2 अल्पवयीन मुलींचे अपहरण; दोघांना अटक

0
9

>> कोलवाळ पोलिसांची हुबळी-कर्नाटक येथे कारवाई; दोन्ही मुलींची सुटका; संशयित पोलीस कोठडीत

हुबळी येथे आपल्या मित्राला भेटायला गेलेल्या दोघा अल्पवयीन मुलींचे अपहरण करून नंतर त्यांना कोंडून ठेवल्या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी दोघा संशयितांना हुबळी येथे काल अटक केली. तसेच कोंडून ठेवण्यात आलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

उपाधीक्षक दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे रोजी रात्री 9 वाजता एका व्यक्तीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी काही अज्ञात आरोपींनी आपल्या 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली होती. तसेच त्याच दिवशी आणखी एका महिलेने आपल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली. त्यानुसार बाल कायदा कलम 363, आयपीसी कलम 8 अंतर्गत या संदर्भात तात्काळ दोन एफआयआर नोंदवण्यात आले.

तपासादरम्यान विश्वसनीय सूत्रांकडून व तांत्रिक पद्धतीने केलेल्या चौकशीत पीडित मुली या हुबळी (कर्नाटक) येथे गेल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मंदार परब व कर्मचाऱ्यांचे पोलीस पथक तातडीने हुबळी, कर्नाटक येथे रवाना झाले. त्यानंतर हुबळीतील कसबापेठ पोलीस स्थानकाच्या पोलिसांच्या साहाय्याने परिसरात शोध घेतला, त्यावेळी दोन्ही अल्पवयीन मुली सापडल्या.
सदर मुलींना टिप्पूनगर, नेकरनगर रोड, हुबळी, धारवाड येथील नवीन अहमद पाणीबंद याच्या घरात ठेवल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले होते. त्यानुसार झाडाझडतीदरम्यान नावेद याच्या घरी त्या मुली सापडल्या.

सदर घराला कुलूप लावण्यात आले होते. तौसिफ किल्लेदार मुन्ना या मित्राने या दोन्ही मुलींना 29 मे रोजी आपल्या घरी आणून ठेवले होते, असा दावा नावेदने केला. त्यानंतर तौसिफ याला त्याच परिसरात ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तौसिफ याने नावेद हा सुद्धा या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले.

अपहरण झालेल्या दोन्ही अल्पवयीन पीडित मुलींना आणि दोन्ही संशयितांना कोलवाळ पोलीस स्थानकावर आणण्यात आले. दोन्ही संशयितांना रितसर अटक करून सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

हुबळीत विकलेले सोन्याचे दागिने जप्त
संशयितांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना चांगले आयुष्य देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणण्यास प्रवृत्त केल्याचे चौकशीत उघड झाले. संशयितांनी सोन्याचे दागिने सराफाला विकले होते. हुबळी येथील सोनाराकडून ते सर्व दागिने जप्त करण्यात आले.