- कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)
१९६२ च्या चीनी आक्रमण संबंधातील हॅन्डर्सन ब्रूक्स रिपोर्ट अजूनही गोपनीयच आहे. त्याच प्रमाणे,१९७१च्या युद्धातील इतर माहिती प्रसिद्ध करायलाही अनेक वर्षे लागतील. तोपर्यंत आपल्याला विदेशी माहितीवरच अवलंबून राहावं लागेल.
चीनने जर परत आगळीक करण्याचा विचार केला तर त्याला तोंड देण्यासाठी १९६२ च्या भारत चीन युद्धानंतर,भारत सरकारनी तिबेटियन युवकांचं स्पेशल फ्रंटियर फोर्स हे कमांडो युनिट उत्तर प्रदेशच्या चक्रातामध्ये उभं केलं गेलं. एप्रिल,१९७१ मध्ये ज्यावेळी त्यांना पूर्व पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आलं, त्यावेळी मला बल्गेरियन असॉल्ट रायफल्स धारण करणार्या या एलिट फोर्समध्ये कार्यरत होण्याची संधी मिळाली. ऑक्टोबर ७१ च्या सुरवातीला आम्ही मिझोरामच्या देमागिरीहून पाकिस्तानमधील चिटगॉन्ग हिल ट्रॅक्टस्मध्ये ठाण मांडून बसलेल्या एलिट पाकिस्तानी ब्रिगेडवर गुरिल्ला रेड्स करत होतो. पाकिस्तानी स्पेशल सर्व्हिस ग्रुप कमांडोची एक बटालियन या ब्रिगेडचा हिस्सा होती. पूर्वेकडून देमागिरीमार्गे ढाक्याकडे जाणार्या भारतीय कोअरच्या मार्गातील हा सर्वात मोठा अडथळा होता.नोव्हेंबर,७१ च्या दुसर्या आठवड्यात, ऑपरेशन ईगल अंतर्गत आम्ही ईस्ट पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आणि एका मागोमाग एक पाकिस्तानी पोस्टचा फडशा पाडणं सुरू केलं. ०३ डिसेंबरला युद्धाची घोषणा झाली, त्यावेळी आम्ही तीन आठवड्यांहून जास्त वेळ पूर्व पाकिस्तानमध्ये होतो. १६ डिसेंबरला पाक शरणागतीच्या वेळी एसएसएफ, चिटगॉंगपासून केवळ २२ किलोमीटर दूर होती. ऑपरेशन ईगलमध्ये एसएफएफचे ४९ सैनिक देशासाठी शहीद झाले. ९ डिसेंबरला या फोर्सपैकी माझ्यासकट काहींना वेस्टर्न सेक्टरमध्ये मोहिमेवर पाठवण्यात आलं. हा फोर्स, गृहमंत्रालयाखाली असल्यामुळे दुर्दैवाने यांना हवं तसं, हवं तेवढं रिकग्निशन/ऍप्रिसिएशन मिळालं नाही.
एसएफएफचे तरुण कमांडोज मुक्तीवाहिनीला प्रशिक्षण देत असताना आम्हाला १९७१ च्या लढ्यात भाग घेणार्या बांगलादेश वायुदलाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. २७ जून,१९७१ मध्ये अस्तित्वात आलेल्या या वायुदलात, सुरवातीला तीन विमान आणि सात वैमानिकांसह ६७ वायूसैनिक होते. किलो फ्लाईट हे त्या वायुदलाच्या टोपणनाव होतं. मार्च,७१ मध्ये ईस्ट पाकिस्तान आर्मीने तेथील बंगाल्यांविरुद्ध नरसंहारी ऑपरेशन सर्चलाईट सुरु केल्यावर,हे सात वैमानिक, ग्रुप कॅप्टन ए के खांडकेरच्या नेतृत्वात,तेथून परागंदा होऊन भारतात आले. मे,७१ मध्ये आणखी ६० बांगलादेशी वायू सैनिकांनी भारतात शरण घेतली. त्यावेळी एयर चीफ मार्शल पी.सी. लालनी, वायुसेनेच्या सक्रीय मदतीने, खांडकेरच्या नेतृत्वाखाली किलो फ्लाईटची उभारणी करण्याला संमती दिली. यांच्या प्रशिक्षणासाठी भारतीय वायुसेनेने जोरहाट बेस कमांडर, ग्रुप कॅप्टन चंदन सिंगच्या नेतृत्वात, स्क्वॉड्रन लीडर एस. के. चौधरी आणि फ्लाईट लेफ्टनन्ट सी. के. सिंगलांना नियुक्त केलं. युद्ध सुरु होईस्तोवर ९६७वर वायु सैनिक भारतात आले होते.
बांगला देशी वैमानिकांपैकी;
अ) कॅप्टन्स मुकीत,काझी अब्दुस सत्तर आणि खालक हे दिमापूरच्या ५००० फुटी रनवेवरून, महाराजा ऑफ जोधपूरनी दिलेलं डकोटा विमान उडवत असत. या विमानातलो लेव्हल बॉम्बिंगसाठी २२६ किलो वजनाचे १० बॉम्ब लावण्यात आले होते. या बॉम्बसाठी डकोटावर बॉम्ब रॅक्स लावण्यात आले. वैमानिकांनी,आपण टार्गेटवर आहोत हे सांगितल्यावर रॅकमध्ये फिक्स केलेले बॉम्ब ढकलून खाली पाडण्यासाठी एक वायू सैनिक अधिकारी लागायचा. पाकिस्तान त्या वेळी नाईट फ्लाईंग करण्यात असमर्थ असल्यामुळे हे डकोटा विमान रात्रीच्या अंधारात कार्यरत होत असे;
ब) कॅप्टन्स अक्रम व शरफुद्दीन हे दोन वैमानिक डीएचसी ऑटर विमान उडवत असत. या विमानाच्या विंग्जखाली सात रॉकेट्स लावण्यात आली होती. प्रत्येकी १२ किलो वजनाचे १० बॉम्ब एका तात्पुरत्या दरवाजातून (मेकशिफ्ट डोअर) खाली ढकलले जात असत. किलो फ्लाईटनी आपला पहिला हवाई हल्ला या ऑटर विमानाद्वारे केला. या विमानांनी आपल्या पहिल्याच उड्डाणात; भारतातील कालियाशहर विमानतळावरून उड्डाण घेत, पूर्व पाकिस्तानमधील चिटगॉन्ग बंदरावर हल्ला केला आणि तेथील एयरपोर्ट, दोन तेलसाठे आणि एका तेल डेपोला उद्ध्वस्त केलं.
क) फ्लाईट लेफ्टनन्ट सुलतान महमूद, एल्युएट ३ हेलिकॉप्टर उडवत असे. ह्या हेलिकॉप्टरमध्ये मेन पॉडखाली ट्वीन बॅरल पॉईंट ३०३ ब्राउनिंग मशीन गन आणि त्याच्या पायलॉनवर १४ रॉकेट्स बसवण्यात आले होते. शत्रूच्या बंदुकीपासून बचाव करण्यासाठी याच्या बेस प्लेटवर एक इंचाची लोखंडी चादर बसवण्यात आली होती. या हेलिकॉप्टरनं आपल्या पहिल्या हल्ल्यात सीमेवरील अखाउरातून उड्डाण करून, पाक वायुदलाच्या गॉडनेल बेसवरील पाच तेलसाठे आपल्या रॉकेटद्वारे उद्ध्वस्त केलं आणि ते तेलियामुराला परत आले होते.
त्यानंतर ऑटर विमानानी सिल्हेट, कोमिल्ला, नर्सिंगदी आणि दौडकांडीवर हवाई हल्ले केलेत. एल्युएट ३ हेलिकॉप्टरनी आपल्या पहिल्या उड्डाणानंतर, सिल्हेटहून भैरबकडे माघार घेणार्या पाकिस्तानी सेनेवर मशीनगननी हल्ले केले. भारतीय सेनेच्या मेघना नदीवरील एयर लिफ्टच्या वेळी त्यांना एअर कव्हर देणार्या भारतीय वायुसेनेच्या मदतीला बांगला देशची किलो फ्लाईट देखील होती. १७ डिसेंबर,७१ला ढाक्याच्या ताझगांव एयरपोर्टवर उतरणार्या भारतीय विमानांमध्ये किलो फ्लाईटच ऑटर विमानही होतं. ०४-१६ डिसेंबर दरम्यान किलो फ्लाईटनी,९० सॉर्टीज आणि ४० कॉम्बॅट मिशन्ससाठी उड्डाण भरली होती. या बांगला देशी वैमानिकांना एक बीर श्रेष्ठो, तीन बीर उत्तम, एक बीर बिक्रम आणि ११ बीर प्रोतीक वीरता पुरस्कारांनी अलंकृत करण्यात आल. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किलो फ्लाईटच्या पायावर बंगला देशाच्या वायू सेनेची भव्य इमारत उभी करण्यात आली.
या युद्धा संबंधीच्या अनेक अनुत्तरित प्रश्नांपैकी
अ) संरक्षण मंत्रालयाच्या ऑफिशियल वॉर हिस्ट्रीमध्ये इंदिरा सरकारवर आलेल्या आंतरराष्ट्रीय राजकीय दबावाबद्दल काहीच उल्लेख केला नाही,
ब) त्यामध्ये स्पेशल फ्रंटियर फोर्स आणि बांगला देशच्या किलो फ्लाईटबद्दल काहीच माहिती दिलेली नाही. आमच्या सारखे एसएफएफचे निवृत्त नुमाइन्दे सोडता कोणालाही याबद्दल सूतराम कल्पना नाही आणि
क) त्यामध्ये युद्धातील चीनच्या भूमिकेची मीमांसा चीनी दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न झलेला नाही. १९६२ च्या चीनी आक्रमण संबंधातील हॅन्डर्सन ब्रूक्स रिपोर्ट अजूनही गोपनीयच आहे. त्याच प्रमाणे,१९७१ च्या युद्धातील इतर माहिती प्रसिद्ध करायलाही अनेक वर्षे लागतील. तोपर्यंत आपल्याला विदेशी माहितीवरच अवलंबून राहावं लागेल.