>> 49 जणांना सुनावली फाशीची शिक्षा; 18 जणांना प्रत्यक्षात फाशी; केंद्र सरकारची संसदेत माहिती
परदेशातील भारतीयांच्या मुद्द्यांवर संसदेत शुक्रवारी चर्चा झाली. यावेळी केंद्र सरकारने परदेशातील तुरुंगात असलेल्या भारतीयांच्या मुद्द्यावर महत्वाची माहिती दिली. 10 हजारांपेक्षा अधिक भारतीय परदेशी तुरुंगात आहेत, तर आतापर्यंत 49 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. त्यांच्या शिक्षेची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तसेच गत 5 वर्षांत विविध देशांत प्रत्यक्षात 18 भारतीयांना फाशी देण्यात आली, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल दिली.
परराष्ट्र मंत्रालयाला राज्यसभेत विचारण्यात आले होते की, अनेक भारतीय वर्षानुवर्षे परदेशातील तुरुंगात खितपत पडले आहेत का? परदेशात मृत्युदंडाच्या शिक्षेची वाट पाहणाऱ्या भारतीयांचा तपशील आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी भारत सरकारने काय प्रयत्न केले आहेत, याची माहिती देण्यात यावी, त्यावर कीर्तीवर्धन सिंह यांनी सभागृहाला ही माहिती दिली.
परराष्ट्र मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सध्या परदेशातील तुरुंगांमध्ये अंडरट्रायलसह भारतीय कैद्यांची संख्या 10,152 एवढी आहे. तसेच कीर्तीवर्धन सिंह यांनी यावेळी 8 देशांशी संबंधित डेटा शेअर केला. तसेच फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नागरिकांची संख्याही सांगितली. मात्र, अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
किती जणांना प्रत्यक्षात फाशी दिली?
तसेच गेल्या पाच वर्षांत परदेशात कोणत्याही भारतीय नागरिकांना फाशी देण्यात आली आहे का? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला. त्यावर कीर्तीवर्धन सिंह यांनी सांगितले की, मलेशिया, कुवेत, कतार आणि सौदी अरेबियामध्ये काही भारतीयांना फाशी देण्यात आली आहे. 2024 मध्ये कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये तीन भारतीयांना फाशी देण्यात आली होती, तर झिम्बाब्वेमध्ये एकाला फाशी देण्यात आली. 2023 मध्ये कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये प्रत्येकी पाच भारतीयांना आणि मलेशियामध्ये एकाला फाशी देण्यात आली.
परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 25 युएईमध्ये, 11 सौदी अरेबियामध्ये, 6 मलेशियामध्ये, 3 कुवेतमध्ये आणि इंडोनेशिया, कतार, अमेरिका आणि येमेनमध्ये प्रत्येकी एकाला फाशीची सुनावलेली आहे.