३ डिसेंबरपासून कला अकादमीत सूर-तालाचा अनोखा संगम

0
94

जश्‍न-ए-बेगम अख्तरमध्ये दिग्गजांची उपस्थिती
ख्यातकीर्त गायिका बेगम अख्तर यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली, यांनी कला अकादमी गोवाच्या सहकार्याने गोमंतकीय संगीत व नृत्यप्रेमी रसिकांसाठी येत्या दि. ३ ते ६ डिसेंबर या कालावधीत रोज सायं. ६ वाजता ‘रुह-ए-गझल, जश्‍न-ए-बेगम अख्तर’ हा गझल व कथकनृत्याचा महोत्सव दीनानाथ मंगेशकर कलामंदिर, पणजी येथे आयोजित केला आहे. महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे गोवा राज्याचे कला व संस्कृतीमंत्री व कला अकादमीचे अध्यक्ष दयानंद मांद्रेकर यांच्या हस्ते बुधवार दि. ३ डिसेंबर रोजी सायं. ६ वा. संपन्न होणार असून पद्मश्री पं. प्रसाद सावकार व अकादमीचे उपाध्यक्ष सुशांत खेडेकर, हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. यावेळी सदस्य सचिव प्रसाद लोलयेकर, संगीत नाटक अकादमीच्या उपसचिव डॉ. रिटा स्वामी चौधरी व वाय. थेबादेवी इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहेत. महोत्सवातील कार्यक्रम संगीत व नृत्यप्रेमी रसिकांसाठी खुले असून काही आसनव्यवस्था राखीव असेल.
गोव्यातील महोत्सवात बुधवार दि. ३ डिसेंबर १४ रोजी सायं. ६ वाजता उद्घाटन समारंभाला जोडून रिटा गांगुली-गझल व त्यानंतर पं. बिरजू महाराज व त्यांच्या शिष्या श्रीमती शाश्‍वती सेन यांचा कथकनृत्य कार्यक्रम संपन्न होणार आहे. गुरुवार दि. ४ डिसेंबर रोजी सायं. ६ वा. जयपूर येथील प्रसिध्द गझल गायक उ. अहमद हुसैन व मोहम्मद हुसैन यांचे गझलगायन, प्रभाती मुखर्जी व तानया भादुरी यांचे गझल गायन त्यानंतर मालविका मित्रा व साथी कलाकारांचे कथकनृत्य सादर होणार आहे. शुक्रवार दि. ५ डिसेंबर १४ रोजी सायं. ६ वा. प्रसिध्द गायक तलत अझिझ यांच्या गझलगायनाचा कार्यक्रम व त्यानंतर राणी खानम व सहकलाकारांचा कथकनृत्याचा कार्यक्रम होईल. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजे शनिवार दि. ६ डिसेंबर सायं. ६ वा. शांती हिरानंद व विद्या राव यांच्या गझल सादरीकरणाच्या कार्यक्रमानंतर उमा शर्मा व सहकलाकारांच्या कथ्थक नृत्य प्रस्तुतीने या महोत्सवाची सांगता होणार आहे.
या सर्व प्रमुख कलाकारांना अख्तर हसन, उत्पल घोषाल, झुहेब अहमद खान, सजल मित्रा, दिनानाथ मिश्रा, जितू शंकर, नौशाद अहमद, नवाब अली व मुबारक खान (तबला), सलामत अली (संवादिनी), कमल अहमद, अनिलकुमार मिश्रा, उमेश मिश्रा व घनश्याम सिसोदीया (सारंगी), मेघना कोठारी, अनिर्बन भट्टाचार्य, तानया भादुरी, प्रभाती मुखर्जी, ब्रिजेश मिश्रा व इम्रान खान (गायन), भूपाल पणशीकर, सईद अहमद खान, संदीप नेवगी व खलीद मुस्तफा (सतार), शाश्‍वती सेन, सुनील अंबावता, दिव्या, सुकृती, अनुष्का, सीमा छाब्रा व ज्योती गर्ग (नृत्यसहकलाकार) जफर मिर्झा, देवेन योगी (कीबोर्ड), योगराज पनवर (पढंत), विप्लब रॉय (संगीतसाज), पियुष शंकर (पर्कशन), निनाद मुळावकर (बासरी), इक्बाल वारसी (व्हायोलीन) ऋषभशंकर (जॅम्बे) या तोलामोलाच्या कलाकारांची साथसंगत लाभणार आहे.
बेगम अख्तर या गझल, ठुमरी, दादरा व हिंदी सिनेसंगीतात पार्श्‍वगायन करणार्‍या नामवंत गायक कलाकार म्हणून संपूर्ण हिंदुस्थानात सुपरिचीत होत्या. त्यांचे शास्त्रीय संगीतपर शिक्षण पतियाळ घराण्याचे उ. अता महम्मद खान व किराणा घराण्याचे उ. अब्दुल वाहिद खान यांच्याकडे झाले होते. वयाच्या ७व्या वर्षी गायक कलाकार म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर आयुष्यातील अनेक चढउतार पचवून संगीत क्षेत्रात नाममुद्रा कोरलेल्या या दिग्गज गायिकेला तिच्या योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार व पद्मभूषण (मरणोत्तर) प्रदान करून त्यांची दखल घेण्यात आली होती.