- प्रा. रमेश सप्रे
२०२० हे वर्ष कोकोग्रस्त गेलं. ‘कोको’ म्हणजे कोरोना नि कोविड या राहूकेतूंनी सार्या जगाला पिडलं. अजूनही त्यांची पीडा चालू आहेच. या पार्श्वभूमीवर साल २०२१ची उज्ज्वल चित्रं पाहू या. ‘सर्वे सन्तु निरामयाः’चा घोष करत स्वतःला व इतरांना शुभकामना देऊ या.. उगवत्या नववर्षाच्या!
पन्नास साठ वर्षांपूर्वी पहाटे – सकाळी – दुपारी – सायंकाळी अगदी रात्रीसुद्धा काही विशिष्ट मंडळी घराघरासमोर जाऊन निदान समोरच्या गल्लीतून फिरून आपली उपजीविका करत. मग पहाटे लोकांना उठवण्यासाठी एका हातात कंदिल नि दुसर्या हातात घुंगरु असलेली काठी घेऊन पिंगुळा ती वाजवत जाई. काहीजण त्याला थांबवून भिक्षा, पैसे, कपडे देत. पण तो याचक म्हणून यायचा. हल्लीसारखा भिकारी म्हणून नाही.
नंतर मोरपिसांची शंकूसारखी त्रिकोणी टोपी डोक्यावर घालून एका हाताला बांधलेल्या झांजा, दुसर्यात बासरी, पायात चाळ (घुंगरू) अशा अवतारात यायचा वासुदेव. घरातली माणसं विशेषतः मुलं त्याच्याभोवती जमायची. मग तो तालात स्वतःभोवती फेर धरत ‘दान पावलंऽ दान पावलंऽ’ म्हणत नाचायचा. तोही लोकसंस्कृतीचा एक घटक म्हणून यायचा. भिकारी म्हणून नव्हे. अशी अनेक मंडळी रोज यायची. अधूनमधून कुलफीवाले, बर्फ किसून त्याचा एका काटकीच्या आधारानं गोळा बनवून त्यावर निरनिराळ्या रंगांचं, रुचीचं गोड पाणी टाकून मोठ्या लॉलीपॉपसारखा तो ‘बरफ का गोला’ विकणारे येत. ‘चणेकुरमुरेशेंगदाणेऽ’ असा विचित्र उच्चार करत. किंवा ‘चनाचूरगरम’ असं चालीवर टिपेच्या आवाजात म्हणत संध्याकाळी येत असत.
यांच्यापेक्षा अगदी निराळा असा माणूस पंधरावीस दिवसातून यायचा. एखाद्या रस्त्याच्या कोपर्यात ठाण मांडायचा. एका लाकडी स्टँडवर ठेवलेली एक पेटी. तिला अष्टकोन असून प्रत्येक पृष्ठभागावर झाकण लावलेलं. पेटीवर एक भावली. तिच्या हातात बारक्या झांजा. कळ दाबली की त्या झांजा एकमेकावर आपटत नि एक फारसा मंजूळ नसला तरी ठेक्यात येणारा आवाज त्यातून बाहेर पडे. जोडीला त्या माणसाची आरोळी.. ‘आला रे आला बायस्कोपवाला!’ मग काय विचारता? घराघरातून तमाम बालकचमू त्याच्याभोवती जमायचा. काही भाग्यवान मुलांकडे एक आणा असायचा. मग तो त्यांना एकेक झाकण उघडून त्या भिंगात बघायला सांगे. आतलं विश्व अंतरीक्षासारखं वाटे. मग त्या भावलीच्या झांजा वाजवत तो खास आवाजात म्हणे ‘दिल्लीका कुतुब मिनार देखो! बंबई का इंडिया गेट वे देखो!’ एकेक चित्र आतल्या अंधारात प्रकाशित व्हायचं. मग एकेक ऐतिहासिक व्यक्ती, निसर्गातली दृश्य सारं आतल्या त्या मयसभेसारख्या मायावी वातावरणात चमकून जायचं. वर चालू असलेली त्याची लयबद्ध आवाजातली कॉमेंट्री आणि समोर ती ती चित्रं पाहताना काहीतरी अद्भुत पाहिल्याचं समाधान लाभायचं.
त्या बायस्कोपवाल्यापेक्षा त्याची ती बायोस्कोप नावाची गूढ, जादुई पेटी खूप भावत असे. ती दुनिया होती शब्दांची नि चित्रांची. स्थिर असणारी चित्रं त्या भावलीच्या हातातल्या झांजा नि त्या बायस्कोपवाल्याची वाणी (!) तो सारा अनुभव गंधर्व नगरात नेणारा असे.
आपण ज्या ‘बायोस्कोप’चा उल्लेख शीर्षकात केलाय तो यापेक्षा अगदीच वेगळा आहे. आपल्याला निरनिराळ्या स्कोपांचा परिचय आहे. या ‘स्कोप’साठी मराठीत खास शब्द नाही. त्यातल्या त्यात ‘दर्शक’ असा शब्द आहे. जसा- मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शक; दूरदर्शक म्हणजे टेलिस्कोप; कॅलिडोस्कोपसाठी शोभादर्शक; पाणबुडी पाण्याखाली असताना सागराच्या पृष्ठभागावरच्या हालचाली पाहण्यासाठी असलेल्या पेरिस्कोपसाठी परिदर्शक असे शब्द वापरात आहेत. पण डॉक्टरांच्या स्टेथॉस्कोपसाठी ‘हृदयाचे ठोके मोजण्याचं साधन’ असा अर्थ शब्दकोशात दिलाय. मराठी प्रतिशब्द नाही. वर उल्लेख केलेल्या बायोस्कोपसाठी तर चक्क सिनेमा हा शब्द वापरलाय.
आपल्या बायोस्कोप शब्दातला ‘बायो’ हा जीव या अर्थानं वापरलाय. जसे बायॉलॉजी (जीवशास्त्र), बायोगॅस (फ्युएल) म्हणजे जैववायू किंवा जैव इंधन. बायोग्राफी म्हणजे जीवनचरित्र. जीवाशी – जीवनाशी संबंधित सर्वात जवळची गोष्ट म्हणजे आरोग्य – जो आपल्या ‘आयुष’ या पुरवणीचा मध्यवर्ती विषय आहे.
संपूर्ण आरोग्य हे तन आणि मन या दोघांचं. दुर्दैवानं आपण आपल्या धनाचं (इ. गुंतवणूक इ.) आरोग्य सांभाळतो तेवढं तनाचं नाही आणि मनाच्या आरोग्याकडे तर दुर्लक्षच होतं. यातून मनाचा तोल जाणं, अकारण किंवा अवाजवी रागावणं, एखाद्या गोष्टी वा व्यक्तीविषयी लोभ, मोह असणं, कुणाबद्दलतरी प्रमाणाबाहेर ईर्ष्या-मत्सर वाटणं इ. आरंभी साधे वाटणारे मनोविकार पुढे पुढे मनाचं आरोग्य धोक्यात आणतात.
‘मनोकायिक (सायकोसोमॅटिक)’ नावाचा रोगांचा एक प्रकार आहे. यात सारी चिन्हं किंवा लक्षणं जरी शरीरावर दिसली तरी त्यांचं मूळ मनात असतं. उदा.- एखाद्या मुलाला गणित विषयाची प्रचंड भीती वाटत असेल तर गणिताच्या परीक्षेपूर्वी त्याला ताप येतो जो तापमापकावर (थर्मामीटरवर) मोजताही येतो. नेहमीच्या साध्या औषधांचा उपयोग होत नाही. पण गणिताचा पेपर संपला की पुढच्या पेपरला स्वारी खडखडीत बरी होते. दमा (अस्थमा), रक्तदाब, अल्सर्स असे अनेक रोग मनाचं आरोग्य ठीक नसल्यामुळे अधिक विकोपाला जातात. म्हणून अशा रोगांसाठी मुख्य उपचार मनावर करायचा असतो. यासाठी डॉक्टर, शिक्षक, स्वतः पालक यांच्यापेक्षा या तिघांचा संगम असलेला अनुभवी समुपदेशक (कौन्सेलर) प्रभावी ठरू शकतो. याचाच विचार अनेकानेक अंगांनी अतिशय व्यावहारिक उपाय सुचवून आपण करणार आहोत.
शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा- २०२० हे वर्ष कोकोग्रस्त गेलं. ‘कोको’ म्हणजे कोरोना नि कोविड या राहूकेतूंनी सार्या जगाला पिडलं. अजूनही त्यांची पीडा चालू आहेच. या पार्श्वभूमीवर साल २०२१ची उज्ज्वल चित्रं पाहू या. त्यादृष्टीनं आपल्या बायोस्कोप (जीवनदर्शक)मधून निरोगी, निरामय जीवनाविषयी सहचिंतन करुया. ‘सर्वे सन्तु निरामयाः’चा घोष करत स्वतःला व इतरांना शुभकामना देऊ या.. उगवत्या नववर्षाच्या!