राज्य सरकारने 14 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश काल जारी केला. राज्याच्या वाहतूक खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पी. पी. अभिषेक (आयएएस) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
गोवा राज्य माहिती आयोगाचे सचिव म्हणून सुधीर केरकर यांची, पीपीपीचे संचालक म्हणून महादेव आरोंदेकर यांची, गोवा राज्य भरती आयोगाच्या सचिवपदी शशांक ठाकूर यांची, कार्मिक खात्याच्या संयुक्त सचिवपदी परेश फळदेसाई यांची, डीआरडीएच्या प्रकल्प अधिकारीपदी वासुदेव शेट्ये यांची, अतिरिक्त तुरुंग महानिरीक्षकपदी स्नेहल नाईक गोलतेकर यांची, उच्च शिक्षण संचालकपदी भूषण सावईकर यांची, जलस्रोत खात्याच्या (प्रशासन) संचालकपदी गौरीश कुर्टीकर यांची, तुरुंग अधीक्षकपदी शंकर गावकर यांची, एसटी वित्त विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी राजेंद्र मिरिंगकर यांची, संयुक्त सचिव (आरोग्य) मान्युएल बार्रेटो यांची, सहकार निबंधकपदी अरविंद बुगडे यांची, हस्तकला महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संध्या कामत आणि अल्पसंख्याक वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विनेश आर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वाहतूक खात्याचे संचालक राजन सातर्डेकर यांना कार्मिक खात्याशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी राजू गावस यांच्याकडे मजूर आयुक्तपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. अरविंद खुटकर यांच्याकडे कला अकादमीच्या सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. अजय गावडे यांच्याकडे गोवा पुनर्वसन मंडळाच्या सचिवपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. व्यावसायिक कर सहआयुक्त सागर गावडे यांच्याकडे उत्तर गोवा कोमुनिदादच्या प्रशासकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.