राज्यातील १९१ ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाइन कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू केली जाणार आहेत. तसेच, वनविभागातील ९२ घरांना येत्या तीन – चार महिन्यांत वीज कनेक्शन दिली जातील, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल दिली.
वीजखात्याच्या घरगुती कनेक्शन ऑनलाइन सुविधा आणि कायदा खात्याच्या विवाह नोंदणी ऑनलाइन सुविधेचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.
राज्यातील काही नागरिक मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन सेवांचा लाभ घेतात. मात्र काहीजणांना सुविधेच्या अभावामुळे या सुविधेचा लाभ घेण्यास अडचण येते. त्यामुळे राज्यातील १९१ ग्रामपंचायतींमध्ये ऑनलाइन कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू केली जाणार आहेत. राज्यात ७६ ठिकाणी ही सेंटर सुरू केली असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, वनक्षेत्रात राहणार्या ९२ लोकांना वीज जोडण्या देण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. वीज खात्याच्या घरगुती कनेक्शन ऑनलाइन सुविधा आणि विवाह नोंदणी ऑनलाइन सुविधेचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना लाभ होणार आहे. राज्यात विवाह नोंदणीची सुविधा घरबसल्या करण्याची सोय उपलब्ध झाली आहे, अशी माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.