बिहारच्या मुख्यमंत्रिपदी सातव्यांदा नितीशकुमार यांनी घेतली शपथ

0
270

>> उपमुख्यमंत्रिपदावर भाजपचे तारकिशोर प्रसाद, रेणू देवी

नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काल सोमवारी शपथ घेतली. राजभवनात राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीशकुमार यांच्यासोबत आणखी १४ मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. या शपथ सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा, अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने या शपथग्रहण सोहळ्यावर बहिष्कार टाकला.

सातव्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या नितीशकुमार यांनी पहिल्यांदा ३ मार्च २००० मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र बहुमत सिद्ध न करू शकल्याने त्यांना केवळ ७ दिवसांतच राजीनामा द्यावा लागला होता. मात्र सन २००५ मध्ये लालूप्रसाद यादव यांची १५ वर्षांची राजवट समाप्त करत नितीशकुमार यांनी एनडीएला बिहार विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करून दिला. तेव्हा त्यांनाच बिहारचे मुख्यमंत्री निवडले गेले होते. त्यांनी आपला तिसरा कार्यकाल २६ नोव्हेंबर २०१० ते २० मे २०१४ पर्यंत चालला. त्यानंतर जीतनराम मांझी यांनी सत्ता सांभाळली.

२२ फेब्रुवारी २०१५ मध्ये नितीशकुमारांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचा चौथा कार्यकाल २२ फेब्रुवारी ते २० नोव्हेंबरपर्यंत चालला. १६व्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीनंतर नितीशकुमार यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीशकुमार यांचा पाचवा कार्यकाल २० नोव्हेंबर २०१५ पासून ते २६ जुलै २०१७ पर्यंत होता. २६ जुलै २०१७ मध्ये त्यांनी आरजेडी आणि कॉंग्रेससोबतची आघाडी तोडल्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. २७ जुलै २०१७ ला बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर २४ तासांनंतर नितीशकुमार यांनी भाजप आणि रालोआच्या पाठिंब्याने बिहारचे सहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर काल सोमवारी त्यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजप नेते तारकिशोर प्रसाद व रेणू देवी यांची निवड झाली असून शपथविधी सोहळ्यात राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना शपथ दिली. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपचे बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

यावेळी जेडीयू नेते विजयकुमार चौधरी, विजेंद्रप्रसाद यादव, अशोक चौधरी आणि मेवालाल चौधरी यांनी तर हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रमुख जितनराम मांझी यांचे पुत्र संतोषकुमार सुमन आणि विकासशील इन्सान पक्षाचे मुकेश साहनी यांनीही बिहारच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
काल नितीशकुमार यांनी, भाजपमधून कोणीतरी मुख्यमंत्री व्हावे असे आपल्याला वाटत होते. पण भाजपन आपणाला आग्रह केल्यामुळे मी मुख्यमंत्री पदावर विराजमान होत असल्याचे सांगितले होते.

तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना शुभेच्छा देताना, अपेक्षा करतो की खुर्चीच्या महत्वाकांक्षेऐवजी बिहारच्या जनतेची अपेक्षा व रालोआच्या १९ लाख नोकर्‍या-रोजगार आणि शिक्षणसारख्या सकारात्मक मुद्द्यांना नितीशकुमार प्राधान्य देतील असे म्हटले आहे.