आज शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. मराठवाड्यात पंधरा वर्षांनी तर उस्मानाबाद येथे पहिल्यांदाच हे साहित्य संमेलन होत आहे. प्रख्यात कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते आज संध्याकाळी ४ वा. संमेलनाचे उद्घाटन होणार असून हे समेलन दि. १२ जानेवारीपर्यंत चालणार आहे. संमेलनाचा मुख्य कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार आहे त्या जागेला संत गोरोबाकाका साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे. याठिकाणी भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे. या संमेलनासाठी साहित्यिकांसह विविध पदाधिकार्यांचे आगमन सुरू झाले आहे.
संमेलनासाठी देशभरातून साहित्यिक, साहित्यप्रेमी दाखल होत आहेत. अखिल भारतीय महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, महामंडळाचे पदाधिकारी, मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे, उद्घाटक महानोर आदी उपस्थित झाले आहेत.
दिबे्रटोंची प्रकृती बिघडली
दरम्यान, संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची प्रकृती बिघडली आहे त्यामुळे ते आज संमेलनात सकाळी होणार्या साहित्यदिंडीला हजर राहू शकणार नाहीत. दिब्रेटो यांना मणक्याचा त्रास जाणवू लागल्याने ते ग्रंथदिंडीला अनुपस्थित राहतील. तसेच उद्घाटक ना. धो. महानोर हेदेखील गुडघेदुखीचा त्रास जाणवू लागल्याने या ग्रंथदिंडीला हजर राहू शकणार नाहीत.
महानोरांना धमकी
दरम्यान, संमेलनाचे उद्घाटक ना. धो. महानोर यांना साहित्य संमेलनाला जाऊ नका असा धमकीचा फोन येत असल्याचे महानोर यांचे नातू शशिकांत महानोर यांनी सांगितले. या संमेलनाला महानोर यांनी उपस्थित राहू नये असे सांगणारे पत्र महानोरांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पाठवले होते. तरीही महानोर हे संमेलनाला उपस्थित राहिले आहेत.
फादर फ्रान्सिस दिबे्रटो यांचे साहित्य ख्रिस्ती धर्मावर आधारितअसून मराठी साहित्यात दिबे्रटो यांनी काम केलेले नाही असा आरोप करण्यात येत आहे.