भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचे कार्यकर्त्यांना आवाहन; ताळगावात बुथ कार्यकर्ते व मंडळ अध्यक्षांचा मेळावा
2027 साली पुन्हा एकदा गोव्यात भाजपचे सरकार सत्तेवर आणण्याची गरज आहे. त्यासाठी आतापासूनच कंबर कसून कामाला लागा. पुढील विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचे सरकार राज्यात सत्तेवर आणा आणि त्याचबरोबर केंद्रात नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठीही कामाला लागा, असे आवाहन भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल केले.
काल ताळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांच्या आणि मंडळ अध्यक्षांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ताळगाव येथील सभागृहात झालेल्या या मेळाव्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, उद्योगमंत्रीमाविन गुदिन्हो, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री सुभाष फळदेसाई, भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुंग आदी नेते
उपस्थित होते.
‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्वयंपूर्ण गोवा’ हे स्वप्न साकार करण्यासाठी 2027 साली गोव्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपला सत्तेवर आणण्याची गरज असल्याचे नवीन यांनी नमूद केले.
2012 साली गोव्यात भाजप सरकार सत्तेवर आले. भाजपसाठी तो शुभशकून होता. त्यानंतर 2014 साली केंद्रात भाजप नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तेवर आले. गोमंतकीयांनी 2012 साली गोव्यात भाजपला दिलेली मते शुभ ठरल्याचे सांगून केंद्रात 2014 पासून भाजपचे सरकार सत्तेवर आहे, असे नवीन म्हणाले.
बूथ अध्यक्षांच्या ताकदीवरच भाजप संघटना मजबूत बनली असल्याचे सांगून तीच पक्षाची खरी ताकद असल्याचे नवीन म्हणाले. पक्ष यापुढेही असाच बळकट रहावा, यासाठी बूथ अध्यक्षांनी 24 तास काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
पुढील विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी बूथ स्तरावर पक्षाच्या उमेदवाराला 50 टक्के मते मिळवून देण्यासाठी अध्यक्षांनी प्रयत्न करावेत आणि गोव्यातील व केंद्रातील डबल इंजिन सरकारला गती द्यावी, असे आवाहन नितीन नवीन यांनी केले.
तत्पूर्वी नितीन नवीन यांनी काल म्हापशातील उत्तर गोवा जिल्हा भाजप कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांचे तेथील कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. यावेळी नवीन यांनी स्वत: देखील ढोल वाजवण्याचा आनंद लुटला.