४ लाख लोक अजून अडकलेलेच

0
103
पुराच्या तडाख्यातून सुरक्षित हलविण्यात आलेले नागरिक श्रीनगरमधील एका निवारा केंद्रा बाहेर.

काश्मीरातील बळींची संख्या २००
भारतीय लष्कर, हवाई दल यांच्या हजारो जवानांच्या माध्यमातून आतापर्यंत जम्मू-काश्मीरमधील सुमारे ३ हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून सुमारे ४ लाख लोक पूरग्रस्त भागांमध्ये अजूनही अडकून पडले आहेत. तर या प्रलयात बळी पडलेल्यांची संख्या २०० वर पोचली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मदत कार्याविषयी माहिती देताना लेफ्टनंट चेतन यांनी सांगितले, ‘‘आम्ही एका वेळी (प्रत्येकी फेरीस) एका बोटीतून १० ते १५ जणांना सुरक्षित स्थळी पोचवितो. दर दिवशी आम्ही अशा ५० ते ६० फेर्‍या मारतो. मदत कार्यालाही आवश्यक सर्व साधने आमच्याजवळ असून प्रत्येकाची सुटका झाल्यानंतरच आमची मोहीम थांबेल.’’ त्याआधी सोमवारी लष्कर प्रमुख जनरल दलबीर सुहाग यांनी सांगितले की, पूरग्रस्त प्रदेशातील शेवटच्या माणसाची सुटका झाल्यानंतरच सैनिक बराकींमध्ये परततील.
लष्कराचे वैद्यकीय अधिकारी जगदिश सिंग यांनी सांगितले की, आम्ही वैद्यकीय शिबिरे सुरू केली असून प्रतीदिन २५० ते ३०० जणांची तपासणी केली जाते.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना तेथून मोफत अन्यत्र हलविण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. तर गुजरात व बिहार सरकारांनी पूरग्रस्त राज्यात अन्नधान्याची व खाद्य पदार्थांची ७५ हजार पाकिटे पाठवली आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव अजित सेठ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाल्यानंतर एअर इंडियाने वरील निर्णय घेतला. सध्या यासाठी दोन विमाने तयार ठेवली आहेत.