24 तासांत देशात नवे 10 हजारांवर कोरोना रुग्ण

0
8

>> कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतोय; सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 44,998 वर

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत असून, मागील 24 तासांत देशात 10 हजारांच्या वर नवे कोरोना रुग्ण सापडल्याने सर्वांच्याच मनातील धाकधूक वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने (खपवळरप दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 10,158 नवे रुग्ण आढळले. परिणामी देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 44,998 वर पोहोचली आहे.

7 महिने 20 दिवसांनंतर देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. यापूर्वी 24 ऑगस्ट 2022 रोजी 10 हजार 725 रुग्ण आढळले होते. सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांमध्ये दोन हजारांहून अधिक वाढ झाली आहे. सोमवारी 5 हजार 676, तर मंगळवारी 7 हजार 830 रुग्णांची नोंद झाली होती. दरदिवशी 2 हजारांच्या पटीत रुग्ण वाढत आहेत.

नव्या रुग्णसंख्येसह, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 44 हजार 998 वर गेली आहे. यापूर्वी 10 सप्टेंबर 2022 रोजी 45 हजार 365 सक्रिय रुग्ण होते. दैनंदिन संक्रमण दर 4.42 टक्क्यांवर, तर साप्ताहिक संक्रमण दर 4.02 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,149 नवे रुग्ण आढळले. यानंतर दिल्लीचा संक्रमण दर 23.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता दिल्ली एम्सने रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे.

पुढील 10 दिवसांत
रुग्णसंख्या आणखी वाढणार

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाबाधितांची संख्या पुढील 10 दिवसांत आणखी वाढणार आहे; परंतु त्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून येईल. नव्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल.