>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
९ हजार सरकारी पदे भरण्याची प्रक्रिया गोवा मुक्ती दिनापर्यंत अर्थात येत्या १९ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. आपण १० हजार सरकारी पदे भरण्याचे आश्वासन दिले होते, त्यापैकी १ हजार पदे यापूर्वीच भरण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
आल्तिनो येथील आपल्या शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कामगार व रोजगार मंत्री जेनिफर मोन्सेरात उपस्थित होत्या.
आतापर्यंत ८ हजार सरकारी पदे भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित १ हजार पदांसाठीच्या जाहिराती लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यांची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विविध सरकारी खात्यातील शिल्लक असलेली ९ हजार पदे भरण्याची प्रक्रिया येत्या १९ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
स्थानिक युवकांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी कामगार खात्यामार्फत ‘स्वयंपूर्ण युवा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्यासाठी येत्या दि. २७ रोजी म्हापसा येथील डीएमसी महाविद्यालयात, तर दि. ३० रोजी फोंड्यातील जीव्हीएम महाविद्यालयात युवा रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यातून राज्यातील किमान एक हजार युवक-युवतींना नोकर्या मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या स्वयंपूर्ण युवा कार्यक्रमात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी ुुु.सेरक्षेलषरळी.ळप या संकेतस्थळावरून नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.