त्यानंतरच्या काळात स्वतःची एक कणखर सत्ताधीश म्हणून प्रतिमा त्यांनी प्रयत्नपूर्वक घडवली. जनतेवर सुविधा आणि सवलतींची खैरात करीत त्यांनी राज्यावर आपली पकड जमवली. विरोधकांचा एक हाती सामना केलाच, परंतु आपल्या पक्षाचेही एकचालकानुवर्तीत्व कायम राखले. मध्यंतरी जेव्हा बेहिशेबी संपत्ती प्रकरणात अपात्र ठरल्याने त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले, तेव्हा ओ पनीरसेल्वन यांनी राज्याचा कारभार ज्या दीनवाणेपणाने अश्रू ढाळत हाती घेतला आणि जयललितांची कर्नाटक उच्च न्यायालयाने सुटका करताच मुकाटपणे सोडला, त्यामागे जयललितांच्या महाकाय प्रतिमेचेच दडपण होते. भ्रष्टाचाराचे आरोप झाले, खटले गुदरले गेले, तुरुंगात टाकले गेले, तरीही अम्मांवरील समर्थकांचे प्रेम तसूभरही कमी झाले नाही आणि आता त्यांच्या निधनानंतरही ते ओसरेल असे वाटत नाही!