७७० किलोंचा मुदतबाह्य मावा एफडीएकडून जप्त

0
10

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) उत्तर व दक्षिण गोव्यात छापे टाकून शेकडो किलोंचा मावा आणि पराठा जप्त केला. राज्यभरातून तब्बल ७७० किलो मुदत संपलेला मावा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या माव्याची किंमत १ लाख ५७ हजार रुपये, तर पराठ्याची किंमत ३४ हजार रुपये एवढी आहे.

म्हापशातील छाप्यात मुदत संपलेला ५९० किलो एवढा मावा जप्त करण्यात आला. दवर्ली आणि फातोर्डा येथून अनुक्रमे १२० किलो व ६० किलो एवढा मुदतबाह्य मावा जाप्त करण्यात आला. हे फूड बिझनेस ऑपरेटर्स (एफबीओ) एफएसएसएआयच्या परवानगीशिवाय काम सुरू होते.

याशिवाय माहिती देणारे लेबल न लावलेला मावा देखील अन्य काही आस्थापनांतून जप्त करण्यात आला. योग्य प्रकारे माव्याचे पॅकिंग करण्यात आले नव्हते. तसेच माल खरेदी केल्याचे बिलही नव्हते. परवाना नसलेल्या या एफबीओंना त्यांचा व्यवसाय बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

वरिष्ठ एफएसओ आबेल रॉड्रिग्स, एफएसओ अमित मांद्रेकर, स्नेहा नाईक, अभिषेक नाईक, सॅम्पलिंग अटेंडंट साईनाथ मांद्रेकर व एमटीएस गौरेश गावकर यांच्या पथकाने हे छापे टाकले.