>> केंद्रिय अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती
वस्तू आणि सेवा कर मंडळाच्या ३७ व्या बैठकीत पर्यटन उद्योगासाठी जीएसटी दरात कपात करण्याचा निर्णय घेऊन पर्यटन उद्योगाला दिलासा देण्यात आला आहे. तारांकित हॉटेलचा जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १२ टक्के आणि १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. रु. १००१ ते ७५०० दरासाठी १२ टक्के आणि रु. ७५०१ दरावरील हॉटेलसाठी १८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. हॉटेलच्या १ हजारापर्यंतच्या दरासाठी जीएसटी आकारला जाणार नाही, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत काल दिली.
राज्यातील हॉटेल व्यावसायिकांकडून हॉटेल उद्योगाला दिलासा देण्यासाठी २८ टक्के जीएसटी दरात कपात करण्याची मागणी कित्येक महिन्यांपासून केली जात होती. गोव्यातील मंत्र्यांनी हॉटेल उद्योगाबाबतची सद्यःस्थिती योग्य पद्धतीने मांडली. या मागणीचा इतर राज्यातून पाठपुरावा करण्यात आल्याने तारांकित हॉटेलच्या जीएसटीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली.
फिफा महिला १७ वर्षाखालील २०२० मध्ये वर्ल्ड कपसाठी जीएसटी सूट दिली जाणार आहे. बाहेरील केटरिंग सर्व्हिससाठी ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. सोलर उपकरणावर ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. डायमंड कारागिरीवरील जीएसटी ५ टक्क्यांवरून १.५ टक्के आणण्यात आला आहे. इतर कामांसाठी जीएसटी १८ टक्क्यावरून १२ टक्के आणण्यात आला आहे. डीआयएलला सोने, चांदीच्या आयातीवर आयजीएसटीमध्ये सूट मिळणार आहे. डिफेन्स गुडच्या ठरावीक आयातीवर सवलत दिली जाणार आहे. एफएओकडून पुरवठा करण्यात येणार्या वस्तूची सेवाकरातून वगळण्यात आले आहे. फिश मिलसाठी १ जुलै २०१७ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यत जीएसटीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केन्द्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या जीएसटी बैठकीला केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, इतर राज्याचे अर्थमंत्री, १५ व्या वित्त आयोगाचे चेअरमन एन.के. सिंग, सरकारी अधिकारी उपस्थित होते.