२४ तासांत ३९ मृत्यू, १५४९ बाधित

0
111

>> मंगळवारी २०८२ जण कोरोनामुक्त

राज्यात कोरोना विषाणूमुळे अजूनही मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. काल मंगळवारी कोरोनामुळे ३९ जणांचा मृत्यू झाला. तसेच कोरोनाबाधित १५४९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे सध्याची कोरोनाची रुग्णसंख्या १५,७०६ एवढी आहे. तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २४६० एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,४९,४१० एवढी झाली आहे.
काल राज्यात २०८२ जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,३१,२४४ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.८४ टक्के झाले आहे. अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

काल दिवसभरातील चोवीस तासांत राज्यात एकूण ५०४४ एवढ्या स्वॅबच्या चाचण्या करण्यात आल्या. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने १३९७ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर १५२ नवे रुग्ण इस्पितळात विलगीकरणात राहिले आहेत. दरम्यान, काल रविवारी कोरोनामुक्त झाल्यामुळे इस्पितळातून १४४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

मडगावात सर्वाधिक रुग्ण
राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या मडगावात असून ती १४८० एवढी झाली आहे. चिंबल ८७०, पणजीत ८४९, फोंडा ८४३, पर्वरीत ६४९, कांदोळी ८००, कासावली ६२४, कुठ्ठाळी ६७६, पेडणे ४४०, वास्को ५२७ अशी सध्याची रुग्णसंख्या आहे.
कोरोना संसर्ग झालेल्या २५,७९० जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर १,००,१४९ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ७,९६,९८४ जणाची कोरोना चाचणी झाली आहे.

३९ जणांचा मृत्यू
काल राज्यात कोरोनामुळे ३९ जणांचा मृत्यू झाला. त्यात बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात १९, मडगावच्या जिल्हा इस्पितळात ११ जणांचा, इएसआय इस्पितळ मडगावात १, केपे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाचा, कोलवाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाचा, मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात एक तर उत्तर गोव्यातील एका खासगी इस्पितळात दोघांचा तर दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात तिघांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतलेल्या चौघांचा समावेश आहे.