१ नोव्हेंबरनंतर राज्य खड्डेमुक्त

0
32

>> मुख्यमंत्र्यांची कुंकळ्ळी येथे ग्वाही

१ नोव्हेंबरनंतर राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही. दिसला तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संबंधित अभियंत्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
कुंकळ्ळी येथे आयोजित केलेल्या ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मत्स्योद्योग मंत्री फिलीप नेरी, आमदार क्लाफासियो डायस, जिल्हा अधिकारी रुचिका कटियाळ आदी उपस्थित होत्या.

रस्त्यांवरील खड्‌ड्यांमुळे जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यांवरील खड्‌ड्यांत भर पडली आहे. मात्र यापुढे १ नोव्हेंबरनंतर राज्यातील रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही, दिसल्यास संबंधित अभियंत्यांवर कारवाई होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी खड्‌ड्यांसोबत सेल्फी काढून आंदोलन करणार्‍या आमदार दिगंबर कामत यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली.

आगामी तीन महिन्यांत राज्यातील सर्व मतदारसंघात सरकारकडून विकासकामे केली जाणार आहेत. विकासकामे करताना कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. विरोधी आमदारांच्या मतदारसंघात देखील विकासकामे होणार असून, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.