>> अद्याप निवृत्तीचा नाही विचार ः अँडरसनने केले स्पष्ट
इंग्लंडचा अनुभवी व प्रमुख द्रुतगती गोलंदाज जेम्स अँडरसनच्या निवृत्तीबाबत बर्याच वावड्या उठत आहेत. परंतु खुद्द अँडरसननेच त्याला विराम देण्याचा प्रयत्न केला आहे. आपला अद्याप निवृत्तीचा विचार नसून २०२१-२२ ऍशेस मालिकेपर्यंत आपण खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
इंग्लंडकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असलेल्या अँडरसनला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेनंतर पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या लढतीत त्याला संघात स्थान देण्यात आले होते. परंतु दोन्ही डावात मिळून त्याला केवळ १ बळी मिळविता आला. त्यासाठी त्याला ९७ धावा मोजाव्या लागल्या. त्यामुळे तो लवकरच निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. परंतु त्यानेच आपण एवढ्यात निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट केले. माझा निवृत्त होण्याचा विचार नाही आहे. मला अजूनही खेळाचेय. माझ्यात खेळायची अजूनही भूक बाकी आहे. एका सामन्यातील खराब कामगिरीमुळे निराश होणे योग्य नाही. मला खेळावेसे वाटते तोपर्यंत मी खेळत राहणार. शक्यतो पुढील वर्षाच्या ऍशेस मालिकेपर्यंत असे अँडरसनने स्पष्ट केले.