खाण खात्याने ८७ खाणींना लिजेस मंजूर केलेले असून या सर्व खाण कंपन्यांनी मुद्रांक शुल्क भरल्यानंतर खात्याला १२०० कोटी रु. एवढा मसहूल प्राप्त होणार असल्याचे खाण खात्याचे सहाय्यक संचालक पराग नगर्सेकर यांनी काल सांगितले.आतापर्यंत ४३ खाण कंपन्यांनी मुद्रांक शुल्क भरलेली असून त्याद्वारे खाण खात्याला ७५० कोटी रु. एवढा महसूल प्राप्त झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विविध जेटींवर असलेल्या खनिजाचा खाण खात्याने ई-लिलाव केला होता. त्याद्वारे खाण खात्याला ७५० कोटी रु. एवढा महसूल प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. खात्याने विविध जेटींवर असलेल्या सुमारे ५५ लाख मेट्रिक टन एवढ्या खनिजाचा ई-लिलाव केला होता. चार टप्प्यात हा ई-लिलाव करण्यात आला होता.
दरम्यान, खाण खात्याने राज्यातील खाणींवर असलेली बंदी उठवली असली तरी एवढ्यात खाणी सुरू होण्याची शक्यता कमीच असल्याचे खात्यातील सूत्रांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाची पर्यावरण विषयक मंजुरी मिळाल्यानंतरच खाणी सुरू करणे शक्य होणार आहे.