॥ मनःशांतीसाठी संतवाणी ॥ ध्यान-चिंतनातून मनःशांती

0
211

– प्रा. रमेश सप्रे

मनःशांतीसाठी संपन्न जीवन जगताना संबंध-संचय यात न गुंतता – बंधनं न वाढवता एकेका पाशातून सुटत मृत्यूनंतरही मृत्युंजय – अमृत अवस्थेत राहणं हे जीवनध्येय असलं पाहिजे. त्यासाठी महाकाल शिवाचा मृत्युंजय मंत्र जपला पाहिजे. त्याहिपेक्षा ‘जगला’ पाहिजे.
ॐ त्र्यंबकं यजामहे | सुगंधिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बंधनात | मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः॥

रात्री आकाशाचं पुस्तक वाचा. दिवसा निसर्गाचा ग्रंथ अभ्यासा… असं करताना तुमचं शिक्षण सतत सुरू राहील. पावलोपावली गुरु भेटतील. त्यासाठी एक गोष्ट मात्र करायला हवी. ती म्हणजे – स्वतः लघू बनलं पाहिजे. लहान बनल्याशिवाय महान बनता येत नाही. ‘लहानपण देगा देवा’ असं म्हणताना तुकोबा मार्मिक उदाहरण देतात –
‘मुंगी साखरेचा रवा’- साखरेचा कण एखाद्या गुळाच्या ढेपेएवढा मोठा वाटतो. ‘महापुरे झाडे जाती | परि लव्हाळे टिकती ॥ – मोठे मोठे वृक्ष महापुरात उन्मळून वाहून जातात, पण ते लहान (नम्र) गवत – त्याच्यावरून अख्खा महापूर गेला तरी नंतर ते पुन्हा ताठ मानेनं उभं राहतं.
‘ऐरावत हत्ती थोर | तया अंकुशाचा मार ॥ – ऐरावत हत्ती एवढा मोठा – आकारानं नि प्रकारानंसुद्धा कारण तो अमृतमंथनाच्या वेळी समुद्रातून निघाला. पण तरीही त्याला सतत टोकदार अंकुशाचा मार सहन करावा लागतो.
– ही सारी संतवाणी आहे. संतांची जीवनोपयोगी शिकवण आहे. अवधूत दत्तात्रेयांनी निसर्गातील केलेल्या विविध गुरुंचं मर्म हेच आहे. दत्तात्रेय निसर्गशरण होते. दिगंबर – दिशांचं वस्त्र; अनिकेत विचरण (संचार); ‘तरुतल शयनम् | करतल भोजनम् ॥ अशी जीवनशैली होती अवधूतांची. पण मन अतिशय शांत, बुद्धी स्थिर अन् चित्त शुद्ध अशी अत्यंत तृप्त, संतुष्ट, समाधानी, आनंदी अशी जीवनमुक्त अवस्था त्यांची होती.
सदासर्वदासर्वत्र गुरुदर्शन होत असल्यानं स्वतः कायम विद्यार्थी राहिले. गुरुपरायण राहिले. चराचराला शरण गेले. अहंकार त्यागून सर्व प्रकारच्या जीवांना गुरुस्थानी ठेवून शांत जीवन जगत राहिले. प्रत्येक वस्तूला, व्यक्तीला, कीटक-पक्षी-प्राणी आणि अर्थातच माणसांना शरण जाऊन प्रत्येकाचे गुण आत्मसात केले अन् स्वतःचं जीवन कृतार्थसंपन्न बनवलं.
कृमीकीटक तसं म्हटलं तर त्याज्य, दुर्लक्षित करण्यासारखे जीव. त्यांच्यात गुरुत्वाच्या गुणांचं दर्शन हे खरं विश्‍वरूप दर्शन आहे. ‘जित देखूँ उत गुरु’ – जिकडे तिकडे गुरुच गुरु!
लहान मुलांच्या पुस्तकात गंमतीदार पाठ असतात. भाषेबरोबर भाषेची शैली सोपी सोपी उदाहरणं देऊन त्यांना शिकवायची असते. उदा.- मुलं आनंदानं उद्यानात जातात. तिथं बागडताना त्यांचा आनंद शतगुणित होतो. अनेक पटीनं वाढतो. ती नाचत गात उद्गारतात- ‘अहाहा! जिकडे तिकडे फुलेच फुले. जिकडे तिकडे मुलेच मुले. याच चालीवर म्हणता येईल. ‘जिकडे तिकडे गुरुच गुरु!’ हेच आनंदाचं निधान, समाधानाचा कोष किंवा तृप्तीची मंजुषा(पेटी) असू शकते.
अवधूतानं काही कीटकांना गुरुस्थानी मानून त्यांच्याकडून ‘अनुग्रह, उपदेश’ मिळवला, त्या गुरुंना वाणी नाही पण ते बोधाच्या चिरंतन खाणी आहेत. अवधूताच्या दृष्टीनं या गुरुंवर थोडं सहचिंतन करू या.
* कोळी (ऊर्णनाभी) – कोळ्याची जाळी आपण घरातील कोपर्‍यात पाहतो. अरण्यात तर मोठी मोठी जाळी असतात. ती एखाद्या कशिद्यासारखी (एंब्रॉयडरीसारखी) दिसतात. कुतुहलानं अवधूतांनी कोळ्याला जाळं विणताना पाहिलं. जाळ्यासाठी लागणारा धागा (ऊर्ण) आपल्या नाभीतून निघणार्‍या तंतूपासून मिळवतो. जाळं विणल्यावर त्यात कधीही न अडकता इतर कीटकांना अडकवतो. स्वतः कधीही जाळ्यात गुरफटत नाही. अशा प्रकारे आपलं जीवन तो घालवतो.
स्वतः निर्माण केलेल्या जाळ्यात तो स्वतः गुंतून राहात नाही हे जसं खरं तसंच आपलं आयुष्य संपत आलंय हे कळल्यावर आपण बनवलेलं, उदरनिर्वाहाचं साधन असलेलं ते जाळं गिळून टाकतो नि खाली पडून मरतो- मातीत मिसळून जातो. काहीही मागे उरत नाही. निशाणी, वारसा, वंशवृद्धी, स्मृती यापैकी काहीही शिल्लक राहत नाही. आपण मात्र आपल्या संसाराच्या, व्यवसायाच्या जाळ्यात पूर्णपणे गुरफटून राहतो. दुकानाच्या अनेक शाखा काढतो, व्यवसायाचं-उद्योगधंद्याचं एक जाळं (नेटवर्क) उभं करतो नि तक्रार करतो – ‘श्‍वास घ्यायलासुद्धा वेळ नाही.’- आनंदशून्य अस्तित्त्व, शांती नसलेलं आयुष्य जगत राहतो. कधी निवृत्त होण्याचा विचारच करत नाही. प्रपंचाची काम, इकडे तिकडे प्रवास, हे-ते नातेसंबंध यांचं एक सर्व बाजूंनी आवळून धरणारं जाळं निर्माण करतो अन् ‘सारं असून काहीही नाही’ हा पण अनुभव घेत अगतिक होतो. ही अगतिकता अहंकारामुळे आपण बोलून दाखवत नाही पण अनुभवत मात्र असतो. याला काही अपवाद अर्थातच असतात.
अलीकडच्या काळात स्वामी रामसुखदास नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले. त्यांचं जीवन म्हणजे मूर्तिमंत भगवद्गीता होती. ज्ञान-भक्तीच्या संगमावर कर्माचं प्रयाग उभं करून अखंड ध्यानानंदात असलेलं त्यांचं जीवन होतं. अनेक ग्रंथ लिहून असंख्य माणसांना- विशेषतः आध्यात्मिक साधकांना – त्यांनी व्यवहारात सहज उतरवता येईल असं मार्गदर्शन केलंय. त्यांच्या गीतेवरच्या महाग्रंथाचं नाव आहे ‘साधक संजीवनी गीता’. हे सांगण्याचं कारण म्हणजे अवधूतानं केलेल्या ‘ऊर्णनाभी’ कोळ्यासारखं त्यांचं जीवन अन् मरणसुद्धा होतं.
त्यांची स्वतःची अशी संपत्ती नव्हतीच. पण वापरातल्या ज्या वस्तू होत्या त्यांची व्यवस्था लावण्याविषयी आपल्या ‘ईच्छापत्रात’ त्यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्यापासून आपण खूप बोध घेऊ शकतो. आपल्या पार्थिवाचं (मृत देहाचं) दहन कोणत्याही विशेष जागी न करता एखाद्या जलप्रवाहाच्या काठी जिथं गायीवासरं पाणी पिण्यासाठी येतात – बसतात – जिथल्या मातीत त्यांची पावलं उमटतात अशा ठिकाणी केलं जावं. अस्थिविसर्जन वगैरे न करता वार्‍याबरोबर राख उडून जाईल – हाडांचे अवशेष पाण्यात जाऊन जलचरांना उपयोगी पडतील किंवा मातीत नष्ट होतील. माझे कपडे, इतर वस्तू, एवढंच काय पण चष्मा नि चपला सुद्धा एखाद्या गरीबाला देऊन टाकाव्यात. माझी पुस्तकं ग्रंथालयात विषयानुसार असलेल्या विभागात ठेवली जावीत. त्यांच्यासाठी स्वतंत्र विभाग, कपाट असं काहीही करू नये.
विशेष म्हणजे माझी जयंती-पुण्यतिथी साजरी करू नये कोणत्याही वास्तूला माझं नाव दिलं जाऊ नये, माझ्या स्मृतिप्रित्यर्थ कोणतीही स्पर्धा किंवा उपक्रम सुरू केला जाऊ नये. मी देह ठेवल्यावर माझा कोणताही अवशेष, स्मृती काहीही मागे ठेवू नये. समाधी वगैरे काहीही बांधू नये. कोणतेही विशेष उपचार – विधी केले जाऊ नयेत. कोणतंही अस्तित्व राहू नये. उरू नये.
हे इतक्या विस्तारानं सांगण्याचं कारण म्हणजे आजच्या काळात असं करणं शक्य आहे. रामसुखदास हे स्वामी होते. ऋषिकेश येथे गीता प्रेस गोरखपूरच्या माध्यमातून उभारलेल्या ‘स्वर्गाश्रमा’त त्यांचं बरंचसं आयुष्य गेलं. त्यांना हे सारं शक्य आहे, असं समजण्याचं कारण नाही. यात ‘प्रत्यक्ष’ त्यागापेक्षा मनाची वृत्ती – निवृत्ती, त्यागी वृत्ती – महत्त्वाची आहे.
आपल्या जीवनक्रमात जे चार ‘आश्रम’ मानलेले आहेत त्यातील ‘वानप्रस्थाश्रम – संन्यासाश्रम’ हे उत्तरायुष्यातील कालखंड विसरले गेलेयत. यातील ‘वन’ ‘संन्यास’ हे शब्दही मनाची अवस्था, जीवन जगण्याची अलिप्त शैली, साक्षीभावानं घटनाप्रसंगांकडे – पाहण्याची दृष्टी अशा गोष्टी सुचवतात.
अखेरच्या श्‍वासापर्यंत स्वतःच्या ‘मिळकतीला’, संपत्तीला चिकटून राहणं, एखाद्या काळ्या सर्पाप्रमाणे – भुजंगाप्रमाणे – आपल्या धनसंचयावर वेटोळं मारून बसणं यात जीवनाची सार्थकता नाही. कोणता वारसा मागे ठेवून जाणार याचा विचार केला पाहिजे. आपले गुण, ज्ञान, सेवा, संस्कार, कार्य मागे ठेवून जाणारे आजही आहेत. याउलट अमाप धनसंपत्ती ठेवून मरणार्‍या लोकांचे वारसच त्या संपत्तीसाठी एकमेकाचे शत्रू बनतात. काही लोकांना तर जिवंतपणीच हे सारं हताशपणे पहावं – भोगावं लागतं. ‘हेचि फल काय मम तपाला?’ असं म्हणावं लागतं. पण या सार्‍याचं मूळ आपल्या वासनेत – हव्यासात असतं हे मात्र लक्षात येत नाही – म्हणूनच अवधूतांनी ‘ऊर्णनाभी’ला गुरू मानलं.
* मधमाशी – लहानपणी फुलपाखरासारख्या मुलांच्या वृत्तीचं कौतुक केलं जातं. इकडून-तिकडे, या फुलावरून त्या फुलावर उडणारी फुलपाखरं सर्वांना आवडतात. उडणं-बागडणं-नाचणं याचं कौतुक लवकरच संपून आता अधिक कष्ट केले पाहिजेत. जीवनाला निश्चित ध्येय असलं पाहिजे असं सांगताना मधमाशीचं उदाहरण दिलं जातं. अनेक फुलाकडे जाऊन मध गोळा करून त्या विविध स्वाद असलेल्या मधावर अनेक प्रक्रिया करून एकच स्वाद असलेल्या मधाचा संचय आपल्या पोळ्यात करते. इकडे तिकडे ती रमत नाही. सतत कार्यरत असते. म्हणून अवधूतानं तिला गुरु केलं. तिच्याकडून सतत कष्ट करणं हा गुण घेतला पाहिजे पण अनावश्यक, अतिरिक्त संचय करण्याच्या वृत्तीचा मात्र त्याग केला पाहिजे. कारण त्यामुळेच मधमाशी स्वतःचा नाश करून घेते. ज्यावेळी मध गोळा करणारा (मधुहर्ता) येतो तेव्हा सर्वप्रथम तो मधमाशांना जाळून टाकतो किंवा उडवून लावतो नि नंतर मध गोळा करतो.
अवधूतांनी कसं वागायचं नि कसं वागायचं नाही या दोन्ही प्रकारच्या शिकवणुकीसाठी मधुमक्षिकेला (मधमाशीला) गुरु केलं.
* पेशकीट (किंवा सुपेशकृत्) – हा एक कीटक आहे. विशिष्ट ऋतूंत तो मोठ्या संख्येनं जन्मतो. त्यावेळी कुंभारीण माशी त्याला पकडते. दंश करून बधीर करते. आपल्या मातीच्या घरात आणून ठेवते व घराचं तोंड बंद करते. या काळात त्या पेशकीटानं त्या माशीला आपल्या मृत्यूच्या रुपातच पाहिलेलं असतं. ती केव्हाही येईल व आपल्याला मारून खाईल, या अखंड ध्यानानं नि चिंतनानं तो कीटक त्या माशीसारखा बनतो. त्याला पोखरण्याची शक्ती येते. कुंभारीण परत येण्यापूर्वीच तो त्या बंद केलेल्या भागाला छिद्र करून स्वतः मुक्त होतो. हे सारं पाहिल्यावर अवधूत विचार करतात की एखादा कीटक ज्याचं ध्यानपूर्वक चिंतन किंवा चिंतनपूर्वक ध्यान करतो त्याचं रूप नसलं तरी गुण, कौशल्य आत्मसात करून मुक्त होऊ शकतो तर मानव परमेश्‍वराचं ध्यान करून जीवनमुक्त का नाही बनू शकणार? त्या पेशकीटाला या गुणासाठी अवधूतानं गुरु केलं.
* या केवळ गुरुंच्या कथा अवधूत यदुराजाला सांगत नाहीये. तर प्रत्येकात असलेला गुण स्विकारून त्याचा आपल्या जीवनात उपयोग किंवा आचार घडवण्याची प्रेरणा आपल्याला देतोय. या सार्‍याचा मनःशांती, समाधान मिळवण्यासाठी खूपच उपयोग आहे.
* ऊर्णनाभी कोळ्यापासून – पूर्णपणे स्वयंपूर्ण असणं, कशातही न गुंतणं, एकेका बंधनातून मुक्त होऊन मृत्यूच्या स्वाधीन होणं हे गुण घेतले पाहिजे.
*मधमाशी आपल्याला सतत कष्ट (दीर्घोद्योग), सगळ्या वस्तूंकडून आवश्यक ती गोष्ट मिळवणं नि अनावश्यक, अमर्याद संग्रह न करणं या गोष्टी शिकवते.
* पेशकीट शिकवतो अखंड ध्यान-चिंतन-अनुसंधान नि त्यातून मिळवायच्या जीवनमुक्तीची युक्ती!
एकूण काय तर मनःशांतीसाठी संपन्न जीवन जगताना संबंध-संचय यात न गुंतता – बंधनं न वाढवता एकेका पाशातून सुटत मृत्यूनंतरही मृत्युंजय – अमृत अवस्थेत राहणं हे जीवनध्येय असलं पाहिजे. त्यासाठी महाकाल शिवाचा मृत्युंजय मंत्र जपला पाहिजे. त्याहिपेक्षा ‘जगला’ पाहिजे.
ॐ त्र्यंबकं यजामहे | सुगंधिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बंधनात | मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः॥