१८२ प्राथमिक शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू

0
105

शिक्षण खात्याने अखेर १८२ सरकारी प्राथमिक शिक्षकांच्या भरतीसाठी (मराठी माध्यम) प्रक्रिया सुरू केली आहे. तत्‌संबंधीची जाहिरात प्रसिद्ध केली असून येत्या ६ सप्टेंबरपर्यंत उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहेत.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी १८२ शिक्षकांच्या भरतीची घोषणा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या १८२ प्राथमिक शिक्षकांच्या जागांपैकी ओबीसीसाठी ४५ जागा, एसटीसाठी ४३ जागा, एससीसाठी ३ जागा, माजी सैनिकांसाठी १२ जागा, दिव्यांगांसाठी २४ जागा, स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी ९ जागा आणि क्रीडापटूंसाठी ९ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
प्राथमिक शिक्षक जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारल्यानंतर अर्जदाराच्या ईमेलवर पोच पावती दिली जाणार आहे. त्यानंतर ११ सप्टेंबरपर्यंत पोच पावतीच्या प्रतीसह अर्ज करणार्‍या उमेदवारांनी आपल्या अर्जाची एक प्रत शिक्षण खात्यात जमा करावी. पर्वरी येथील कार्यालयात वैयक्तिकरीत्या आणून दिलेल्या अर्जाच्या प्रती स्वीकारल्या जाणार नाहीत. ११ सप्टेंबरनंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच पोस्टाच्या माध्यमातून पाठविण्यात येणारे अर्जसुद्धा स्वीकारले जाणार नाहीत, असे खात्याने जाहिरातीत नमूद केले आहे. अर्जदारांनी सूचनांचे सविस्तर योग्य प्रकारे वाचन करून अर्ज भरावा, असे सूचित करण्यात आले आहे. अर्जदारांसाठी वयाची मर्यादा ४५ एवढी आहे. सरकारी कर्मचारी, राखीव जागांसाठी वयोमर्यादा थोडी शिथिल करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा दोन विभागांतून घेतली जाईल. त्यात एका भागात सामान्य ज्ञानाचा पेपर इंग्रजीमध्ये तर दुसरा भाग मराठी भाषेत शिक्षण कौशल्यावर असेल, असे नमूद करण्यात आले आहे.

या प्राथमिक शिक्षक पदांसाठी उमेदवार १२ वी उत्तीर्ण तसेच प्राथमिक शिक्षणातील डिप्लोमा किंवा शिक्षणातील २ वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केलेला किंवा, १२ वी तसेच ४ वर्षांचा प्रशिक्षण शिक्षणातील पदवीधर असला पाहिजे, असेही म्हटले आहे.