होंडा येथील कार जाळपोळ व तोडफोड प्रकरण; घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती; संशयित भूमिगत; शोध सुरू
दिवाळीच्या आदल्या दिवशी नरकासुर दहनापूर्वी होंडा येथे कर्णकर्कश संगीत वाजवण्याचा प्रकार घडला होता, त्याविषयी तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या रुपेश पोके यांच्या कारची होंडा पोलीस चौकीसमोरच तोडफोड व जाळण्याचा प्रयत्न झाला होता. याशिवाय जमावाने पोलीस चौकीवरही दगडफे केली होती. या प्रकरणी रुपेश पोके यांनी 10 जणांविरुद्ध तक्रार नोंदवली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री वाळपई पोलिसांनी होंडा पंचायतीचे सरपंच शिवदास माडकर, पंच कृष्णा गावकर व अन्य 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हे सर्वजण सध्या भूमिगत असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर वाळपई पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. असे असले तरी या प्रकरणामागील सूत्रधार मोकाट असून, इतरांची धरपकड सध्या सुरू आहे. काल दिवसभरात ज्यांची तक्रारीत नावे नमूद आहे, त्यांना सोडून इतर 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.
होंडा-सत्तरी येथे रविवारी ते पहाटेपर्यंत नरकासुर दहनावेळी कर्णकर्कश संगीतामुळे तणाव निर्माण झाला होता. स्थानिक रहिवासी रुपेश पोके यांनी पोलिसांत तक्रार दिल्यावर त्यांना जमावाकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. तसेच जमावाने पोलीस चौकीसमोरच त्यांची कार (क्र. जीए-11-ए-4966) फोडली, तसेच कारच्या आतमध्ये फटाके फोडून आग लावली. याशिवाय होंडा पोलीस चौकीवर दगडफेक केली. या जमावामध्ये स्थानिक पंच व सरपंचांसह 200 जणांचा समावेश होता. पोके यांनी कर्णकर्कश संगीताविरोधात तक्रार केली होती. पोलिसांनी सुरुवातीला संगीत बंदही केल होते; पण नंतर पुन्हा सुरू झाल्यावर वाद वाढला.
या प्रकरणी पणजी येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कडक कारवाईचा इशारा दिला. यानंतर पोलिसांची तपास प्रक्रिया गतिमान झाली. काल दिवसभर होंडा या ठिकाणी चौकशी प्रक्रिया हाती घेण्यात आली. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक आणि डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक यांनी होंडा पोलीस चौकीवर प्रत्यक्षपणे भेट देऊन या प्रकरणाचा आढावा घेतला.
प्रमुख संशयितांना सोडून इतरांची धरपकड
वाळपई पोलिसांनी तपासाला गती दिली आहे; मात्र प्रमुख संशयितांना सोडून इतरांची धरपकड सध्या सुरू आहे. रुपेश पोके यांनी ज्यांची नावे तक्रारीत नमूद केली आहेत, त्यांना अद्याप चौकशीसाठी ताब्यात घेतले नसून, इतर काही जणांची चौकशी पोलिसांनी सध्या चालवली आहे. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
अनेकांची चौकशी; तिघांना अटक?
या प्रकरणात काल वाळपई पोलिसांनी अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे; मात्र पोलिसांनी त्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नव्हती.
आरोग्यमंत्र्यांकडून कारवाईचे निर्देश
मिळालेल्या माहितीनुसार आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेतलेली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कोणत्याही प्रकारची हयगय करू नये. या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या सर्वांना गजाआड करावे, अशा सूचना त्यांनी पोलिसांना केल्या आहेत.
सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न
होंडा पोलीस चौकीसमोर कारची तोडफोड व जाळपोळ, तसेच पोलीस इमारतीवर दगडफेक या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर घटना होंडा पंचायतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक यांनी प्रत्यक्षपणे पंचायतीच्या कार्यालयात जाऊन सदर सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार पंचायतीमधील सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न काल करण्यात आला; मात्र तो अयशस्वी ठरला.
कुणाचीही गय नाही; संशयितांवर कारवाई सुरू : मुख्यमंत्री
राज्यात कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. होंडा येथील पोलीस चौकीसमोर कारची तोडफोड व जाळपोळ प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून, या प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना येथे काल दिली. होंडा येथे पोलीस चौकीसमोर कार जाळण्याचा प्रकार म्हणजे कायदा हातात घेण्यासारखे आहे. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणी आत्तापर्यंत दोन-तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोणाविरुद्ध तक्रार नोंद?
रुपेश पोके यांनी नोंदवलेल्या तक्रारीत सरपंच शिवदास माडकर, पंच सदस्य कृष्णा गावकर यांच्याबरोबर गौतम पार्सेकर, गिरीश पार्सेकर, गौरीश पार्सेकर, निलेश रंगनाथ परब, विशाल तुकाराम नाईक, सुरज बाबाजी देसाई, विशाल तुकाराम नाईक, व्यंकटेश चारी यांची नावे नमूद केली आहेत.
मळा येथे पोलिसांशी हुज्जत; 18 जणांविरुद्ध गुन्हा
नेवगीनगर-मळा, पणजी येथे नरकचतुर्थीच्या दिवशी ध्वनिक्षेपकावरून कर्णकर्कश संगीत वाजविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पणजी पोलीस स्थानकाच्या पथकाशी हुज्जत आणि कारवाईच्या कामात अडथळा आणल्या प्रकरणी 18 जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 रोजी सकाळी 9 च्या सुमारास घडली. पोलीस नियंत्रण कक्षाकडे ध्वनिक्षेपकावरून कर्णकर्कश संगीत वाजविल्याप्रकरणी तक्रार नोंद करण्यात आली होती. ह्या तक्रारीनंतर पोलीस पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले होते. पोलिसांनी दोन वेळा कर्णकर्कश संगीत बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नरकासूर प्रतिमा तयार केलेल्या आयोजकांनी पोलीस कारवाईमध्ये अडथळा आणला आणि पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. या प्रकरणी संशयित आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

