सायप्रस व ग्रीसमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे अडकलेल्या १४५० दर्यावर्दींचे काल गुरूवारी मुरगाव बंदरात ‘सेलेब्रिटी इन्फिनिटी’ या जहाजातून आगमन झाले. या सर्वांची स्वॅब चाचणी सुरू झाली असून चाचणी नमुने गोळा करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अहवाल येईपर्यंत सर्व दर्यावर्दींना याच जहाजात ठेवण्यात येणार आहे. अहवाल आल्यानंतर दर्यावर्दींना विलगीकरणासाठी घरी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोग्य चाचणी व स्वॅब नमुने गोळा करण्यासाठी डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी मिळून ५० जण मुरगाव बंदरात तैनात आहेत.
टाळेबंदी काळात गेल्या तीन महिन्यांपासून विविध राष्ट्रांत अडकून पडलेल्या भारतीय दर्यावर्दींमध्ये गोमंतकीयांची संख्या चार हजारांहून जास्त आहे. पहिल्या तीन टाळेबंदीत केंद्र सरकारतर्फे शिथिलता आणल्यानंतर या दर्यावर्दींना आपल्या मायदेशी आणण्याचे काम केंद्र सरकार तर्फे युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानुसार आजपर्यंत दोन हजारांहून जास्त गोमंतकीय दर्यावर्दींना युरोप, ब्राझील, जर्मनी, लंडन, ग्रीस, आदी राष्ट्रांतून गोव्यात केंद्र व गोवा सरकारतर्फे गोव्यात आणण्यात आले.
दरम्यान, सायप्रस व ग्रीसमध्ये अडकलेल्या १४५० गोमंतकीय दर्यावर्दींना घेऊन काल सकाळी ‘सेलेब्रिटी इन्फिनिटी’ हे जहाज दोन दिवस मुंबई बंदरात वास्तव्यानंतर मुरगाव बंदरात सकाळी आठ वाजता पोहोचणार होते.मात्र ते अडीच तास उशिरा ११.३० वाजता दाखल झाले. त्यानंतर खलाशांची स्वॅब चाचणी घेण्यासाठी नमुने गोळा करण्याचे काम बंदरात करण्यात आले. नमुने गोळा केल्यानंतर त्यांच्या चाचणीचा अहवाल येईपर्यंत या सर्व दर्यावर्दींना याच जहाजात ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे जहाज मे. जे. एम बक्षी यांच्या प्रायोजनाखाली मुरगाव बंदरात दाखल झाले आहे.