इतिहासाच्या दृष्टीने गोव्याची कृषी संस्कृती

0
188

– प्रा. राजेंद्र पां. केरकर
आज आपला गोवा भारतातील अगदी छोटे राज्य असले तरी हजारो वर्षांपासून आदिमानवाला या भूमीचे आकर्षण होते आणि त्याच्या ऐतिहासिक खाणाखुणा सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या बर्‍याच गावांत अनुभवायला मिळतात. नांगराचा शोध लागण्यापूर्वी स्त्रिया टोकदार काठ्यांनी जमीन खणून शेती करायच्या. सत्तरातील डोंगरमाथ्यावरती वसलेल्या सुर्ला गावच्या सीमेलगत कर्नाटकातील मान या गावी आजही स्त्रिया काठ्यांनी शेतीसाठी जमीन खणतात. त्याच्यापूर्वी डोंगर उतारावरती छोटी-छोटी झाडे-झुडपे तोडून त्याला आग लावून जी मोकळी जमीन मिळायची, त्यात धान्याची पेरणी केली जायची. नैसर्गिक खतामुळे आणि मोसमी पावसामुळे हे पेरलेले छानपैकी उगवायचे.कुमेरी शेतीची ही परंपरा गोव्यातल्या बर्‍याच डोंगराळ भागांतील बहुतांश कष्टकरी जाती – जमातींत रूढ होती. सत्तरीतील डोंगुर्ली येथे दगडाच्या हात-कुर्‍हाडी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या पुरातत्व संशोधकांना सापडल्या होत्या. या हात – कुर्‍हाडी कुमेरी शेतीसाठी उपयोगात आणल्या जात होत्या. गोव्यातल्या सह्याद्रीच्या परिसरात कुमेरी शेती हा इथल्या आदिम जमातीचा जगण्याचा मार्ग होता. वरी, पाखड, कांगो, राळो, नाचणी यासारख्या धान्यांची पैदास कुमेरी शेतीतून केली जायची. कुमेरीत कालांतराने सामूहिकरित्या शेतकाम करण्याची पद्धत निर्माण झाली, जी ‘सावड’ म्हणून नावारूपास आली. ख्रिस्ती कुणबी जमात ही पूर्वांपार कुमेरी शेतीशी निगडीत होती. आज इतिहासजमा होण्याच्या वाटेवरती असलेल्या काही लोकगीतांत त्याचा उल्लेख आढळतो. डोंगरावरती कुमेरी शेती करण्यासाठी जाणार्‍या कुणबी स्त्रिया पायांत कुम्याच्या सालीपासून तयार केलेल्या चपला वापरायच्या.
सत्तरीत वाघेरी पर्वतावरून येणारे झरमे नदीच्या पात्रात म्हाऊस गावात रवळनाथ मंदिराच्या डाव्या बाजूस दगडांवरती कोरलेली जी प्रस्तर चित्रे आहेत, त्यात प्रामुख्याने झेबु म्हणजे रानटी बैलांची चित्रे आहेत. माणसाने जेव्हा शेतीचा शोध लावला, तेव्हा प्रारंभी मऊशार मातीत पेरणी, कालांतराने काठीने खणून पेरणी आणि मग स्त्रियांना लाकडी नांगर ओढण्यास लावून शेती सुरू केली. रानात वावरणार्‍या रानटी झेबुची शक्ती शेतीसाठी वापरण्याची जेव्हा त्याला प्रेरणा झाली, तेव्हा शेतीच्या एकंदर स्वरुपात बदल घडला. म्हाऊस येथील प्रस्तर चित्रे नवाश्मयुगातली की लोहयुगातली याबाबत पुरातत्व संशोधकांत मतभिन्नता असली तरी रानटी झेबुचा शेतीच्या नांगरणीसाठी उपयोग करण्यामुळे शेतीत बदल घडला याबाबत एकवाक्यता आहे. सत्तरीतील म्हाऊस आणि महाराष्ट्रातल्या दोडामार्ग तालुक्यातील विर्डी येथे झेबुची प्रस्तरचित्रे आढळलेली असून, ती झेबुशी संबंधित असलेल्या कष्टकरी आदिम जमातीने काढली असावीत. जेव्हा भाताची रोपे लावण्याची पद्धत आली तेव्हा शेतीतून जादा भरघोस पिक घेणे शक्य आहे याची माणसाला प्रचीती आली. कालांतराने नदी, तलावाच्या पाण्याचा गरजेनुसार वापर करून वायंगणाद्वारे शेती करण्याची पद्धत विकसित झाली.
डिचोली आणि सत्तरीतील दोन गावे वायंगिणी नावाने ओळखली जातात. इथे मोठ्या प्रमाणात वायंगण या हिवाळ्यात प्रामुख्याने केल्या जाणार्‍या शेतीची परंपरा असली पाहिजे. सत्तरीतील काही ठिकाणी म्हादई नदीचे पाणी भेरली माडाच्या बुंध्याच्या पाईपसारखा उपयोग करून हिवाळ्यात केल्या जाणार्‍या शेतीच्या सिंचनासाठी वापरले जाते. डिचोलीतल्या मये आणि सुर्ला या गावातील लोकांचा वायंगण शेती हा जगण्याचा आधार होता. कोणत्याच प्रकारचे धरण न उभारता तलाव, नाल्याचे पाणी तिथल्या कष्टकरी समाजाने जांभ्या दगडात खोदकाम करून निर्माण केलेल्या कालव्यांद्वारे आपल्या शेतीच्या सिंचनासाठी अगदी कल्पकतेने वापरले होते. सुर्लात पाऊस ओसरला आणि गुलाबी थंडी सुरू झाली की तेथील कुळागरे, वायंगण शेतीच्या सिंचनासाठी व्यवस्थितरित्या पाणी मिळावे म्हणून सामूहिकरित्या सियाचा बांध घातला जायचा. इथे पाणी कालव्यांतून, पाटांतून खेळते ठेवण्यासाठी आणि प्रत्येक थेंबाचा वापर व्यवस्थित व्हावा म्हणून तेथे अस्तित्वात असलेली ग्रामसंस्था शेतकर्‍यांच्या माध्यमातून प्रयत्नरत होती. आज त्या गावात खोदलेले छोटे कालवे, पोट आणि चिरेबंदी बांधकामाचे विखुरलेले जिर्णावशेष आमच्या पूर्वजांना ज्ञात असलेल्या जलसिंचनाच्या समृद्ध परंपरेची जाण आणून देतात.
गोव्यात सांगे, काणकोणात शेकडो वर्षांपूर्वी हब्बूची वस्ती असल्याच्या आणि शस्त्रसज्ज अन्य प्रांतांतून आलेल्या लोकांनी त्यांचे शिरकाण केल्याच्या लोककथा आढळतात. कृषी संस्कृती आपला जीवनाधार मानलेल्या हब्बूंनी आपल्या शेतजमिनीत पाऊस गेल्यानंतर पाणी खेळते रहावे यासाठी कालवे, पाट खोदले होते. त्यासाठी त्यांनी कल्पकतेने आराखडा तयार करून नेत्रावळी नदीचे पाणी, कुशावतीचे पाणी खेळते ठेवले होते. सांगेतील रिवण पंचायतक्षेत्रात येणार्‍या धांदोळेतील पणसायमळ येथे कुळागरांना, शेतीला आजही जांभ्या दगडातून खोदलेल्या पाटाद्वारे जलसिंचनाची सुविधा पुरवली जाते. सत्तरीत कोदाळसारख्या गावात झाडांचा पालापाचोळा, मातीचे भराव घालून बांध सामूहिकरित्या घालून नदीनाले, ओहळ, तलाव यांचे पाणी शेती, कुळागरे यांना आजही पुरवले जाते. बारमाही उपलब्ध असलेले ब्रह्माकरमळीतील आजोबांची तळी या देवराईतले आणि बिबट्यान येथील पाणी पाट खोदून ब्रह्माकरमळीला आणलेले असून ते नगरगाव, हेदोडे परिसरातील कुळागरांना, शेतीसाठी उपयुक्त ठरलेले आहे. तिसवाडीतील सांताक्रुज येथील बोंडवेल तळे या परिसरातील पावसाळ्यानंतर केल्या जाणार्‍या शेती, भाजीपाला आणि अन्य तत्सम उत्पादनास जलसिंचनाची सुविधा पुरवित असे. आज गोवा विद्यापीठाच्या संकुलात उभारलेल्या बांधकामामुळे विकासाच्या नवनवीन प्रकल्पामुळे हे महाकाय तळे इतिहासाच्या उदरात गडप झालेले आहे. तळावली, कासरपालसारख्या गावात असलेले तलाव परिसरातील शेतांना सिंचनाची सुविधा पुरवित असे. मये येथील वायंगण शेतीसाठी गोंयगाणे तळे मोठा आधार ठरला होता.
केरी-सत्तरीतील हळीद समाजाचा कुलपुरुष बेळेवंश असून त्याचा संबंध भाताच्या बेळी प्रजातीशी होता. कळंगुट येथील बाबरेश्‍वर बाबर्‍या भाताची, आसगाव आसगोची, साळ, सालजिणी साळ भाताची स्मृती जागवतात. पौष महिन्यात वायंगणी शेतीची कामे आटोपल्यावरती बायका धालोत्सव खेळायच्या आणि त्यात कृषी संस्कृतीशी निगडीत लोकगीते उत्साहात गायच्या. गीतांतून तळ्यातल्या पाण्याद्वारे आणि मळ्यातल्या गुरांच्या शेणखताद्वारे शेती कशी फुलवली जायची याची कल्पना येते. गोव्यातील शेतकर्‍यांनी पारंपरिकरित्या आपली शेती, बागायती जैववैविध्याने समृद्ध आणि संपन्न केली. शेतीने इथल्या कष्टकरी समाजाची संस्कृती विकसित केली. हिंदूंत चतुर्थीच्या काळात असलेले भाताच्या कणसाचे पूजन किंवा नव्याची परब, राय, ताळगाव, अस्नोडा आदी ठिकाणच्या ख्रिस्ती समाजातले कणसाचे फेस्त, तवश्यांचे फेस्त, नवरात्रातल्या नऊ प्रकारच्या धान्यांच्या रुजलेल्या कोंबांना सौभाग्यवतींनी केसांत माळण्याची परंपरा आम्हाला कृषी संस्कृतीवरती आधारलेल्या लोकधर्माची कल्पना आणून देते. प्राचीन काळापासून सत्तास्थानी असलेल्या राज्यकर्त्यांनी इथल्या कृषी व्यवसायाला वेळोवेळी प्रोत्साहन दिले होते. ग्रामसंस्था, मंदिर संस्थांनी कृषीला मूळाधार मानला होता. गावड्यांनी चिखलाचे बांध घालून खार्‍या पाण्याला नियंत्रित खारभूमी स्वदेशी भाताच्या पिकांनी समृद्ध केली होती. आज हे सारे काळाच्या उदरात आम्ही गडप होऊ देणार का