ॲप फ्रॉड : बदनामीच्या भीतीने तक्रारीसाठी कोणीच पुढे येईना

0
7

>> सायबर गुन्हा विभागाकडून वैयक्तिक तक्रार दाखल करण्याची सूचना; ‘सुशिक्षित’ गुंतवणूकदार अडचणीत

फोंडा परिसरातील 700 ते 800 जणांना ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला असला, तरी बदनामीच्या भीतीने सायबर गुन्हा विभागाकडे वैयक्तिक तक्रार नोंदवण्यास अजूनपर्यंत कुणीच पुढे येत नसल्याने कोणतीही कारवाई झालेली नाही. फसवणूक झालेल्या अंदाजे 15 सदस्यांनी सह्या केलेली एक संयुक्त तक्रार तीन दिवसांपूर्वी सायबर गुन्हा विभागात दाखल केली होती; पण सायबर गुन्हा विभागाकडून वैयक्तिक तक्रार दाखल करण्याची सूचना मिळाल्याने सध्या फसवणूक झालेले नागरिक व सरकारी कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहेत. ‘सांगताही येईना अन्‌‍ सहनही होईना’ अशी अवस्था गुंतवणूकदारांची झाली आहे. तक्रार दाखल करण्याऐवजी बैठकांचे सत्र सध्या सुरू आहे.

फोंडा परिसरात सरकारी कर्मचारी, उद्योजक व अन्य कित्येक लोकांनी एका ॲपच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक केली आहे. सुरुवातीला कित्येकांना सदस्य बनल्यानंतर अधिक परतावा मिळाला; पण काही दिवसांपूर्वी तो ॲप बंद झाल्याने सदस्य बनलेल्या लोकांची तारांबळ उडाली आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेल्या सदस्यांनी तीन दिवसांपूर्वी सायबर गुन्हा विभागाकडे एकत्रितपणे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी फसवणूक झालेल्या सदस्यांनी सायबर गुन्हा विभागात हजेरी लावली; पण सायबर गुन्हा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येकाला वैयक्तिक रितसर तक्रार दाखल करण्याची सूचना केली. मात्र वैयक्तिक तक्रार नोंदवल्यास आपले नाव उघड होईल आणि आपली बदनामी होईल, अशी भीती या गुंतवणूकदारांना आहे. पैसे तर गेलेच आहे, शिवाय या प्रकरणातून नाव उघड झाल्यानंतर बदनामी होईल, ती वेगळी अशी भीती त्यांना आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्यांपैकी कोणीच अद्याप तक्रार नोंदवलेली नाही. सायबर गुन्हा विभागाच्या सूचनेमुळे आता पुढे काय करावे असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. दरम्यान, त्या ॲपमध्ये गुंतवणूक केलेल्या एका सदस्याने नाव बदनाम होणार नसल्याने रितसर तक्रार करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

एका उद्योजकाने गुंतवले 80 लाख!
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फोंडा परिसरातील 700 ते 800 पेक्षा अधिक सुशिक्षित लोकांनी या ॲपमध्ये गुंतवणूक केली होती. फोंडा परिसरातील एका उद्योजकाने तर अधिक रक्कम मिळविण्यासाठी 80 लाख रुपये गुंतवणूक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यावरून राज्यभरातून कोट्यवधींची गुंतवणूक या ॲपमध्ये झाल्याचे स्पष्ट होत आहे.