१२-१४ वयोगटातील ५७% मुलांना लस

0
16

>> राज्यात ज्येष्ठ नागरिकांचा बुस्टर डोसला प्रतिसाद नाही

राज्यातील १२ ते १४ वयोगटातील आत्तापर्यंत ५६.९५ टक्के मुलांना कोविड लस देण्यात आली आहे. या वयोगटातील सुमारे २७ हजार ५६५ मुलांना कोविड लस देण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १२ ते १४ वयोगटातील ८७८० मुलांना कोविड लस देण्यात आली असून सुमारे ४८,४०० मुलांना कोविड लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

राज्यातील १५ ते १७ वयोगटातील सुमारे ९०.९७ टक्के मुलांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, ७५.३४ टक्के मुलांना कोविड लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

राज्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन कर्मचारी आणि ६० वर्षावरील नागरिकांच्या बूस्टर डोसला चांगला प्रतिसाद लाभत नाही. आत्तापर्यंत ३१.७७ टक्के जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. राज्यात १८ वर्षावरील नागरिकांना कोविड लसीचा डोस देण्याचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठलेले आहे.

राज्यातील सक्रिय कोरोना
रुग्णसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील कोरोनाबाधित सक्रीय संख्या २० पेक्षा कमी झाली असून ती १७ एवढी आहे. राज्यात मागील चोवीस तासांत नवीन ४ कोरोनाबाधितांची नोंद झाली. मात्र आणखी कोरोना बळींची नोंद झाली नाही. राज्यातील गेल्या चोवीस तासांत नवीन ४८८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ४ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आत्तापर्यंत ३८३२ एवढी आहे. राज्यात मागील चोवीस तासांत १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४३ टक्के एवढे आहे.