५ वर्षांपूर्वी भाजपने कॉंग्रेसचा जनादेश चोरला

0
27

>> राहुल गांधी यांचे जोरदार टीकास्त्र; सत्ता उपभोगूनही विकासकामांकडे दुर्लक्ष

गेली ५ वर्षे भाजपने सत्ता उपभोगली; परंतु त्यांना जनतेचा कौल मिळाला नव्हता. गोव्यातील जनतेने गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिला होता; मात्र भाजपने हा जनादेश चोरला आणि पैशाच्या जोरावर घोडेबाजार करून, भ्रष्ट मार्गाने सत्ता काबीज केली. सत्ता मिळवली; परंतु त्यानंतर भाजपने गेल्या ५ वर्षांत कोणतीच विकासकामे केली नाहीत, अशी टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी काल केली.

मडगाव येथे काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, वेणूगोपाल, पी. चिंदबरम्, दिनेश गुंडू राव, अमरनाथ पणजीकर, खासदार फ्रान्सिस सार्दिन, अल्का लांबा, सुनील कवठणकर उपस्थित होते.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आणि प्रत्येक गरिबाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्‍वासन दिले; पण ही आश्‍वासने फक्त निरर्थक घोषणा ठरल्या. गोव्यात गेल्या पाच वर्षांत बेरोजगारी वाढली. पर्यावरणाचा र्‍हास झाला, पर्यटन क्षेत्र अधोगतीकडे नेले. मात्र यावर भाष्य न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोवा मुक्तीला झालेला उशीर हा मुद्दा पुढे करून विषय भलतीकडेच नेत आहेत. गोव्यातील जनता आता त्यांच्या भूलथापांना फसणार नसून, सर्वांगीण विकासासाठी कॉंग्रेस सरकारच सत्तेवर आणतील, असा विश्‍वास राहुल गांधींनी व्यक्त केला. कॉंग्रेसने जनतेच्या भावना जाणून बंडखोरी करून दुसर्‍या पक्षात गेलेल्या एकालाही उमेदवारी दिलेली नाही. कॉंग्रेसने बर्‍याच नवीन चेहर्‍यांना उमेदवारी दिली. हा पक्का निर्णय घेतल्यानेच बंडखोराना उमेदवारी दिली नाही, असे या संदर्भातील प्रश्‍नावर बोलताना त्यांनी सांगितले.
काही बंडखोरांना उमेदवारी दिल्यास ते जिंकून येण्याची शक्यता आहे, त्यांना उमेदवारी न देता पक्षाने चूक केली असे वाटत नाही का, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता, बंडखोरांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्यानेच गोव्याची जनता कॉंग्रेससोबत आहे, असे ते म्हणाले.

भाजप सरकारने गेल्या १० वर्षांत जी आश्‍वासने जनतेला दिली होती, ती कागदावरच राहिली. गोव्यातील बेरोजगारी आणि खाणबंदीचा प्रश्‍न या सरकारला सोडवता आला नाही. गोमंतकीयांना विश्‍वासात न घेता भाजपने प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला; पण कॉंग्रेसने जनतेच्या अनुमतीने गोव्याच्या हिताचे प्रकल्प आणण्याचे अभिवचन दिले आहे.

  • राहुल गांधी, कॉंग्रेस नेते.

मोदींना तेव्हाच्या परिस्थितीचे
भान नाही : राहुल गांधी

नरेंद्र मोदी आता गोवा मुक्तीला झालेला उशीर हा मुद्दा निवडणुकीत आणून गोव्याची दिशाभूल करीत आहेत. त्यावेळच्या परिस्थितीचा अभ्यास करूनच गोव्याच्या हितासाठी तसा निर्णय घेतला होता. मात्र त्याचे भान नरेंद्र मोदींना नाही. त्यांनी भाजपने गोव्यात काय विकासा साधला, हे सांगायचे सोडून भलत्याच ठिकाणी त्यांनी आपली गाडी वळविली, असा टोला राहुल गांधींनी लगावला.

सरकार कॉंग्रेसचेच

राहुल गांधी; कुडतरीत प्रचारसभा

यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजपमध्येच लढत आहे. या निवडणुकीनंतर राज्यात कॉंग्रेसचेच सरकार बनेल, अन्य पक्षांचे नाही. त्यामुळे आपले बहुमूल्य मत वाया घालवू नका. ३० ते ३५ उमेदवार निवडून पूर्ण बहुमताने कॉंग्रेसला विजयी करा, असे आवाहन राहुल गांधींनी काल केले.

राहुल गांधी यांनी काल संध्याकाळी कुडतरी मतदारसंघात प्रचारसभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुडतरीचे उमेदवार मोरेनो रिबेलो, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, खासदार फ्रान्सिस सार्दिन आणि अन्य नेते उपस्थित होते.

कॉंग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि तो नेहमीच सर्वांसाठी काम करतो. गोव्याला बेरोजगारीच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि भाजपच्या राजवटीत आर्थिक आपत्ती आली आहे. त्यामुळे आम्हाला गोव्याला रोजगार आणि विकासाच्या मार्गावर परत आणायचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

आम्ही रोजगार निर्मितीसाठी ५०० कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. याशिवाय, गोव्याला आयटी आणि नॉलेज हब बनवण्यासाठी आमचा प्रस्ताव आहे. जेव्हा या संकल्पना प्रत्यक्षात येतील तेव्हा रोजगाराच्या क्षेत्रात मदत होईल, असे राहुल गांधी म्हणाले.

आम्ही पक्षांतर करणार्‍यांना उमेदवारी दिलेली नाही आणि लोकांच्या भावनांचा आदर केला आहे. लोकांच्या इच्छेनुसार आम्ही नवीन चेहरे दिले आहेत. त्यामुळे निवडून आलेले आमदार आणि कॉंग्रेसचे मुख्यमंत्री जनतेचा आवाज ऐकतील, असेही ते म्हणाले.

भाजपने लोकशाहीची हत्या करून सरकार स्थापन केले. त्यामुळे जनतेने त्यांना धडा शिकवला पाहिजे. भाजपने आमच्या आमदारांना लुटले आणि सरकार स्थापन केले. भाजप लोकांच्या इच्छेविरुद्ध गेला आणि सरकार स्थापन केले. गोवावासीयांनी भाजपला नव्हे, तर कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता, असे फ्रान्सिस सार्दिन म्हणाले.