27 फेब्रुवारीपासून ‘पंचायत चलो अभियान’

0
11

>> मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री देणार पंचायतींना भेट; 8 दिवस चालणार अभियान

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला येत्या 19 मार्चला 5 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 27 फेब्रुवारीपासून राज्यात विकसित भारत-विकसित गोवा अंतर्गत ‘पंचायत चलो अभियाना’ला सुरुवात केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने त्या आधीच हे अभियान हाती घेतले जाणार आहे. याशिवाय महिला दिन, स्वयंपूर्ण गोवा 2.0 पुनरावलोकन, विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप इत्यादी लोकाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल पर्वरी येथे ही माहिती दिली.

पंचायत चलो अभियानांतर्गत स्वतः मुख्यमंत्री आणि मंत्री विविध पंचायतींना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. सरकारच्या योजनांबाबत नागरिकांच्या तक्रारी, सूचना असल्यास त्याही ऐकून घेतल्या जाणार आहेत. राज्यात साधारण 8 दिवस पंचायत चलो अभियान राबविले जाणार आहे. मंत्र्यांना दौऱ्यासाठी मतदारसंघाचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक मंत्री निर्धारित केलेल्या दिवशी मतदारसंघातील पंचायतींना भेटी देतील. एका पंचायतीमध्ये साधारण दोन-तीन तास उपस्थित राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे ताळगाव मतदारसंघातील पंचायतीला भेट देणार आहेत. मंत्री विश्वजीत राणे – मुरगाव, नुवे, शिरोडा, मडकई. माविन गुदिन्हो – कळंगुट, काणकोण, पेडणे, सांत आंद्रे. रवी नाईक – डिचोली, वाळपई. सुभाष शिरोडकर – सांताक्रूझ, हळदोणा, सावर्डे. रोहन खंवटे – कुडचडे, दाबोळी, प्रियोळ, वेळ्ळी. गोविंद गावडे – सांगे, साळगाव, कुडतरी, कुंकळ्ळी. बाबूश मोन्सेरात – वास्को, मये, मडगाव. सुदिन ढवळीकर – म्हापसा, साखळी, कुठ्ठाळी. नीळकंठ हळर्णकर – फातोर्डा, फोंडा, कुंभारजुवा. सुभाष फळदेसाई – पेडणे, मांद्रे, पर्वरी, थिवी. आलेक्स सिक्वेरा – नावेली, बाणावली, केपे आणि शिवोली या मतदारसंघांना भेटी देणार आहेत.