नवी दिल्ली येथील निजामुद्दीन येथे मर्कझ प्रार्थनासभेसाठी गोव्यातून गेलेल्या सर्व ४६ जणांची ओळख पटलेली असून त्या सर्वांना समाजातील विलगीकरणाखाली वेगळे ठेवण्यात आले असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. या ४६ जणांपैकी एकही जण गोमंतकीय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे की काय हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हे ४६ जण नेमके कशासाठी गोव्यात आले होते, त्यांची चौकशी करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या ४६ जणांची सविस्तर चौकशी करण्यात तर येणार आहेच. पण त्याचबरोबर आणखीही काहीजण गोव्यात आले होते की काय आणि आले होते तर ते सध्या कुठे आहेत. ते येथील लोकांमध्ये मिसळत तर नाही ना याची सगळी माहिती गोळा करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.या प्रार्थना सभेसाठी गेलेल्या या लोकांमुळे गोव्यात कोरोनाचा फैलाव होण्याची भीती असल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या सभेसाठी २५०० जण आले होते. आणि विदेशातून जे नागरिक आले होते त्यापैकी बरेच जण हे व्हिसा नियमांचा भंग करुन देशात आले होते अशी माहिती आता उघड झाली असल्याचे केद्र सरकारमधील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.