हॉप ऑन हॉप ऑफ बसेसची सेवा आता कळंगुट, कांदोळीतही

0
108

पर्यटक सफारी सेवा देणार्‍या ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बस वाहतुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील सेवेचा लवकरच विस्तार होणार आहे. पणजी येथून कळंगुट- कांदोळी या भागात पर्यटक सफारी सेवा सुरू केली जाणार आहे. या नवीन मार्गासाठी ३५ सीटर चार नवीन मिनी बसगाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे पुणे येथील पर्पल ग्रुपच्या साहाय्याने मे २०१७ मध्ये पर्यटक सफारीसाठी ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बससेवा सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात पणजी, मिरामार, दोनापावल आणि ओल्ड गोवा या मार्गावर पर्यटक सफारी सुरू करण्यात आल्या. या मार्गावर पर्यटक सफारीसाठी दोन डबल डेक आणि दोन सिंगल डेकच्या अशा चार खास बसगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या पर्यटक सफारीसाठी तीनशे रूपये शुल्क आकारले जात आहे. या पर्यटक सफारी सेवेसाठी महामंडळाला कुठल्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही. खासगी बस व्यावसायिकाकडून या मार्गावर पर्यटक सफारी सेवेचा खर्च उचलला जात आहे. ही पर्यटक सफारी सेवा नफ्यात आल्यानंतर बस व्यावसायिकांकडून महामंडळाला वार्षिक महसूल दिला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मागील आठ महिन्यात या पर्यटक सफारी सेवेला प्रतिसाद लाभू लागला आहे. या आठ महिन्यातील चार महिने पावसाचे असल्याने या काळात पर्यटक सफारीला चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु, पर्यटक हंगाम सुरू झाल्यानंतर या पर्यटक सफारी सेवेला प्रतिसाद मिळू लागला आहे. दर आठवड्याला पर्यटक सफारी सेवेचा आढावा घेतला जात आहे. या पर्यटक सफारी सेवेचा लाभ घेणार्‍या पर्यटकांची संख्या वाढत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पर्यटक सफारीच्या दुसर्‍या टप्प्यातील सेवेसाठी ३५ प्रवाशांना बसण्याची क्षमता असलेल्या चार मिनी बसगाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.