>> चिखली-वास्को पेट्रोल पंपवरील घटना
>> संशयित महिला निघाली सफाई कर्मचारी
चिखली येथे काल रात्री पेट्रोल पंपवर झालेल्या चोरी प्रकरणी सफाई कर्मचारी पवित्रा कुमारी (२५, नेपाळ) या संशयित आरोपीला १२ तासांत गजाआड करण्यात वास्को पोलिसांना यश आले असून तिच्याकडील १३ लाख १४ हजार ८५५ रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.
वास्को पोलीस स्थानकाच्या उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेनऊच्या दरम्यान चिखली येथील कर्मा पेट्रोल पंपवर चोरी झाल्याची तक्रार निना वाझ यांनी वास्को पोलीस स्थानकात दिली होती. तक्रारीत तिने पेट्रोल विक्री करून जमलेली रोख रक्कम १४ लाख १९ हजार ७०० रुपये गायब झाल्याचे म्हटले होते. दरम्यान, वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक नालास्को रापोझ तसेच उपनिरीक्षक तपास अधकारी सर्वेश सावंत यांनी साथीदारांसह घटनास्थळी धाव घेऊन चौकशी व पाहणी केली. त्यानुसार सदर चोरी पंपवरील कर्मचार्यानेच केल्याचा पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार त्यांनी तपास कार्याला वेग दिला व पेट्रोलपंपवर पाच महिन्यांपूर्वी झाडूवाली म्हणून नियुक्त केलेल्या स्त्री कर्मचारी पवित्रा कुमारी (२५, नेपाळ) हिला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबुली दिली. संशयित आरोपीने पेट्रोल पंपच्या कार्यालयाच्या मागील बाजूला काळोखाचा फायदा घेऊन या कार्यालयाची काचेची खिडकी तोडून आत प्रवेश केला.
संशयित आरोपीला पैसे कुठे ठेवतात याविषयी सर्व माहिती होती. त्यानुसार तिने चोरीची योजना आखून रात्री चोरी करून या कार्यालयातील १४,१९,७०० रुपये रोख रक्कम आपल्या आदर्शनगर येथे राहत असलेल्या खोलीत एक सुटकेसमध्ये लपवून ठेवली होती. ती पोलिसांनी हस्तगत केली असता १३ लाख १४ हजार ८५५ रुपये पोलिसांच्या हाती लागले. मात्र, तक्रारीत १४ लाखांहून अधिक रक्कम चोरी झाल्याचे नमूद केले होते. संशयित आरोपी पवित्रा कुमारी हिला वास्को पोलिसांनी काल सकाळी ताब्यात घेऊन १२ तासांत चोरीचा छडा लावण्यास यश मिळविले.