>> हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज
राज्यातील बहुतेक भागांत येत्या 27 जुलैपर्यंत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने 27 जुलैपर्यंत राज्याला निळ्या रंगाचा इशारा दिलेला आहे.
गेल्या सुमारे 20 दिवसांपासून राज्यात रोज पाऊस कोसळत असून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहेच. शिवाय या काळात पावसामुळे पूर येण्याच्या व पडझडीच्या घटना घडल्याने जीवितहानी व मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पुरामुळे रस्ते पाण्याखाली येणे, घरात पाणी घुसणे तसेच मुसळधार पावसामुळे जुन्या घरांची पडझड होणे, भूस्खलन हेोणे, वादळी वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडणे अशा घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.
वेधशाळेने पुढील आठवडाभरही पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे.
वृक्ष कोसळून युवतीचा मृत्यू
गेल्या गुरुवारी पणजीतील चर्च चौकात एक वृक्ष जोरदार पावसामुळे उन्मळून एका धावत्या गाडीवर कोसळून पडण्याची घटना ताजी असतानाच काल रविवारी सकाळी चर्च चौकातील आणखी एक झाड कोसळून रस्त्यावरून जाणाऱ्या आरती गोंड (19) या रामनगर बेती येथील युवतीवर कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. झाली. उपचारासाठी सदर युवतीला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले मात्र तिचा मृत्यू झाला. काल रविवार असल्याने रस्त्यावर जास्त वाहने नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला अशी माहिती पणजी पोलिसांनी दिली.
गेल्या गुरुवारी याच ठिकाणी एक वृक्ष रस्त्यावरील धावत्या चारचाकी गाडीवर कोसळला होता. यावेळी दोन दुचाकी गाड्यांचीही मोडतोड झाली होती. सध्या कोसळणारा जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटनांत वाढ झालेली आहे.